एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
दिवाळी म्हटली की डोळ्यांसमोर येतात ते रोषणाईने उजळलेली घरे, अंगणातील सुंदर रांगोळ्या, आकाशकंदील, फराळाचा दरवळ, नवीन कपडे आणि आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी..! मात्र यंदाची दिवाळी मराठवाड्यासाठी काहीशी वेगळी आणि अधिक संवेदनशीलतेने साजरी करण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पीक आले नाही. शेतीवर अवलंबून असणारे शेतमजूर, छोटे व्यावसायिक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील अनेक घटक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत दिवाळी साजरी करताना आपल्या आनंदासोबत इतरांच्याही चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
संकट मोठे, पण जिद्द त्याहून मोठी
पावसाळा संपला, दुष्काळामुळे हाती काही लागले नाही. आज शिवार रिकामे आहे, विहिरींनी तळ गाठला आहे आणि हिशोबाची वही जड झाली आहे. गावातला दुकानदार गिऱ्हाईकांची वाट पाहत बसतो, कारण शेतकऱ्याच्या हातात पैसा नसेल तर त्याचा परिणाम संपूर्ण बाजारावर होतो. मात्र मराठवाड्याने दुष्काळ यापूर्वीही पाहिला आहे आणि प्रत्येक वेळी तो जिद्दीने पेलला आहे. संकट आले म्हणून खचणे हा या मातीचा स्वभाव नाही. कष्ट, परस्पर सहकार्य आणि एकजूट या बळावर या संकटावरही मात करता येते, हा विश्वास प्रत्येकाने मनात जपणे आवश्यक आहे. सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधींनी सुध्दा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे आणि शासनानेही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून शक्य ती मदत करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

शहरातून परतणारी लेकरे..!
अशा कठीण काळातही गावातल्या घरात एक आई दिवाळीची तयारी करत असते. हातात पैसा कमी असला तरी फराळाचे जिन्नस ती जमवतेच, कारण तिच्या मनात एकच आशा असते: माझे लेकरू यंदा नक्की येईल आणि आम्ही सगळे मिळून दिवाळी साजरी करू. नोकरी आणि शिक्षणासाठी शहरात गेलेल्या मुलाचा फोन आला की तिचा चेहरा उजळतो. “जेवलास का?” असे ती विचारते, पण तिच्या मनात खरा प्रश्न वेगळाच असतो: “दिवाळीला येणार ना?” तिला मुलाची कमाई मिळावी ही अपेक्षा नसते, पगार किती हेही तिला माहीत नसते. तिला हवी असते फक्त त्याची सोबत आणि दारातून येणारे “आई, मी आलो” हे शब्द… दुष्काळाच्या काळात आईवडिलांना सर्वाधिक आधार मुलांच्या उपस्थितीचा असतो. व्हिडिओ कॉलवर हसून बोलणे आणि पैसे पाठवणे म्हणजे कर्तव्य संपले, असा समज आता सोडणे गरजेचे आहे. कामाचे कारण सांगून “यंदा जमणार नाही” म्हणण्याची सवय बदलणे आवश्यक आहे. आज वेळ दिला नाही, तर उद्या वेळ असेल पण आईवडील नसतील, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे.
स्थानिक बाजारपेठेला साथ !
दुष्काळाचा परिणाम केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहत नाही. गावातील छोटे दुकानदार, कामगार, मजूर, कष्टकरी अशा सर्वांना त्याची झळ बसते. म्हणूनच यंदाची दिवाळीची खरेदी शक्यतो गावातील आणि जवळच्या बाजारपेठेतूनच करणे आवश्यक आहे. मोठे मॉल्स आणि ऑनलाइन खरेदीपेक्षा स्थानिक दुकानदारांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. कारागिरांनी बनवलेल्या विविध वस्तू असो किंवा छोट्या दुकानदारांकडून घेतलेली एखादी वस्तू असो, आपली एक खरेदी एखाद्या व्यावसायिकाच्या घरात दिवा लावते. गावात फिरणारा पैसा गावालाच बळ देतो. शहराने पैसा दिला असेल, पण गावाने ओळख दिली आहे, याची जाणीव ठेवून ही परतफेड करणे योग्य ठरेल.
आधार माणसाचाच असतो
दिवाळीचा खरा आनंद महागड्या कपड्यांत, मोठ्या भेटवस्तूंमध्ये किंवा दिखाऊ रोषणाईत नसतो, तो माणसांच्या चेहऱ्यावर फुलणाऱ्या हास्यात असतो. आपल्या परिसरातील गरजू कुटुंबाला फराळ पोहोचवणे, लहान मुलांना नवे कपडे देणे किंवा इतर आवश्यक वस्तू देणे, हे केवळ दान नसून माणुसकीचे कर्तव्य आहे. मात्र मदत करताना समोरच्याचा स्वाभिमान दुखावणार नाही, याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या काळात प्रत्यक्ष भेटीगाठी कमी झाल्या आहेत. यंदा नातेवाईक, शेजारी, गावातील ज्येष्ठ आणि शेतकरी बांधवांची आवर्जून विचारपूस करणे आवश्यक आहे. जुने वाद, रुसवे-फुगवे बाजूला ठेवून एकमेकांना जवळ घेणे गरजेचे आहे. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, व्यावसायिक आणि नागरिक अशा सर्वांनी आपापली जबाबदारी स्वीकारून सहकार्याचा हात पुढे करणे आवश्यक आहे. एकमेकांना दोष देण्यापेक्षा एकमेकांना साथ देणे हाच या संकटावरचा खरा उपाय आहे.
सामाजिक बांधिलकी !
अन्नदात्याच्या घामातून आपल्या ताटात अन्न येते. म्हणून अन्नाची नासाडी टाळणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पाणी अडवणे-जिरवणे, वृक्षसंवर्धन यांसारख्या उपक्रमांना गावपातळीवर प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे. आजचे छोटे प्रयत्न उद्याच्या पिढीसाठी मोठा आधार ठरतील. यंदा प्रत्येकाने मनाशी ठाम निर्धार करणे आवश्यक आहे: माझ्या घरातला आनंद इतरांच्या घरापर्यंत पोहोचवेन, स्थानिक व्यापाऱ्यांना साथ देईन, गरजूंना मदत करेन, पाणी वाचवेन आणि नाती अधिक घट्ट जपेन. कारण दिवाळीचा खरा प्रकाश पणत्यांमध्ये नसतो, तो माणसांच्या मनात असतो. एका घरातला दिवा दुसऱ्या घराला उजळवतो, तसाच एका माणसाचा चांगला प्रयत्न संपूर्ण गावाला नवी दिशा देतो.
पुन्हा सुखाचे दिवे उजळतील
दुष्काळाचे सावट मोठे आहे, पण मराठवाड्याची जिद्द त्याहून मोठी आहे. शेतकरी पुन्हा नव्या आशेने शिवारात उभा राहील आणि गावागावांत नवी पहाट उगवेल. आजचा अंधार कितीही गडद असला, तरी आशेचा एक किरण पुरेसा असतो, आणि तो किरण आपल्या एकजुटीतूनच उगवतो. पुढचा पाऊस नक्की येईल, शिवारे पुन्हा हिरवी होतील आणि याच दारात पुन्हा सुखाचे दिवे उजळतील, हा विश्वास मनात जपणे आवश्यक आहे.
आपल्या सर्वांची दिवाळी सुखाची, समाधानाची आणि समृद्धीची जावो..! आपणास दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!
- परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज
