संपादकीय (परवेज पठाण) :-
१५ ऑगस्ट आला की तिरंगा अभिमानाने फडकतो, राष्ट्रगीताने वातावरण भारावून जाते आणि देशभक्तीच्या शुभेच्छांनी सोशल मीडिया भरून जातो. हे चित्र निश्चितच अभिमानास्पद आहे. मात्र, याच दिवशी स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे, देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण देश घडवण्याच्या प्रवासात आपले योगदान किती आहे ?
आजचा भारत वेगाने बदलतो आहे. तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, डिजिटल व्यवस्था, उद्योग, शिक्षण आणि अंतराळ संशोधन अशा अनेक क्षेत्रांत देशाने मोठी झेप घेतली आहे. जग भारताकडे आशेने पाहत आहे. मात्र, या प्रगतीसोबत बेरोजगारी, महागाई, शिक्षणाची गुणवत्ता, आरोग्य, शेतकऱ्यांच्या अडचणी, कौशल्यांचा अभाव आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानासमोरील आव्हानेही आहेत. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. पण त्यासाठी केवळ सरकारकडे किंवा व्यवस्थेकडे बोट दाखवूनही प्रश्न सुटणार नाहीत. सरकारे येत असतात, जात असतात. सरकारची जबाबदारी नक्कीच आहे, परंतू देश हा केवळ सरकारचा नसतो; देश प्रत्येक नागरिकाचा असतो.

आजची तरुणाई ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. अनेक तरूण – तरूणी विविध क्षेत्रात आपले आणि देशाचे नावलौकीक करत आहेतच, मात्र तरीही मोठ्या प्रमाणावर तरुणाईचा वेळ सोशल मीडिया, अनावश्यक मनोरंजन, दिशाहीन चर्चा, फेक न्यूज आणि राजकीय ध्रुवीकरणात खर्च होताना दिसतो. हातात स्मार्टफोन असणे ही प्रगती नाही; त्या तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञान, कौशल्य आणि संधी निर्माण करण्यासाठी करणे ही खरी प्रगती आहे. मतभेद असणे लोकशाहीचे सौंदर्य आहे; पण मतभेदांचे रूपांतर द्वेषात होणे देशाच्या भवितव्यासाठी घातक आहे. आपल्याला प्रत्येक समस्येचे समाधान स्वत: करणे शक्य नाही. पण आपण समस्येचा भाग न होता समाधानाचा भाग बनू शकतो.
रस्त्यावर कचरा दिसला तर तो फक्त प्रशासनाचा विषय आहे असे न मानणे, वाहतुकीचे नियम पाळणे, अफवा पुढे न पाठवणे, चुकीच्या माहितीची पडताळणी करणे, मतदान करताना जबाबदारीने निर्णय घेणे, आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणे, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणे, एखाद्या तरुणाला कौशल्य शिकण्यासाठी प्रोत्साहन देणे, ही आणि अशी छोटी वाटणारी कामेच मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतात.

आपल्या प्रत्येकावर कुटुंबाची जबाबदारी आहे, कोणी नोकरी करतो, कोणी व्यवसाय करतो, कोणी शेतात राबून, मोलमजूरी करून किंवा हाताला मिळेल ते काम करून आपला प्रपंच चालवतो, प्रत्येकावर जबाबदाऱ्या आहेत आणि स्वतःचे प्रश्न आहेत. त्यामुळे पूर्ण वेळ समाजासाठी देणे प्रत्येकाला शक्य नाही. पण दिवसातील काही मिनिटे, आठवड्यातील काही तास किंवा महिन्यातील एखादा दिवस देश आणि समाजासाठी देणे नक्कीच शक्य आहे.
कोणी चांगले काम करत असेल तर त्याला अडवण्यापेक्षा पाठबळ देऊया. प्रामाणिकपणे एखादा शिक्षक, अधिकारी, कर्मचारी उत्तम काम करत असेल, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार एखाद्या समस्येसाठी झटत असेल, अन्याया विरूध्द आवाज उठवत असेल, तरुण स्वतःचा व्यवसाय उभारत असेल किंवा एखादा नागरिक परिसर सुधारण्यासाठी पुढाकार घेत असेल, तर त्यांच्या प्रयत्नाला प्रोत्साहन देणे हीदेखील देशसेवाच आहे.
आपल्या सीमेवर सैनिक देशाचे रक्षण करत आहेत. त्यांच्या त्यागाला तोड नाही. मात्र, देशाच्या सीमांचे रक्षण सैनिक करत असताना देशाच्या अंतर्गत समस्या सोडवण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येकाची आहे. व्यवस्था बदलण्यासाठी नेहमी मोठ्या क्रांतीची गरज नसते. लाखो नागरिकांनी आपापल्या क्षेत्रात थोडेसे अधिक प्रामाणिक, जबाबदार आणि संवेदनशील होण्याचा निर्णय घेतला, तरी त्या छोट्या प्रयत्नांची बेरीज प्रचंड मोठी असेल.
या स्वातंत्र्यदिनी सरकारकडून अपेक्षा ठेवूया, वेळप्रसंगी आवाज उठवू या, व्यवस्थेकडून प्रश्न विचारूया; पण त्याच वेळी स्वतःलाही एक जबाबदारी देऊया. देश विकसित होण्यासाठी केवळ मोठ्या योजना पुरेशा नाहीत; त्या योजनांना साथ देणारे जागरूक, कुशल, प्रामाणिक आणि जबाबदार नागरिकही आवश्यक आहेत. १५ ऑगस्टला तिरंग्याला सलाम करताना एवढेच ठरवूया, देश माझ्यासाठी काय करतो, हा प्रश्न विचारण्याबरोबरच ‘देशासाठी मी काय करू शकतो?’ हा प्रश्नही स्वतःला विचारूया. कारण देशाची प्रगती ही कोण्या एका व्यक्तीची किंवा व्यवस्थेची जबाबदारी नाही; ती आपल्या सर्वांच्या छोट्या-छोट्या योगदानातून घडणारी सामूहिक जबाबदारी आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या आपणास मन:पूर्वक शुभेच्छा…
- परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज