एल्गार न्यूज (संपादकीय) :-
आजच्या काळात आपल्याकडे बऱ्याचदा अशी स्वार्थी मानसिकता दिसते की, ‘आपलं बरं झालं ना, मग दुसऱ्याशी आपल्याला काय देणेघेणे!’ मी जर हा लेख लिहिला नसता, तर माझ्या वैयक्तिक आयुष्यात काहीच फरक पडला नसता. पण जेव्हा एखादा गरीब, कष्टकरी किंवा मध्यमवर्गीय माणूस गंभीर आजार नसतानाही मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्सच्या चक्रव्यूहात अडकतो, तेव्हा त्याचे कष्टाचे लाखो रुपये विनाकारण खर्च होतात. एका असहाय्य मुलाला बेडवर पाहून त्याच्या आई-वडिलांची काय अवस्था होते, हे मी स्वतः अनुभवले आहे. म्हणूनच, केवळ आणि केवळ जनहितार्थ, कोणाचे तरी हजारो-लाखो रुपये वाचावेत या भावनेने मी माझ्या मुलाच्या ‘कावीळ’ आजाराचा एक अत्यंत महत्त्वाचा अनुभव येथे शेअर करत आहे.
मला आलेला अनुभव !
माझ्या १६ वर्षांच्या मोठ्या मुलाचा मागील महिन्यात एक छोटा अपघात झाला होता. त्याचे उपचार सुरू असतानाच, साधारण २० दिवसांपूर्वी त्याला ‘ कावीळ’ झाल्याचे निष्पन्न झाले, तसेच रक्तातील पेशी (Platelets) देखील कमी झाल्या होत्या. मुलगा शेजारच्या जिल्ह्यातील शहरात शिकायला असून तिथे २-३ दिवस प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतू काहीच फरक पडला नाही, म्हणून नातेवाईकांनी त्याला तेथीलच एका मोठ्या कॉर्पोरेट दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मी दुसऱ्याच दिवशी तिथे पोहोचलो.
त्या दवाखान्यात जवळपास ४ ते ५ दिवस उपचार करूनही मुलाच्या प्रकृतीत विशेष फरक पडत नव्हता. त्याला जेवण जात नव्हते, पोटात खूप दुखत होते आणि तो अस्वस्थ होता. तिथे सकाळी ५-६ आणि संध्याकाळी ५-६ सलाईन लावल्या जात होत्या, तसेच दिवसभरातून २ ते ३ वेळा रक्ततपासणी केली जात होती. म्हणजेच दररोज ३ ते ४ हजार रुपये मेडिकल व इतर गोष्टींवर खर्च होत होते. अखेर, कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडून आयुर्वेदिक औषधांची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर, मी स्वतः डॉक्टरांना विनंती करून तिथून सुट्टी (Discharge) घेतली. तोपर्यंत मेडिकल आणि तपासण्यांचे बिल २० हजारांच्या आसपास झाले होते, आणि डॉक्टरांची फी ५००० रुपये झाली होती. म्हणजेच, जवळपास २५,००० रुपये खर्च करूनही मुलाला विशेष काही फरक पडला नव्हता.
रुग्णालयातून सुट्टी घेतल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी आम्ही सकाळीच अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या “भेंडा फॅक्टरी” येथे गेलो आणि मुलासाठी आयुर्वेदिक औषध घेतले. तिथे नाकात औषधाचे थेंब टाकण्यात आले आणि १० दिवसांच्या आयुर्वेदिक औषधाच्या पुड्या देण्यात आल्या. मुलाला गावाकडे आणून सदरील आयुर्वेदिक उपचार सुरू केल्यावर, अवघ्या २ दिवसांत फरक जाणवला ! मुलाला व्यवस्थित जेवण जाण्यास सुरुवात झाली, पोटाचा त्रास पूर्णपणे कमी झाला आणि त्याचे चालणे-फिरणे पूर्ववत झाले. आज १० दिवस उलटल्यावर मुलगा ९९% बरा झाला आहे. आमच्या गावातील नामांकित मान्यवर डॉक्टरांच्या माध्यमातून आम्ही त्याची पुन्हा नवीन रक्ततपासणी (कावीळ + पेशी) केली असता, डॉक्टरांनी रिपोर्ट नॉर्मल असून आता आजार पूर्णपणे बरा झाल्याचे सांगितले आणि त्याला पुन्हा शिक्षणासाठी पाठवण्यास काहीच हरकत नसल्याचे स्पष्ट केले.
सांगायचा मुद्दा एवढाच की, आयुर्वेदाला कमी लेखू नका. सोबतच आपल्याकडे स्थानिक डॉक्टर सुध्दा चांगले आहेत, आपल्या गाव परिसरातील अनेक डॉक्टर बरेच आजार स्थानिक पातळीवरच कमी खर्चात बरे करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना धन्यवादच म्हणावे लागेल. कदाचित कावीळ च्या उपचारातही स्थानिक डॉक्टरांकडून योग्य ते मार्गदर्शन झाले असते. परंतू ऐनवेळी माणसाला काही सुचत नाही, त्यामुळे धावपळ होते. त्यामुळे कावीळ झाल्यास स्थानिक डॉक्टरांकडे आवश्यक ते उपचार घेत चला. मात्र सोबतच ‘भेंडा फॅक्टरी’ला एकदा आवर्जून जावून, उपचार घेवून या. किंवा आपल्या आसपास कोणी कावीळचे खात्रीशीर आयुर्वेदिक औषध देत असेल तर तिथे पण उपचार घेवू शकता. कारण मोठ्या corporate दवाखान्यात हजारो / लाखो रूपये खर्च करूनही कावीळचा पाहीजे तसा रिझल्ट येत नसेल तर कमी खर्चात हा आयुर्वेदिक पर्याय नक्की करा, कारण कावीळ जास्त दिवस राहिल्यास तो शरीरासाठी घातक ठरू शकतो.
सर्वांना एक विनंती :-
अॅल्यूपॅथी, होमिओपॅथी इत्यादींचे महत्व कोणीच नाकारू शकत नाही. परंतू आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांची ताकद आजही अफाट आहे. त्याचे महत्वही कमी धरता येणार नाही. त्यामुळे आपणास किंवा आपल्या आसपासच्या व्यक्तीला विविध आजारांपैकी कोणत्याही आजारात आयुर्वेदिक उपचाराने (कमी खर्चात) फायदा झाला असेल किंवा आजार बरा झाला असेल तर त्याची माहिती स्थानिक ग्रुप मध्ये (सोशल मीडियावर) आवश्य देत चला, कारण आजारपणाच्या संकटात सापडलेल्या व्यक्तीला अशा प्रकारची माहिती देणे हे सुध्दा एक पुण्यकर्मच आहे. कारण परिस्थिती जेमतेम असेल आणि दवाखान्यात मुलगा असहाय्यपणे बेडवर पडलेला दिसत असेल तर आई-वडीलांची काय अवस्था होते हे सांगायची आवश्यकता नाही. आपण सर्वांनी आपल्या किंवा आपल्या जवळच्या माणसाला आलेल्या अनुभवानुसार महत्वपूर्ण व खरी माहिती इतरांना आवश्य शेअर करत चला. आपण सर्वांनी याची काळजी घेतल्यास असंख्य गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यापारी, मध्यमवर्गीय यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांचे कोट्यावधी रूपये वाचतील, विनाकारण होणाऱ्या आर्थिक भुर्दंडातून त्यांची सुटका होईल आणि ज्याची किंमतही करता येणार नाही असा त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळेल यात शंका नाही.
जनहितार्थ प्रकाशित…
- आपलाच,
परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज