एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात आजवर शेकडो सनदी अधिकारी आले आणि गेले. काही ‘सिस्टीम’चा भाग बनून निवृत्त झाले, तर काही मोजक्यांनी स्वतःची करारी आणि निर्भीड ओळख निर्माण केली. एकाच नावाभोवती ११ कोटी जनतेचा विश्वास आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या काळजाचा थरकाप एकत्र फिरावा, असं नाव म्हणजे- IAS तुकाराम मुंढे ! २००५ च्या बॅचचे हे महाराष्ट्र केडरचे अत्यंत प्रामाणिक, कडक आणि खऱ्या अर्थाने सामान्यांचे कैवारी असलेले ज्येष्ठ अधिकारी.
फक्त २१ वर्षांच्या सेवाकाळात तब्बल २५ वेळा बदली, हा आकडा वाचूनच डोके सुन्न होते. गणित मांडले तर दर दहा महिन्यांनी एकदा बदली ! कोणत्याही प्रामाणिक माणसाचे मनोधैर्य अशा सततच्या अस्थिर परिस्थितीत केव्हाच खचले असते. पण मुंढे वेगळ्या मातीचे आहेत, ते खचले नाहीत, झुकले नाहीत आणि विकले जाणे तर त्यांच्या रक्तातच नाही. जिथे गेले तिथे कायद्याचे राज्य स्थापन केले, भ्रष्टाचाऱ्यांचे सिंडिकेट उद्ध्वस्त केले आणि सामान्य माणसाला न्याय दिला. म्हणूनच जनतेने त्यांना ‘प्रशासनाचा सिंघम’ ही पदवी बहाल केली आहे.
सरकारचे मनापासून अभिनंदन !
सर्वप्रथम, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांच्यासह संपूर्ण राज्य सरकारचे मनापासून अभिनंदन करावे लागेल. सरकारने तुकाराम मुंढे यांची अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या आयुक्तपदी नियुक्ती करून अत्यंत धाडसी, ऐतिहासिक आणि जनहितैषी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
सिस्टीममधील अंतर्गत विरोध, अदृश्य राजकीय दबाव आणि बड्या माफियांचे हितसंबंध मोडून काढून एका ‘न झुकणाऱ्या’ अधिकाऱ्याला इतक्या संवेदनशील खात्याची धुरा देणे, यासाठी मोठ्या राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. सरकारने हे सिद्ध केले की राज्याला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढण्याची आणि जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्याची भावना त्यांच्यात अजून जिवंत आहे. जनता या निर्णयासाठी सरकारची मनापासून आभारी आहे.
इमानदारीची क्रूर शिक्षा !
तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीचा इतिहास पाहिला तर त्यांचा प्रामाणिकपणाच त्यांच्या बदल्यांचे कारण ठरला आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना वाळू माफियांचे कंबरडे मोडले, नवी मुंबईत भ्रष्ट कंत्राटदारांचे ‘टेंडर किंग’चे साम्राज्य उद्ध्वस्त केले, नागपुरात कोरोना काळात कठोर शिस्त दाखवली, नाशिकमध्ये प्रशासकीय सुधारणांचे नवे पर्व घडवले, “नियम सर्वांसाठी सारखेच” ही त्यांची कामाची पद्धत एकदाही बदलली नाही.
पण हीच पद्धत भ्रष्ट व्यवस्थेला सलते. सरकारी नियमानुसार एखाद्या पदावर किमान तीन वर्षांचा कार्यकाळ अपेक्षित असताना मुंढे यांना काही महिन्यांतच हलवले जात होते, हा योगायोग कधीच नव्हता. हे सुनियोजित षड्यंत्र होते. ज्यांचे कोट्यवधींचे काळे धंदे धोक्यात आले, त्यांनी राजकीय वजन वापरून या प्रामाणिक अधिकाऱ्याचे वारंवार खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. नुकतेच एप्रिल २०२६ मध्ये एका विभागात बदली झाली, पण रुजू होण्यापूर्वीच ती रोखली गेली आणि त्यांना महिनाभर विनाकारण प्रतीक्षेत ठेवण्यात आले. तरीही मुंढे डगमगले नाहीत, हेच त्यांचे मोठेपण आहे. आता सरकारने त्यांना एका अत्यंत महत्वाच्या विभागाची जबाबदारी दिली आणि मुंढे या सर्व चक्रव्यूहाला भेदून, पुन्हा नव्या जिद्दीने आणि ताकदीने जनतेच्या सेवेसाठी सक्रीय झाले आहेत.
जगण्या-मरण्याशी संबंधित खाते !
अन्न व औषध प्रशासन (FDA) हे केवळ एक सरकारी विभाग नाही, हे महाराष्ट्रातील ११ कोटी नागरिकांच्या थेट जीवन-मरणाशी जोडलेले खाते आहे. आज गल्लोगल्ली अन्नपदार्थांमध्ये भयानक भेसळ होत आहे. कार्बाइडने कृत्रिमरित्या पिकवलेली फळे, युरिया-डिटर्जंट मिसळलेले दूध, तरुणाईला कॅन्सरच्या खाईत लोटणारा प्रतिबंधित गुटखा, असंख्य निकृष्ट खाद्यपदार्थ हे सर्व उघडपणे विकले जाते. आणि सर्वात भयंकर म्हणजे बाजारात उपलब्ध असलेली अनेक औषधे बनावट, नकली किंवा इतक्या निकृष्ट दर्जाची आहेत की महागडी औषधे घेऊनही रुग्णांचे जीव वाचत नाहीत.
सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी दिवसरात्र घाम गाळून पैसा कमावतो, पण तीच कमाई निकृष्ट अन्नाने होणाऱ्या आजाराकडे आणि बनावट औषधांकडे ओढली जाते. हा केवळ आरोग्याचा प्रश्न नाही, तर हा गोरगरिबांच्या आर्थिक प्रगतीचा आणि अस्तित्वाचाही प्रश्न आहे. वर्षानुवर्षे योग्य नेतृत्वाअभावी हा विभाग भ्रष्टाचाराने पोखरलेला राहिला. आता नशिबाने या विभागाला तुकाराम मुंढे मिळाले आहेत.
अवघ्या ३ दिवसांत इतिहास घडला !
दि. २५ मे २०२६ रोजी मुंढे यांनी FDA आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार घेताच त्यांनी स्पष्ट संदेश दिला, “जे नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करतील, त्यांच्याशी कोणतीही गय नाही.”
हे शब्द नुसते बोलण्यापुरते नव्हते. अवघ्या तीन दिवसांत मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर या सात विभागांमध्ये एकाच वेळी ५३ ठिकाणी धाडी ! ३३ माफिया-आरोपींना थेट तुरुंगात, २७ आस्थापने सील आणि लाखो रुपयांचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करण्यात आला. FDA च्या इतिहासातील ही सर्वात मोठी आणि सर्वात वेगवान कारवाई ठरली ! जे काम वर्षानुवर्षे झाले नाही, ते मुंढे यांनी फक्त तीन दिवसांत करून दाखवले. हे ऐकून सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
सरकारला जाहीर आवाहन !
आता जेव्हा मुंढे यांनी आपला धडाका सुरू केला आहे, तेव्हा सिस्टीममधील ‘किडे’ वळवळू लागले असणार यात शंका नाही. बडे अवैध व्यावसायिक, मिलावटखोर, औषध माफिया आणि त्यांचे राजकीय आका एकत्र येतील. पैशाच्या बळावर, सत्तेच्या दबावाचा वापर करून किंवा ब्लॅकमेलिंग करून तुकाराम मुंढे यांची इथून कशी उचलबांगडी करता येईल, यासाठी रणनीती आखली जाईल.
म्हणूनच जनतेची सरकारकडे एक स्पष्ट आणि ठाम मागणी आहे, कोणत्याही दबावाला बळी पडू नका ! समोर कितीही मोठा माफिया असो, कितीही कोट्याधीश पैसेवाला असो, किंवा कितीही वजनदार राजकीय दबाव असो, त्यांच्या धमक्यांना, ब्लॅकमेलिंगला किंवा कोणत्याही आमिषाला सरकारने भीक घालता कामा नये. सरकारने जे धाडस दाखवून मुंढे यांची नियुक्ती केली, तेच धाडस आता या माफियांचे साम्राज्य उद्धवस्त करण्यासाठी दाखवावे. या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी ढाल म्हणून सरकारने उभे राहावे, हीच उभ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे.
