एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
रूग्णांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात म्हणून शासन कोट्यावधी रूपये खर्च करत आहे, परंतू त्याची अंमलबजावणी करणारे जर गोरगरीब रूग्णांना किड्या मुंग्या सारखे समजून उद्धटपणे उपकाराची भाषा करत असतील आणि उपचार करण्यात टाळाटाळ करत असतील तर शासनाचे कोट्यावधी रूपये वाया जात आहेत की काय असा सवाल उपस्थित होत आहे.
रूग्णांना उद्धटपणाची वागणूक !
दि.०४ रोजी घनसावंगी ग्रामीण रूग्णालयात संतापजनक चित्र पहायला मिळाले. येथे सकाळी ११ च्या दरम्यान रूग्णांना पाहून गोळ्या औषध लिहून देणारे डॉ.जुजगर हे रूग्णांना अत्यंत उद्धटपणे बोलतांना दिसून आले, त्यांच्या कॅबीनमध्ये काही तर काही बाहेर असे १०-१२ रूग्ण उभे होते, सदरील डॉक्टर अचानक रागावले व सर्व रूग्णांना बाहेर व्हा असे सांगितले, तोंड घेवून येथे उभे राहता असे सांगितले आणि कर्मचाऱ्याला बोलावून बहुतांश रूग्णांना कॅबीनच्या बाहेर काढले.
ज्या रूग्णांना पायाला फ्रॅक्चर झाले आहे त्यांनाही लाईनमध्ये उभे राहण्यास भाग पाडले, अक्षरश: रूग्णांचे सविस्तर ऐकून न घेता, २ शब्द रूग्णाने सांगितले की चिठ्ठीवर खरखर लिहून देत पुढे चला असे सांगत असल्याचे दिसून आले. वारंवार त्यांची भाषा उद्धट आणि उर्मटपणाची दिसून आली. रूग्णांना उद्देशून तुम्हाला कळत नाही का ? नीट उभे रहा, कॅबीनच्या बाहेर व्हा, उठसूठ येथे येवून उभे राहता, असे विविध अपमानास्पद वाक्य ते बोलतांना दिसून आले. त्यांच्या बोलण्यावरून त्यांना रूग्णांना तपासण्याची इच्छा नव्हती, तर निवांतपणे मोबाईल बघत बसायचं अशी त्यांची मानसिकता दिसत होती.
विषय एवढ्यावरच थांबला नाही, तर एका चक्कर येण्याची समस्या असलेल्या रूग्णांने त्याला होत असलेला त्रास चिठ्ठीवर लिहून आणला ज्यात काही महत्वपूर्ण माहिती होती, तर ती चिठ्ठी सुध्दा डॉक्टरांनी पाहिल्यासारखं केलं आणि चिठ्ठी बाजूला ठेवून दिली, पुन्हा तोच खरखर काही शब्द पिवळ्या चिठ्ठीवर लिहून टेस्ट करा असे सांगितले, जेव्हा रूग्णाने कुठे जायचे असे विचारले तर बाहेर कोणाला विचारा असे सांगितले. बाहेर माहिती देणारे कोणी नव्हते.
रूग्णाने कसे बसे कुणाला विचारून शुगर आणि रक्त तपासणी केली, त्यानंतर त्यास सलाईन लावण्यास सांगण्यात आले, पण सलाईन कुठे लावायची ते माहित नव्हतं, ते सुध्दा इकडून तिकडून माहिती घेतली, त्यानंतर जेथे सलाईन लावली जाते तेथे सांगण्यात आले की, रूग्णासोबत कोणीही नसल्याने त्या रूग्णाला आधी कोणीतरी सोबत असल्यास सलाईन लावता येईल, त्याशिवाय सलाईन लावता येणार नाही असे सांगण्यात आले. सदरील रूग्णाने बाहेर कोणी ओळखीचे आहे का हे शोधले आणि एक ओळखीचा माणूस भेटल्यावर त्याला सोबत आणले व त्यानंतर सलाईन लावण्यात आली. सलाईन लावण्याच्या प्रोसेस मध्ये डॉक्टर कुठेही दिसले नाही, सलाईन संपल्यावरही डॉक्टर तेथे आले नाही, सिस्टरनेच सलाईन लावली आणि काढली सुध्दा.
सलाईन संपल्यावर गोळ्या औषध घेण्यासाठी सदरील रूग्ण डॉ.जुजगर यांच्याकडे पुन्हा गेल्यावर डॉक्टरांनी त्यास दुर्लक्षित केले, रूग्णांने डॉक्टरांना गोळ्या औषध कुठून घेवू असे विचारले असता आता वेळ संपलेली आहे नंतर या असे सांगितले. रूग्णाने विनंती केल्यावर कोणत्या तरी नर्सला जावून भेटा ते देतात का पहा असे सांगितले. सिस्टरला भेटल्यावर एका सिस्टरने ओपीडी संपलेली आहे असे सांगितले, तेव्हा रूग्णाने पुन्हा डॉ.जुजगर यांना विनंती केली. तेव्हा डॉक्टरांनी रागावून रूग्णाला सांगितले की तुम्हाला तेच ते किती वेळेस सांगायचे, तिकडे जावून सिस्टरला भेटा ना, त्या डब्यांमध्ये गोळ्या असतील तर ते देतील असे सांगितले.
