एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यात विविध ठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत असून कुंभार पिंपळगाव शिवारात शेतातील सोलार पंपचे इलेक्ट्रिक केबलची चोरी झाल्याने चोरीचे सत्र केव्हा थांबणार असा सवाल शेतकरी करीत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभार पिंपळगाव येथील शेतकरी गणेश बाबासाहेब कंटुले यांची कुंभार पिंपळगाव शिवारात गट क्र.७८ मध्ये शेतील असून त्यांनी शासनाच्या मागेल त्याला सौरपंप योजनेतून विहीरीवर सोलार पंप बसविले होते. मात्र दि.२ रोजी ते शेतात गेले असता त्यांना विहीरीवर बसवलेल्या सोलार पंपचे इलेक्ट्रिक केबल वायर दिसून आले नाही. ३२०० रूपये किमतीचे अंदाजे ७० फुट केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.
तसेच त्यांच्याच शेजारी असलेले विष्णू भिवराजी शिंदे यांच्या गट क्र.७७ मधील विहीरीवरील सोलार पंपाचे अंदाजे ७० फुट इलेक्ट्रिक केबल वायर तसेच जुन्या इलेक्ट्रिक मोटारीचे ५० फुट केबल वायर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.
चोरीच्या घटनांमध्ये वाढ !
कधी इलेक्ट्रिक केबल तर कधी पाण्यातील मोटार, कधी डाव्या कालव्यातून पाणी घेण्यासाठी असलेल्या मोटार, कधी सोलार प्लेट तर कधी शेतीचे इतर साहित्य चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, परंतू या चोरट्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. चोरीच्या घटना वारंवार घडत असतांना कोणत्याच चोरीच्या घटनांचा तपास का लागत नाही असा सवाल शेतकरी करीत आहेत. आधीच शेतकरी आस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे हैराण आहेत, त्यात अशा चोरीच्या घटनांमुळे शेतकरी हतबल होत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने घडलेल्या चोरीच्या घटनांचा सखोल तपास करून चोरट्यांना गजाआड करावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
तपास सुरू आहे !
याबाबत घनसावंगी पोलीस ठाण्याच्या प्रभापी तथा आयपीएस जान्हवी शेखर यांच्याशी संपर्क साधला असता सदरील घटनेचा तपास सुरू आहे. असे त्यांनी सांगितले.