Your Alt Text

कुंभार पिंपळगावच्या तरुणाची कौतुकास्पद कामगिरी ! मोबाईलवर एका क्लिकमध्ये SIR यादीतील नाव पाहण्याची सुविधा !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
मनात जिद्द, शिकण्याची तयारी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असेल, तर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होऊ शकते, याचा प्रत्यय घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील युवा तंत्रज्ञानप्रेमी शाहेद उस्मान शेख यांच्या उपक्रमातून येत आहे. कोडींगचे कोणतेही औपचारिक ज्ञान नसतानाही त्यांनी उपलब्ध तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करून SIR Draft यादीत आपले नाव एका क्लिकवर शोधता येईल, अशी वेबसाईट विकसित केली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरत आहे.

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील शाहेद उस्मान शेख (वय ३२) हे गेल्या काही वर्षांपासून CSC व मल्टिसर्व्हिसेसचा व्यवसाय करीत असून संगणक क्षेत्राशी त्यांचा सातत्याने संबंध आहे. सामाजिक कार्यातही ते नेहमीच अग्रेसर असतात. SIR ची Draft यादी पाहताना हजारो नावांच्या यादीत एखाद्या व्यक्तीचे नाव शोधणे हे वेळखाऊ आणि कष्टाचे काम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विशेषतः सामान्य कष्टकरी, कामगार, शेतकरी व शेतमजूर नागरिकांना मोठ्या यादीत आपले नाव शोधणे अनेकदा अवघड ठरू शकते. ही अडचण लक्षात घेऊन ‘यावर काहीतरी सोपा पर्याय काढता येईल का?’ या विचारातून शाहेद शेख यांनी स्वतः संशोधन सुरू केले.

उपलब्ध Online / Offiline Tools आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी कुंभार पिंपळगावातील SIR यादीतील माहिती Text स्वरूपात रूपांतरित करून ती वेबसाईटवर उपलब्ध करून देण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यासाठी त्यांनी पूर्वीपासूनच त्यांच्या नावाने उपलब्ध असलेल्या डोमेनचा वापर करून एका क्लिकवर मतदाराचे नाव शोधता येईल अशी सुविधा विकसित केली.

EPIC क्रमांक टाकल्‍यावर क्षणात माहिती !

या वेबसाईटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे Data Privacy च्‍या दृष्‍टीनेही काळजी घेण्‍यात आली आहे. संपूर्ण यादी पानोपानी सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध न करता Search Box च्या माध्यमातून आवश्यक माहिती शोधण्याची सुविधा देण्यात आली आहे. मतदाराला आपला EPIC नंबर अथवा नाव टाकून शोध घेता येतो. नावाच्या स्पेलिंगमध्ये अडचण असल्यास वडिलांच्या नावाच्या आधारेही शोध घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यादीत नाव असल्यास संबंधित व्यक्तीचे नाव, वय, वडिलांचे नाव, घर क्रमांक, अनुक्रमांक आदी माहिती तात्काळ दिसून येते. याशिवाय वेबसाईटवर संबंधित मतदारसंघ, तालुका, जिल्हा, गावातील मतदान केंद्रांची माहिती आणि एकूण मतदारसंख्या यांसारखी माहितीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या कुंभार पिंपळगाव येथील SIR Draft यादीतील ६,३८४ मतदारांची नावे तपासण्याची सुविधा या वेबसाईटवर उपलब्ध असून, PC तसेच मोबाईलवरून एका क्लिकवर आपले नाव तपासता येते.
वेबसाईट : https://shahedshaikh.in/voter

तंत्रज्ञानासोबत सामाजिक बांधिलकीही !

शाहेद शेख यांचे वैशिष्ट्य केवळ तंत्रज्ञानाच्या प्रयोगांपुरते मर्यादित नाही. सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड असून गावातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात. मागील काळात रहेमानिया नगर परिसरातील नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या शेतातून स्वखर्चाने पाईपलाईन करून मोफत पाणीपुरवठा केला होता. तसेच कुंभार पिंपळगावातील अनेक गोरगरीब नागरिकांना मोफत मतदान कार्ड काढून देण्यासाठी त्यांनी सहकार्य केले आहे. गावातील विविध सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

प्रशिक्षणापेक्षा जिज्ञासा मोठी !

विशेष म्हणजे शाहेद शेख यांना Technology मध्ये विशेष रस असून, उपलब्ध Online माध्यमांचा वापर करून तांत्रिक समस्यांवर स्वतः उपाय शोधण्याची त्यांची हातोटी आहे. कोणतेही विशेष औपचारिक प्रशिक्षण नसतानाही संगणक रिपेअरिंगसह विविध तांत्रिक कामे ते सहजपणे करतात. नवनवीन प्रयोग करण्याची त्यांची जिज्ञासा आणि ‘समस्या आली की त्यावर उपाय शोधायचा’ हा दृष्टिकोन त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवतो. सध्या आधुनिक शेतीच्या दृष्टीनेही तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

अशा तरुणांना प्रोत्साहनाची गरज !

ग्रामीण भागात राहून CSC (Multiservices) व्यवसाय सांभाळत असतानाच कोणतेही विशेष तांत्रिक प्रशिक्षण नसताना संगणक क्षेत्रात प्रयोग करणे, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि त्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी करणे, ही निश्चितच उल्लेखनीय बाब आहे. शाहेद शेख यांच्यासारख्या जिज्ञासू, प्रयोगशील आणि स्वयंशिक्षित तरुणांना शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी योग्य संधी दिल्यास ग्रामीण भागातूनही लोकहिताचे अनेक तंत्रज्ञान आधारित उपक्रम आणि स्टार्टअप्स उभे राहू शकतात.

तंत्रज्ञानाची आवड, Research Mind, सामाजिक बांधिलकी आणि स्वतः शिकण्याची तयारी ही शाहेद शेख यांची जमेची बाजू आहे. भविष्यात शासन-प्रशासनाच्या विविध लोकाभिमुख उपक्रमांमध्ये त्यांच्या कौशल्याचा उपयोग होऊ शकतो. ग्रामीण मातीतून पुढे येणाऱ्या अशा जिद्दी, प्रयोगशील आणि तंत्रज्ञानप्रेमी तरुणांना योग्य व्यासपीठ व प्रोत्साहन मिळाले, तर ते केवळ स्वतःची प्रगती साधणार नाहीत, तर समाजाच्या गरजा ओळखून त्या गरजांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवनवीन उपाय शोधणारे नवकल्पक म्हणूनही पुढे येऊ शकतात. शाहेद शेख यांच्यासारख्या तरुणांमध्ये उद्याचे यशस्वी उद्योजक आणि समाजोपयोगी नवकल्पक घडण्याची क्षमता आहे; अशा तरुणांना योग्य दिशा, संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास ग्रामीण भागातूनही अनेक नवे तंत्रज्ञान आधारित उपक्रम उभे राहू शकतात, यात शंका नाही.

  • परवेज पठाण,
    संपादक, एल्‍गार न्‍यूज

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!