फक्त २ वर्षे स्थैर्य द्या- महाराष्ट्र बदलेल !
जनतेच्या मनात एक जुनी, वेदनादायक भीती पुन्हा डोकावत आहे , ‘आता मुंढे यांची पुन्हा बदली होते की काय ?’ इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा मुंढे भ्रष्टाचाऱ्यांची अडचण वाढवतात, तेव्हा तेव्हा बदलीचा आदेश येतो. प्रत्येक वेळी एक चांगली सुरुवात अर्धवट सोडून जावी लागते.
जर येत्या दोन वर्षांत मुंढे या पदावर स्थिरपणे काम करू शकले, तर…
- बनावट आणि नकली औषधे बाजारातून बऱ्याच अंशी नष्ट होतील, रुग्णांचे जीव वाचतील
- अन्नभेसळीवर मोठा अंकुश बसेल, नागरिकांना शुद्ध अन्न आणि विषमुक्त दूध मिळेल
- गोरगरीब माणसाचा आजारपणावरील अनावश्यक खर्च थांबेल, त्यांची आर्थिक प्रगती होईल
- भ्रष्ट अधिकारी आणि मिलावटखोर माफियांचे धाबे दणाणतील, दोषींवर कारवाई होईल.
- सरकारी यंत्रणा स्वच्छ आणि पारदर्शकतेकडे वाटचाल करेल
- महाराष्ट्राचे FDA संपूर्ण देशात आदर्श मॉडेल म्हणून नावाजले जाईल
चेंडू आता सरकारच्या कोर्टात !
जनता सरकारला थेट विचारत आहे की, तुम्हाला ११ कोटी जनतेचे आरोग्य आणि आशीर्वाद हवे आहेत, की काही मोजक्या माफियांची ब्लॅकमेलिंग आणि दबाव ? सरकारने मुंढे यांना FDA वर नियुक्त करण्याचे ऐतिहासिक धाडस दाखवले, जनता त्याबद्दल मनापासून कृतज्ञ आहे. आता तेच धाडस टिकवण्याची वेळ आहे. सरकारने महाराष्ट्रातील जनतेवर फक्त एकच उपकार करायचा आहे…
“किमान दोन वर्षे तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या फाईलला हात लावला जाऊ नये. त्यांच्यावर कोणत्याही राजकीय नेत्याचा, माफियाचा, श्रीमंत उद्योजकाचा किंवा कोणत्याही दबावगटाचा दबाव आणला जाऊ नये. त्यांना निर्भीडपणे, स्वतंत्रपणे आणि इमानदारीने काम करण्याची पूर्ण मुभा दिली जावी.”
जर सरकारने हे केले, तर हा उपकार कोणत्याही सरकारी योजनेपेक्षा कितीतरी मोठा ठरेल. याचा लाभ कोणा एका जाती, धर्म वा पक्षाला नाही, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला मिळेल.
आणि जर नेहमीप्रमाणे दबावापोटी मुंढे यांची तडकाफडकी बदली केली गेली, तर जनता एकच अर्थ काढेल: नियुक्तीचे धाडस सरकारने दाखवले, पण ते टिकवण्याचे धैर्य दाखवता आले नाही. एवढंच नव्हे तर असाही अर्थ निघेल की, सरकार प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी नसून भेसळखोरांच्या आणि माफियांच्या बाजूने उभे आहे.
आजघडीला सरकारने तुकाराम मुंढे यांची FDA च्या आयुक्तपदी नियुक्ती केल्याने सरकारचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे, सरकारने नियुक्तीचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे, आता ते टिकवण्याचे राजकीय धैर्य दाखवावे. सरकारने महाराष्ट्राच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांचा ‘काळ’ बनून आलेल्या तुकाराम मुंढे यांना स्थैर्य देवून सरकार प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभी आहे असा स्पष्ट संदेश द्यावा.
तुकाराम मुंढे यांना निर्भीडपणे, स्वतंत्रपणे आणि इमानदारीने काम करण्याची पूर्ण मुभा दिली जावी. हीच जनतेची इच्छा आहे, हाच जनतेचा एल्गार आहे आणि हाच जनतेच्या मनातला खरा आवाज आहे !
- परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज (जालना)
9890515043