तेवढ्यात एक नर्स आल्यावर डॉक्टरांनी सिस्टरला गोळ्या आहेत का पहा आणि यांना द्या असे सांगितले, तेव्हा सिस्टरने राखीव ठेवलेले काही बॉक्स उघडले आणि ते सगळे बॉक्स खाली होते, दोन प्रकारच्या २ उरलेल्या गोळ्या काढून दिल्या व बाकी नंतर येवून घेवून जा किंवा तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुध्दा भेटतील असे सांगितले. म्हणजेच आवश्यक असलेल्या गोळ्या औषधे भेटलीच नाहीत. चक्कर येण्याची समस्या असलेला तो रूग्ण नाईलाजाने तेथून बाहेर पडला आणि घरी परतला. विशेष म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत बोटावर मोजण्याइतके सुध्दा रूग्ण या ग्रामीण रूग्णालयात नव्हते. तरीही एवढी हेळसांड आणि मानसिक त्रास रूग्णांना सहन करावा लागला.
अधिक्षक उत्तर देण्यास असमर्थ !
सदरील रूग्णाला गोळ्या औषध मिळाले नसल्याबाबत वैद्यकीय अधिक्षक यांना फोनवर कल्पना दिल्यावर वैद्यकीय अधिक्षकांनी गोळ्या औषधांची सोय करतो असे सांगितले, परंतू तो पर्यंत रूग्ण ग्रामीण रूग्णालयापासून लांब गेला होता व शेवटी गोळ्या औषधाविना तो रूग्ण घरी परतला. सदरील प्रकाराबाबत वैद्यकीय अधिक्षक यांना विचारले असता त्यांनी याबाबत अधिक बोलण्यास असमर्थता दर्शवली.
थांगपत्ता लागत नाही !
जेव्हा रूग्णाला सलाईन लावलेली होती तेव्हा तेथील बेडवर एकही उशी नव्हती, पिण्याचे पाणी कुठे आहे याचा थांगपत्ता लागत नव्हता. इतर सुविधांचा तर विषयच नव्हता. जेव्हा अनेक रूग्ण डॉ.जुजगर यांच्याकडून चिठ्ठी घेवून बाहेर पडत होते तेव्हा त्यांनी कोठे जायचे, काय करायचे, कुठे उपचार होणार ? कुठे गोळ्या औषधे भेटणार ? रक्त तपासणी कुठे होणार ? शुगर तपासणी कुठे होणार किंवा इतर टेस्ट कुठे होणार ? याचा थांगपत्ता सर्वसामान्य गोरगरीब रूग्णांना लागत नव्हता. अक्षरश: अनेक रूग्ण इकडून तिकडे फिरतांना दिसून आले.
हीच का आरोग्यसेवा !
शासन आरोग्य सेवेवर कोट्यावधी रूपये खर्च करत आहे, मात्र तळागाळातील गोरगरीब रूग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळणे तर दूरच उलट अपमानास्पद वागणूक, उद्धट भाषा सहन करावी लागत असेल, आवश्यक त्या गोळ्या औषधे मिळत नसतील आणि सगळा काही अवमेळ पहायला मिळत असेल तर रूग्ण अशा रूग्णालयात जातील का ? पुढच्या वेळेस त्यांची इच्छा होईल का ? वैद्यकीय अधिक्षक वरच्या मजल्यावर बसून उंटावर बसून शेळ्या हाकत असतील तर त्यांना सत्य परिस्थिती लक्षात येईल का ? जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकारी अचानक भेट देवून पाहणी करणार नसतील तर त्यांना येथील अवमेळ लक्षात येईल का ? असा सवाल उपस्थित रूग्णांनी केला आहे.
…तर राजीनामे देवून घरी बसा !
रूग्णांना उद्धटपणे बोलून आम्ही तुमच्यावर उपकार करत आहोत अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक दिसत असेल, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य रूग्णांवर उपचार करणे जिवावर आले असेल तर अशा कर्मचाऱ्यांनी खुशाल राजीनामे देवून घरी बसावे अशी संतप्त भावना अनेक गोरगरीब व सर्वसामान्य रूग्णांनी व्यक्त केली आहे.
आरोग्य सेवाच सलाईनवर !
ग्रामीण भागात आरोग्य सेवाच सलाईनवर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रातून छोट्या छोट्या गोष्टींसाठी तालुकास्तरावर ग्रामीण रूग्णालयात पाठवले जाते आणि ग्रामीण रूग्णालयातही अनेकदा जिल्हा रूग्णालयात पाठवले जाते. विशेष म्हणजे अनेक उपचार असे आहेत की जे गांव पातळीवरच खाजगी डॉक्टर सहजपणे करतात, परंतू प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रूग्णालयात ते उपचार सहज मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
वरिष्ठ लक्ष घालणार का ?
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रूग्णालयाची झालेली दयनीय अवस्था पाहून जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थोडीफार शिल्लक असेल तर अचानक भेटी देवून पाहणी करावी, रूग्णांना साईडला घेवून विचारणा करावी, गोळ्या औषधांचा नेहमी तुटवडा का असतो ? रूग्णांना आवश्यक ते सर्व उपचार मिळत आहेत का ? याची माहिती घेवून तात्काळ योग्य ती पाऊले उचलावीत आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, एवढीच माफक अपेक्षा सर्वसामान्य रूग्ण व्यक्त करत आहेत.