Your Alt Text

कुंभार पिंपळगांव ग्रामपंचायतने खर्च केलेल्‍या लाखो रूपयांच्‍या निधीचा हिशोब लागेना ? ग्रामपंचायत सदस्‍यांची BDO कडे तक्रार !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर सदस्‍यांनी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा नियमबाह्य व अनधिकृत वापर झाल्याचा आरोप करण्‍यात आला आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीच्या संतप्त सदस्यांनी थेट घनसावंगीच्‍या गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून विशेष आर्थिक व प्रशासकीय चौकशीची मागणी केली आहे.

ग्रामपंचायत सदस्यांनी प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. संबंधित ग्रामपंचायत सचिव (ग्रा.पं.अधिकारी) यांनी कुंभार पिंपळगावचा अतिरिक्त पदभार घेतल्यापासून मासिक सभेमध्ये झालेल्या चर्चेचे व निर्णयांचे अधिकृत इतिवृत्त (प्रोसीडिंग बुक) नियमितपणे नोंदवलेले नाही किंवा ते सदस्यांना उपलब्ध करून दिलेले नाही. या कारभारामुळे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव निर्माण झाला आहे. सर्वात मोठा आरोप असा आहे की, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत सदस्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता किंवा अधिकृत सभेमध्ये आवश्यक ठराव मंजूर न करता परस्पर निधी खर्च करण्यात आला आहे.

सदर खर्च कोणत्या ठरावाच्या आधारे व कोणत्या कामासाठी करण्यात आला, याला प्रशासकीय किंवा तांत्रिक मान्यता आहे का, तसेच संबंधित खर्चाची बिले, व्हाउचर व मोजमाप पुस्तिका उपलब्ध आहेत का, याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने निधीचा नियमबाह्य वापर झाल्याचा तीव्र संशय सदस्यांनी व्यक्त केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी यासाठी सदस्यांनी पत्राद्वारे महत्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. यामध्ये सचिवाने अतिरिक्त पदभार घेतलेल्या कालावधीतील सर्व मासिक सभांच्या मूळ इतिवृत्त पुस्तिकेची तपासणी व्हावी, तसेच १५ व्या वित्त आयोग निधीच्या बँक खात्याचे स्टेटमेंट, कॅशबुक, लेजर, खर्च नोंदवही, बिल-व्हाउचर आणि ऑनलाइन व्यवहारांच्या तपशिलांचे बारकाईने ऑडिट करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

बैठकीत प्रत्यक्षात मंजूर न झालेल्या बाबींचे ठराव नंतर मागच्या तारखेने बोगस पद्धतीने तयार करण्यात आले आहेत का, याची पडताळणी करून संबंधित कामांसाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, अंदाजपत्रक, कार्यआदेश आणि मोजमाप पुस्तिका तपासली जावी. तसेच मासिक सभेचे इतिवृत्त वेळेवर न लिहिणाऱ्या संबंधित सचिवाची जबाबदारी निश्चित करून त्याच्यावर योग्‍य ती कारवाई करावी आणि चौकशीत गैरव्यवहार सिद्ध झाल्यास जबाबदार व्यक्तींकडून शासकीय रक्कमेची तात्काळ वसुली करून दोषींवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केली आहे. प्रशासनाने यावर तात्काळ दखल घेऊन विशेष चौकशी न लावल्यास वरिष्ठ पातळीवर दाद मागण्याचा इशारा सदस्यांनी दिला आहे.

निवेदनावर ग्रामपंचायत सदस्‍य आबासाहेब राऊत, कांताबाई चव्‍हाण, गंगुबाई पांचाळ, विजय कंटुले, रफीक कुरेशी, महेमदाबी कुरेशी, शमिनाबी पठाण, भगवान शिंदे, विठ्ठल राऊत, प्रकाश बिलोरे, यमुना शिंदे यांची नावे आहेत.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!