संपादकीय (एल्गार न्यूज) :–
पत्रकारिता अर्थात लोकशाहीचा चौथा स्तंभ ! हा स्तंभ भक्कम ठेवण्यासाठी कित्येक पत्रकारांनी आपल्या आयुष्याची राखरांगोळी केली. पण आज याच पवित्र क्षेत्राला आतून कीड लागली आहे. ही कीड बाहेरच्या शत्रूने लावलेली नाही, तर पत्रकारितेचा मुखवटा घालून फिरणाऱ्या काही ‘बांडगुळांनी’ आणि ‘गद्दारांनी’ लावली आहे. आज प्रामाणिक आणि इमाने-इतबारे काम करणाऱ्या पत्रकारांचे वाटोळे होण्यास भ्रष्ट व्यवस्था किंवा गुंड जबाबदार नाहीत, तर त्यांच्याच शेजारी बसून, त्यांच्याच ताटात जेवून, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणारे ‘झारीतले शुक्राचार्य’ जबाबदार आहेत.
शहरी भागातील परिस्थिती कदाचित थोडी वेगळी असेल, पण ग्रामीण भागातील पत्रकारितेचे वास्तव अत्यंत भीषण आणि अस्वस्थ करणारे आहे. ग्रामीण भागातील पत्रकारिता आज एका अशा वळणावर उभी आहे, जिथे समोरचा शत्रू ओळखता येतो, पण सोबत असलेला मित्र कधी घात करेल याचा नेम उरलेला नाही.
तुम लाख कोशिश करो सच को दबाने की,
सच वो बीज है जो मिट्टी चीरकर बाहर आता है।
दुसऱ्या शत्रूची गरजच काय?
जेव्हा आपलेच लोक आपल्याच पत्रकार बांधवांचा ‘कार्यक्रम’ करायला टपलेले असतात, तेव्हा बाहेरच्या शत्रूची गरजच उरते कुठे ? महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या इतिहासातील मागील काही घटनांचा आढावा घेतला तर अंगावर काटा येतो. एखाद्या निर्भीड पत्रकारावर जेव्हा हल्ला होतो, तेव्हा तपासात धक्कादायक माहिती समोर येते. त्या हल्लेखोराला चिथावणी देणारा, पत्रकाराचे लोकेशन देणारा आणि हल्ल्याचा कट रचण्यासाठी गुंडांसोबत बैठका मारणारा दुसरा कोणी नसून ‘पत्रकार’ नावाच्या मुखवट्यात लपलेला बांडगुळच असतो.
आपल्याच पत्रकारांना अडचणीत आणण्यासाठी पत्रकारिता क्षेत्रातीलच काही बांडगुळ सहभागी होतांना दिसून येत आहेत. ही बांडगुळं म्हणजे लावालावी करणे, खच्चीकरण करणे, स्वत:ला चांगले आणि इतर पत्रकारांना कमी दाखवणे, हल्लेखोरांना प्रोत्साहन देणे, खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पडद्यामागून प्रयत्न करणे, अप्रत्यक्षपणे कुटुंबियांवर दबाव आणणे, रोखठोक बातम्या लिहू नये म्हणून प्रयत्न करणे, ज्याच्या विरूध्द बातमी आली त्याला भडकवणे, अधिकारी-नेत्यांकडे स्वत:ला सर्वोत्कृष्ट आणि इतर प्रामाणिक पत्रकारांना चुकीचे दाखवणे, इतर पत्रकारांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणे, पाकीट संस्कृतीला प्रोत्साहन देणे, ज्यांच्या विरूध्द बातमी आली त्यांना पत्रकार ग्रुप मधील चर्चांचे स्क्रीनशॉट पाठवणे, भेटीगाठी घेणे, प्रामाणिक पत्रकारांविषयी स्थानिक पातळीवर नकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करणे असे एक ना अनेक प्रकार या बांडगुळांकडून सुरू असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. अर्थातच हा प्रकार कुठल्या एका ठिकाणचा नसून बहुतांश ठिकाणी कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे.
