एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी पुण्यात राज्याच्या विविध भागांतून तसेच इतर जिल्ह्यांतून अनेक रुग्ण येतात. रेडिएशन, केमोथेरपी यांसारख्या उपचारांसाठी रुग्णांना अनेक दिवस पुण्यात मुक्काम करावा लागतो. उपचारांचा वाढता खर्च आणि राहण्याची व्यवस्था यामुळे रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांसमोर मोठे आव्हान निर्माण होते.
परगावाहून आलेल्या अनेक रुग्णांची बऱ्याचदा राहण्याची व जेवणाची सोय होत नसते अशा परिस्थितीत रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटल परिसर, रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानकाच्या आसपास राहण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत रुग्णांच्या उपचारांसोबतच त्यांच्या निवासाची आणि दैनंदिन गरजांची काळजी घेणेही महत्त्वाचे ठरते. ही गरज लक्षात घेऊन इंटास फाऊंडेशनच्या ‘अपना घर’ या उपक्रमामार्फत कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या एका नातेवाईकासाठी सुरक्षित व सन्मानजनक निवासाची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘अपना घर’मध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना विविध सुविधा विनामूल्य दिल्या जातात. यामध्ये स्वच्छ व सुरक्षित निवास, सकाळचा नाश्ता आणि दोन वेळचे पौष्टिक जेवण, तसेच ‘अपना घर’ ते संबंधित हॉस्पिटलपर्यंत ये-जा करण्यासाठी वाहनाची सुविधा उपलब्ध आहे. उपचारादरम्यान निर्माण होणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशनाची सुविधाही दिली जाते.
उपचारासोबत मानसिक आधार
‘अपना घर’चा उद्देश केवळ राहण्याची सुविधा देणे नसून, कॅन्सरच्या उपचारादरम्यान रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक सामाजिक व भावनिक आधार देणे हा आहे. सुरक्षित निवास, भोजन, हॉस्पिटलपर्यंत वाहतूक आणि समुपदेशन यामुळे रुग्णांना उपचार प्रक्रियेवर अधिक लक्ष केंद्रित करता येते. पुण्यात उपचारासाठी येणाऱ्या गरजू कॅन्सर रुग्णांना या उपक्रमाचा लाभ घेता येतो.
‘अपना घर’ चा पत्ता :
सत्यमेव जयते बिल्डिंग, गल्ली नं. 2, गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे, मॅगझीन चौक, दिघी, पुणे.
कॅन्सरच्या उपचाराच्या कठीण काळात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना निवासासोबतच सुरक्षितता, आधार आणि मानसिक बळ देण्याचे काम ‘अपना घर’च्या माध्यमातून सुरू असून रूग्णांकडून 1 रूपयाही घेतला जात नाही. अधिक माहितीसाठी गरजू व्यक्ती 6358891462 किंवा 6358891457 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात अशी माहिती सुरज माळी व रमेश काळे यांनी दिली आहे.