Your Alt Text

IAS नवदाम्‍पत्‍य आले 1300 KM पार ! जालना जिल्‍ह्याला मिळणार का वेगवान कारभार ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
महाराष्ट्र सरकारने मागील काळात म्‍हणजेच 2 एप्रिल 2026 रोजी 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यामध्ये 2022 बॅचच्या IAS अंजली शर्मा आणि त्यांचे पती IAS कृष्णकांत कांवरिया यांची जालना जिल्ह्यात एकाच वेळी नियुक्ती करण्यात आली होती. अंजली शर्मा यांची जालना महानगरपालिका आयुक्त म्हणून, तर कृष्णकांत कांवरिया यांची जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशा प्रकारे पत्‍नी शहराच्या, तर पती गावांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहेत.

दोन्‍ही एकाच बॅचचे अधिकारी !

आयएएस कृष्णकांत कांवरिया आणि अंजली शर्मा हे एकाच बॅचचे अधिकारी आहेत. संघ लोक सेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2021 या दोघांनीही एकत्र उत्तीर्ण केली. आयएएस अधिकारी कृष्णकांत कांवरिया हे मूळचे राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील कुचामन शहराचे रहिवासी आहेत. तर अंजली शर्मा या मूळच्या बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील मोरवा प्रखंडातील सारंगपूर पश्चिम पंचायत येथील आहेत. यूपीएससीपूर्वी अंजली यांनी बीपीएससी (BPSC) उत्तीर्ण करून आरडीओ (RDO) म्हणूनही काम केले आहे.

दोन्‍ही IAS ची लव्हस्टोरी !

यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण मसुरी येथील ‘लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी’ (LBSNAA) मध्ये झाले. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि पुढे त्याचे रूपांतर प्रेमात झाले. कृष्णकांत यांना झारखंड आणि अंजली यांना महाराष्ट्र कॅडर मिळाले होते. झारखंड आणि महाराष्ट्र यामधील अंतर सुमारे 1300 किलोमीटर आहे. लग्नानंतर जानेवारी वर्ष 2026 मध्ये कृष्णकांत कांवरिया झारखंडहून महाराष्ट्र कॅडरमध्ये बदली करून आले, जेणेकरून दोघेही एकत्र राहू शकतील. आता ही आयएएस जोडी जालना जिल्ह्यात एकत्र येऊन विकासाची जबाबदारी सांभाळत आहे.

आता विकासाची जबाबदारी !

जालन्यात अंजली शर्मा आणि कृष्णकांत कांवरिया या IAS नवदाम्पत्याची नियुक्ती होऊन आता बरेच दिवस झाले आहे. सुरुवातीला त्यांच्या प्रेमकथेची, 1300 किलोमीटर अंतर पार करून एकत्र आलेल्या त्यांच्या प्रवासाची मोठी चर्चा झाली. मात्र आता तो चर्चेचा टप्पा संपला असून खरी परीक्षा सुरू झाली आहे ती कामाची, कारभाराची आणि जनतेच्या अपेक्षांची. कारण जालन्याला आता ढिम्‍म प्रशासन नको आहे. जालन्याला हवा आहे वेगवान, पारदर्शक आणि परिणामकारक कारभार…

अंजली शर्मांकडून अपेक्षा !

महानगरपालिका आयुक्त म्हणून अंजली शर्मा यांनी शहरातील कामकाजाला काही प्रमाणात गती दिल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे. शहर प्रशासनातील फाईली हलताना दिसत आहेत, तर काही नागरी प्रश्नांवर थेट लक्ष केंद्रीत होत असल्याची चर्चा आहे. ही सकारात्मक सुरुवात निश्चितच महत्त्वाची आहे. कारण जालना शहराला गेल्या काही काळात स्थिर आणि परिणामकारक नेतृत्वाची गरज होती. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, अतिक्रमण, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, नियोजन आणि भ्रष्‍टाचार या प्रश्नांनी नागरिकांना अक्षरशः हैराण केले आहे. त्यामुळे शहरातील नागरिक आता केवळ बैठका किंवा पाहणी दौऱ्यांपेक्षा प्रत्यक्ष बदलाची अपेक्षा ठेवून आहेत.