पडद्यामागून कटकारस्थान रचणारी ही बांडगुळं पत्रकारिता क्षेत्रासाठी धोक्याची घंटा ठरू लागले आहेत. आपल्याच पत्रकार भावाच्या जीवावर उठणाऱ्या या ह#मखोरांना आपण ‘पत्रकार’ म्हणायचे की ‘गद्दार’? ज्यांच्या लेखणीत दम नाही, आणि स्वत:चे काही कर्तृत्व नाही अशा बांडगुळांनी प्रामाणिक पत्रकारांना अडचणीत आणण्याचे कटकारस्थान सुरू केल्याचे दिसत आहे. ही पत्रकारितेची अधोगती नाही तर काय आहे?
घर जाळून कोळसे !
आजच्या काळात पत्रकारिता करणे म्हणजे जळत्या निखाऱ्यावरून चालण्यासारखे आहे. समाजहित आणि देशहित डोळ्यासमोर ठेवून वर्षानुवर्षे ही तारेवरची कसरत करावी लागते. जिल्हा मुख्यालयातील पत्रकारांना तरी थोडा-फार पगार मिळतो, पण ग्रामीण भागातील पत्रकारांचे काय? तालुका स्तरावर किंवा गाव स्तरावर काम करणाऱ्या या योद्ध्यांना ना पगार असतो, ना शासनाचा कोणताही लाभ!
‘घर जाळून कोळसे करणे’ ही म्हण ग्रामीण पत्रकारांना तंतोतंत लागू पडते. एखादा मजूर दिवसभर घाम गाळला तर ५००-७०० रुपये घरी घेऊन जातो. पण ग्रामीण पत्रकार? तो स्वतःच्या खिशातून गाडीत पेट्रोल टाकतो, अन्यायाविरुद्ध ओरड करतो, दिवसभर बातम्या गोळा करतो, त्या प्रसिद्ध करण्यासाठी धडपडतो आणि दिवस संपल्यावर रिकाम्या हाताने, पण थकलेल्या शरीराने घरी परततो. ही व्यथा महाराष्ट्रातील तब्बल २५ ते ३० हजार पत्रकारांची आहे. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत या परिस्थितीत बदल झाला नाही. सरकारे आली आणि गेली, पण पत्रकारांच्या झोळीत फक्त ‘पोकळ आश्वासनांची चॉकलेट्स’ पडली.
एकीकडे कुटुंबाचे पालनपोषण, मुलांचे शिक्षण, आरोग्य या विवंचनेत असताना, दुसरीकडे अशा ‘हरा#खोर’ मानसिकतेच्या बांडगुळांचा त्रास सहन करावा लागणे, हे कोणत्याही पत्रकाराच्या सहनशीलतेचा अंत पाहणारे आहे. जेव्हा घरचे लोक पोटाची खळगी भरण्यासाठी झगडत असतात आणि हे बांडगुळ त्याच पत्रकाराला अडकवण्यासाठी कटकारस्थान रचतात, तेव्हा संतापाचा उद्रेक होणे स्वाभाविक आहे.
बांडगुळांची जळाऊ वृत्ती आणि ‘शकुनी’ नीती
ज्या पत्रकारांना रोखठोक लिहिण्याची सवय आहे, ज्यांची लेखणी सत्याची कास धरते, त्यांना समाजात एक वेगळे स्थान मिळते. जनता त्यांना मान देते, प्रशासकीय यंत्रणा त्यांना दचकते आणि राजकीय नेते त्यांचा आदर करतात. पण हेच यश काही बांडगुळांच्या डोळ्यात खुपते. स्वतःमध्ये काही करण्याची ताकद नाही, लिखाणात दम नाही आणि शब्दांत धार नाही, अशा लोकांच्या पोटात मग ‘मुळव्याध’ उठतो.
हे बांडगुळ पडद्यामागे लपून ‘शकुनी’ नीती अवलंबतात. ही माणसं समोर कधीच येत नाहीत. कारण त्यांच्यात समोरून लढण्याची हिम्मत नसते. हे लोक सर्वसामान्य जनता आणि अधिकाऱ्यांच्या कानात विष कालवण्याचे काम करतात. लोकप्रतिनिधींकडे जाऊन चांगल्या पत्रकारांची बदनामी करतात. संशयास्पद वाक्य बोलून समोरच्याच्या मनात विष पेरण्याचे काम हे गद्दार करतात. वेळ प्रसंगी कटकारस्थानात हे सहभागी होतात, हे बांडगुळ स्वतः लाचार असतात आणि दुसऱ्याने स्वाभिमानाने जगलेले त्यांना पहावत नाही.
खिसे गरम करणारे ‘पाकीटमार’ पत्रकार!
या बांडगुळांची पत्रकारिता फक्त ‘पाकिटा’ भोवती फिरते. ज्याने अंधारात खिसे गरम केले, त्याचे पाय चाटणे हीच यांची पत्रकारिता! त्यांनी आपली लेखणी दुसऱ्याच्या दावणीला बांधलेली असते. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधी एखादी धगधगती बातमी लिहिली नसेल, कधी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नसेल. फक्त लाचारी करणे आणि तुकड्यांवर जगणे हेच त्यांचे कर्तव्य बनले आहे.
सर्वसामान्यांच्या हिताच्या बातम्या लिहिण्यासाठी काळजात जे धाडस लागते, ते या गद्दारांकडे नसतेच. पण जेव्हा एखादा दुसरा पत्रकार निर्भीडपणे लिहितो, तेव्हा हे बांडगुळ शकुनी मामा त्याला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या पत्रकाराला एकटे पाडणे, त्याच्याविरुद्ध नकारात्मक वातावरण तयार करणे आणि त्याला कायदेशीर अडचणीत कसे आणता येईल, यासाठी रात्रीचा दिवस करणारे हे बांडगुळ समाजासाठी आणि पत्रकारितेसाठी ‘कॅन्सर’ ठरत आहेत.
काळ कोणालाच माफ करत नाही!
या बांडगुळांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी “जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर”. आज तुम्ही (बांडगुळ) लाचारी मध्ये दुसऱ्यांचे पाय चाटून आणि चार पैशाच्या गुर्मीत आपल्याच बांधवांच्या घराला आग लावत असाल, तर विसरू नका की वाऱ्याची दिशा बदलली की तीच आग तुमच्याही घरापर्यंत पोहोचणार आहे. आज तुम्ही कोणाचा ‘कार्यक्रम’ लावण्यासाठी कटकारस्थान रचत असाल, तर काळ तुमचाही हिशोब लिहून ठेवत आहे.
खोटा मुखवटा घालून किती दिवस फिरणार? पितळ कधी ना कधी उघडं पडतंच. जेव्हा काळ बदला घेतो, तेव्हा तो वादळासारखा येतो आणि अशा पालापाचोळ्याला उडवून लावतो. तुम्ही ज्यांच्या जीवावर ही गद्दारी करत आहात, ते लोक आज आहे त्या ठिकाणी उद्या नसतील, पण ही बदनामी आणि हा गद्दारकीचा शिक्का तुमच्या कपाळावर कायमचा बसेल.
खामोशी को किसीकी कमज़ोरी मत समझना,
तूफान आने से पहले अक्सर सन्नाटा ही होता है।
..तर वेळ लागणार नाही !
प्रामाणिक पत्रकार आजवर शांत होते, कारण त्यांना वाटले की ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’. पण आता पाणी डोक्यावरून गेले आहे. जर ही बांडगुळे पत्रकारिता क्षेत्राची अस्मिता धुळीला मिळवणार असतील, तर त्यांना उघडे पाडणे हेच आता पवित्र कर्तव्य ठरते.
बांडगुळांनो, तुमचा ब्रँड कितीही मोठा असो किंवा तुमच्या मागे कोणतीही शक्ती असो, निर्भीड पत्रकारितेच्या लेखणीसमोर आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभासमोर तुमची लायकी शून्य आहे. जर तुम्ही तातडीने स्वतःची चूक मान्य केली नाही, ज्यांच्याबद्दल कटकारस्थान रचले त्यांची माफी मागितली नाही, तर लक्षात ठेवा, आता तुमचे नाव, तुमचा चेहरा आणि तुमची काळी कृत्ये भरचौकात उघडी पडायला वेळ लागणार नाही.
उसूलों पे जहाँ आँच आये टकराना ज़रूरी है..
जो ज़िन्दा हों तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है..
कर्माची परतफेड !
अरे बांडगुळांनो, जर तुम्ही जमिनीमध्ये कडुनिंबाची बी पेरली, तर त्याला कधीही रसाळ आंबे येणार नाहीत. तुम्ही बाभळीची झाडं लावून गुलाबाच्या फुलांची अपेक्षा करणे हा निव्वळ वेडेपणा आहे. दुसऱ्यासाठी खड्डा खणणारा स्वतः कधी त्या खड्ड्यात जाऊन पडतो, हे त्यालाही कळत नाही. तुम्ही आज लाचारी, तुमचा इगो आणि चार पैशाच्या मग्रुरीत दुसऱ्याच्या घराला आग लावण्यासाठी निघाला असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, वाऱ्याची दिशा बदलली की तीच आग तुमच्या स्वतःच्या छपराला राख केल्याशिवाय राहणार नाही. काळाच्या न्यायालयात प्रत्येक चुकीच्या कृत्याची परतफेड ही व्याजासह करावीच लागते.
आग लगानेवालो को
कहां खबर…
रूख हवाओं ने बदला
तो खाक वो भी होंगे…
प्रामाणिक पत्रकारांना आवाहन !
आपल्या गाव-शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात किंवा राज्यात एखाद्या प्रामाणिक पत्रकारा विषयी काही चुकीचे ऐकायला मिळाले तर तात्काळ विश्वास ठेवू नका, त्याची माहिती घ्या, योग्य ती चौकशी करा आणि जर त्या पत्रकार बांधवाने काही चुकीचे केले नसेल आणि त्याला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असेल तर खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे रहा. कारण रात्र वैऱ्याची आहे. आज वेळ त्या प्रामाणिक पत्रकारावर आहे उद्या आपल्यावर येवू शकते, त्यामुळे सतर्क रहा, संपर्कात रहा आणि एकमेकांना कायम पाठबळ द्या. मग तो कोणत्याही संघटनेचा असो अथवा नसो. याआधीच्या काळात रिंगणाच्या बाहेर दुश्मन होते मात्र आता रिंगणाच्या आत सुध्दा दुश्मन आहेत याची जाणीव असू द्या.
बांडगुळांनो, आता तरी सुधरा !
गद्दार बांडगुळांनी शेवटची संधी म्हणून आता तरी हरा#खोरपणा करू नये, ज्या ज्या ठिकाणी असे बांडगुळ फोफावले आहेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, आता आधीसारखी परिस्थिती राहीलेली नाही. तुम्ही जर कटकारस्थान करून प्रामाणिक पत्रकारांचा कार्यक्रम लावत असाल तर प्रामाणिक पत्रकार तुमचा करेक्ट कार्यक्रम करू शकत नाहीत का ? नक्कीच करू शकतात हे तुम्ही ध्यानात घ्यावे. पत्रकारिता ही समाजसेवेसाठी आहे, एकमेकांचे पाय खेचण्यासाठी नाही.
त्यामुळे ज्या चांगल्या पत्रकारांचे तुम्ही खच्चीकरण केले, ज्यांच्या विरोधात वावड्या उठवल्या, ज्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडे जाऊन प्रायश्चित्त घ्या अर्थात माफी मागा. अन्यथा, तुम्ही पेटवलेली ही सूडाची आग जेव्हा उलट्या दिशेने फिरेल, तेव्हा तुम्हाला पळायला जागा उरणार नाही. शिवाय प्रामाणिक पत्रकार जर पेटून उठले तर ते या पत्रकारितेतील ‘घाणीला’ साफ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारण शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो… सत्यमेव जयते…
फ़ानूस बनकर जिसकी हिफ़ाज़त हवा करे,
वो शमा क्या बुझे जिसे रौशन ख़ुदा करे।
- परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज (जालना)
9890515043
प्रामाणिक पत्रकार बांधवांनी हे आर्टीकल राज्यातील सर्व पत्रकार ग्रुप मध्ये शेअर करावे. शिवाय तुमच्या प्रतिक्रिया वरील क्रमांकावर पाठवू शकता. (फक्त माहितीस्तव)