कृष्‍णकांत कांवरियांकडून अपेक्षा !

ग्रामीण भागाचा विकास ठप्‍प झालेला असतांना आता खरी परीक्षा आहे ती CEO कृष्‍णकांत कांवरिया यांची… त्यामुळेच जिल्हा परिषदेचा कारभार सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कृष्णकांत कांवरिया यांच्याकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे. कारण जिल्‍ह्याचा ग्रामीण भाग आजही अनेक मूलभूत समस्यांशी झुंज देत आहे. शिक्षण, आरोग्य, पाणी, स्वच्छता, महिला व बालविकास, ग्रामविकास, बांधकाम, रस्ते आणि पायाभूत सुविधा या सर्व विभागांना नव्या ऊर्जेची आणि कठोर प्रशासनाची गरज आहे.

स्थानिक पातळीवर एक स्पष्ट भावना दिसून येते, जिल्हा परिषदेची यंत्रणा अक्षरशः “सलाईनवर” असल्यासारखी वाटते. कामाची गती मंदावलेली, निर्णय प्रक्रियेत दिरंगाई, जबाबदारी निश्चित नसणे, आणि अनेक विभागांमध्ये उदासीनता अशी परिस्थिती असल्याची टीका सातत्याने होत असते. सामान्य नागरिकाला छोट्या कामासाठीही वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. योजनांची अंमलबजावणी वेळेत होत नाही, तर काही ठिकाणी कामे कागदावर जास्त आणि प्रत्यक्षात कमी दिसतात. भ्रष्‍टाचाराचे आणि टक्‍केवारीचे किस्‍से सुध्‍दा वारंवार ऐकायला मिळतात, अशा परिस्थितीत नव्या सीईओंकडून लोकांच्या अपेक्षा स्वाभाविकपणे वाढल्या आहेत.

जिल्हा परिषदेचा इतिहास पाहिला, तर जालन्यात येणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांकडून सुरुवातीला मोठ्या अपेक्षा निर्माण होतात. अधिकारी उत्साहाने काम सुरू करतात, आढावा बैठका घेतात, विभागांना सूचना देतात; पण काही दिवसांनी परिस्थिती पुन्हा जुन्याच मार्गावर जात असल्याचा अनुभव जनतेला आहे. लोकांच्या भाषेत सांगायचे तर, येथे येणाऱ्या अधिकाऱ्यांवर अशी काही “जादू” होते की सुरुवातीचा वेग हळूहळू कमी होत जातो. त्यामुळे आता जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे, कृष्णकांत कांवरिया या व्यवस्थेच्या “जादू” ला बळी पडणार की स्वतःचा ठसा उमटवणार?

यापूर्वीचा अनुभव !

तत्‍कालीन CEO मिन्‍नू पी.एम. यांनी सुरूवातीच्‍या आठवडाभरात जिल्‍हा परिषदेतील यंत्रणा अशी कामाला लावली होती की, अधिकारी वर्ग अक्षरश: पळतांना दिसून आले, संपूर्ण जिल्‍हा परिषदेत सुरूवातीच्‍या आठवड्यात एक प्रकारचा धाक निर्माण झाल्‍याचे दिसून आले, परंतू अवघ्‍या आठवडाभरानंतर फुग्‍यातून हवा काढून घ्‍यावी तसा काही प्रकार दिसून आला, अर्थात जिल्‍हा परिषदेत येणाऱ्या अधिकाऱ्याला अवघ्‍या काही दिवसातच येथील “अर्थपूर्ण” वातावरणाच्‍या “जादू” ने असे काही सम्‍मोहीत केले जाते की कडक आणि कर्तव्‍यदक्ष अधिकारी सुध्‍दा अचानक वातावरणाच्‍या तालावर नाचू लागतात.

ZP – ग्रामीण विकासाचा कणा !

जिल्हा परिषद ही केवळ प्रशासकीय इमारत नाही; ती ग्रामीण जीवनाचा कणा आहे. गावातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, अंगणवाड्या, पाणीपुरवठा योजना, ग्रामस्वच्छता, ग्रामीण रस्ते आणि विकासकामे यांचा थेट संबंध जिल्हा परिषद प्रशासनाशी असतो. त्यामुळे येथे बसलेला अधिकारी फक्त फाईल्स पाहणारा नसून हजारो कुटुंबांच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकणारा असतो. म्हणूनच कृष्णकांत कांवरिया यांनी केवळ कागदी आढावे न घेता प्रत्यक्ष गावपातळीवर उतरण्याची गरज आहे.

जालन्यातील सामान्य नागरिकांच्या मनात आणखी एक अपेक्षा ठळकपणे आहे, प्रशासनातील सुस्ती आणि कथित दबावतंत्राला आवर घालण्याची. अनेकदा एखादा अधिकारी चांगल्या हेतूने काम सुरू करतो, पण पुढे यंत्रणेतच त्याचा वेग मंदावतो, अशी भावना तयार झाली आहे. त्यामुळे नव्या नेतृत्वाने दबावाला बळी न पडता, जबाबदारी निश्चित करून, भ्रष्टाचार आणि दिरंगाईवर कठोर भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे. अधिकारी बदलले तरी व्यवस्था बदलत नाही, अशी निराशा जनतेच्या मनातून दूर करायची असेल, तर आता कृतीतून संदेश द्यावा लागेल.

घोटाळ्याची चौकशी करणार का ?

जालना जिल्‍ह्यातील शेकडो गावात जलजीवन मिशन अंतर्गत “हर घर जल महाघोटाळा” झाल्‍याचे एलगार न्‍यूजने पुराव्‍यासह उघडकीस आणले आहे, शिवाय टेंडर प्रक्रियेतही मोठा घोळ झाल्‍याचे पुराव्‍यासह समोर आणले आहे. (बातमीची लिंक खाली दिली आहे.) सदरील घोटाळ्याची चौकशी करणे आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्‍हे दाखल करून योग्‍य ती कारवाई करणे हे जिल्‍हा परिषद CEO कृष्‍णकांत कांवरिया यांच्‍यासमोर मोठे आव्‍हान आहे. ते सदरील आव्‍हान स्विकारतात की यंत्रणेच्‍या जादूला बळी पडतात हे लवकरच समोर येणार आहे.

दोघांना चांगली संधी !

अंजली शर्मा यांच्याकडून शहराच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा आहे, तर कृष्णकांत कांवरिया यांच्याकडून ग्रामीण भागाला नवसंजीवनी देण्याची. या दोघांची नियुक्ती ही केवळ प्रशासकीय घटना नाही; ती जालन्यासाठी मोठी संधी आहे. मात्र ही संधी तेव्हाच यशस्वी ठरेल, जेव्हा प्रशासन जनतेला दिसेल, निर्णयांना वेग येईल आणि कामांचा प्रत्यक्ष परिणाम गावागावांत जाणवेल.

आज जालन्याला केवळ आश्‍वासन देणारे अधिकारी नकोत तर जालन्याला प्रत्‍यक्ष कृतीतून विकास दाखवून देणारे अधिकारी हवेत. प्रेम आणि कौटुंबिक जीवनासाठी 1300 किलोमीटर अंतर पार करून हे नवदाम्पत्य महाराष्ट्रात एकत्र आले, ही गोष्ट प्रेरणादायी आहेच. पण आता जालन्याच्या जनतेची अपेक्षा एकच आहे, तीच जिद्द, तीच प्रामाणिकता आणि तसेच शर्थीचे प्रयत्‍न जिल्ह्याच्या विकासातही दिसले तर शहर आणि जिल्‍ह्याचा विकास झपाट्याने होण्‍यास वेळ लागणार नाही.

  • परवेज पठाण,
    संपादक, एल्‍गार न्‍यूज
    9890515043


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!