एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
जायकवाडी प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी तीन आणि उन्हाळी हंगामासाठी एक अशी चार आवर्तने सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयाचे स्वागत करताना घनसावंगी मतदारसंघातील आमदार डॉ. हिकमत उढाण, माजी मंत्री राजेश टोपे आणि भाजपचे नेते सतीश घाटगे पाटील या तिघांच्याही प्रयत्नांचा उल्लेख करणारी बातमी दि.04 रोजी प्रकाशित करण्यात आली होती. कारण या तिन्ही नेत्यांकडून पाण्यासाठी पाठपुरावा झाल्याचे दावे आणि त्यासंदर्भातील पत्रव्यवहार, निवेदने आणि इतर माहिती समोर येत होती. त्यामुळे तिघांनाही समान महत्त्व देत वस्तुस्थितीच्या आधारे बातमी मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले, यात कोणाला मोठे आणि कोणाला छोटे दाखविण्याचा प्रश्नच नव्हता. (बातमी खाली पाहता येईल.)
मात्र, ही बातमी प्रसिद्ध होताच डॉ.हिकमत उढाण यांच्या एका तथाकथित समर्थकाला एवढी मिरची झोंबली की, त्याने सोशल मीडियावर राजेश टोपे आणि सतीश घाटगे पाटील यांच्या योगदानावर प्रश्न उपस्थित करत अपमानास्पद भाषा वापरली. एवढ्यावरच न थांबता हुकूमशाही थाटात एल्गार न्यूजच्या संपादकांसह पत्रकारांना अपमानित करणारी भाषा वापरून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांच्या प्रामाणिकपणावर आणि लेखणी स्वातंत्र्यावर अशा प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ही केवळ वैयक्तिक मळमळ नाही, तर पत्रकारितेचे स्वातंत्र्य आणि लोकशाही नाकारण्यासारखे आहे.
सदरील समर्थकाने पत्रकार आणि 2 नेत्यांबद्दल जे अकलेचे तारे तोडले ते खालील प्रमाणे :-
“बातम्या लावणाऱ्यांनी जरा भान ठेवावं, उगाचच काहीही बातम्या नको… जरा compare करून लावा बातम्या… स्वत:च्या दुकानदाऱ्या चालवायच्या म्हणून बातम्या लावू नका… त्या दोघांचं काय योगदान आहे…. जनतेची दिशाभूल करू नका मूठभर लोकांसाठी… माजी आमदाराचं कोण ऐकतं हे सांगा… आणि ते दुसरे ज्यांना अडीच लाखातून २० हजार मतदान पडले यांचा काय संबंध, त्यांना तर पक्षातून हाकलून दिले होते… जरा तथ्य असेल तर बातम्या लावा, उगाच लोकांनी बघितल्या पाहीजे असे करू नका, बातम्या लावतांना समोरच्याची कुवत बघा… ज्यांनी पंचवीस वर्षांत मतदारसंघात काही केले नाही त्यांच्या बद्दल कशाला बोलता…” असे सांगून एका नेत्याचा उल्लेख नारळ सम्राट, थापे सम्राट असा केला.
कोणाला कमी लेखू नका !
आमदार डॉ.हिकमत उढाण यांच्या उतावीळ आणि थयथयाट करणाऱ्या तथाकथित समर्थकाने राजकारण नक्की करावे, मात्र पातळी सोडून आणि अपमानित करणाऱ्या मानसिकतेतून आपण काय बोलत आहोत याचं भान ठेवावं, राजेश टोपे हे मंत्री असतांना घनसावंगी मतदारसंघातील विविध प्रश्नांवर सर्वात जास्त आणि अत्यंत तिखट शब्दात बातम्या कोणी घेतल्या हे पहावे, ज्यावेळेस त्यांच्या विरूध्द थेट बोलण्याची किंवा लिहीण्याची हिम्मत कोणी करत नव्हते तेव्हा रोखठोक शब्दात परवेज पठाण यांनीच बातम्या घेतल्या आहेत हे जगजाहीर आहे. कारण लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी म्हणून जो कोणी असेल त्यास जाब विचारणाऱ्या बातम्या घेणे हे पत्रकारांचे कामच आहे. मात्र कधीही त्यांनी किंवा त्यांच्या एकाही कार्यकर्त्याने किंवा पदाधिकाऱ्याने चुकीचा एक शब्द सुध्दा संपादक परवेज पठाण यांच्याबद्दल उच्चारला नाही किंवा धमकी दिली नाही किंवा दबाव टाकला नाही. राहीला प्रश्न राजेश टोपे यांच्या कुवतीचा तर माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या बद्दल टिका करण्यासारख्या अनेक गोष्टी असतीलही परंतू विधानसभा निवडणुकीत आमदार डॉ.हिकमत उढाण यांच्या जवळपास त्यांना मतदारांनी मतदान केले यावरून त्यांची कुवत सांगते. शिवाय त्यांनी सुरू केलेले कारखाने, संस्था, शाळा, कॉलेज आणि काही विकासकामांना नाकारता येणार नाही. हे आपल्याला म्हणता येईल की त्यांना बरंच काही शक्य होतं परंतू त्यांना ते करता आलं नाही, परंतू त्यांची काहीच व्हॅल्यू नाही हे म्हणणे निव्वळ मुर्खपणाचे आहे. जलसंपदा मंत्री यांच्यासोबत त्यांनी केलेली चर्चा आणि निवेदनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यांनी काहीच प्रयत्न केले नाही हे म्हणणे सुध्दा चुकीचेच आहे.
राहीला प्रश्न समृध्दी कारखान्याचे चेअरमन तथा भाजपचे नेते सतीश घाटगे पाटील यांचा तर या माणसाने अशा वेळी कारखाना सुरू केला जेव्हा लोक ऊस जात नाही म्हणून बांधावर ऊस तोडून फेकून देत होते किंवा जाळून टाकत होते, अक्षरश: अनेकांना रडतांना आम्ही डोळ्यादेखत पाहीले आहे, त्या काळात सतीश घाटगे पाटील यांनी अत्यंत विपरीत परिस्थितीत कारखाना सुरू करून हताश झालेल्या ऊस उत्पादकांना नवसंजीवनी देण्याचे काम केले. आपल्या शेतातून ऊस जाणार किंवा नाही ही भिती घालवण्याचे आणि विश्वास देण्याचे काम त्या काळात सतीश घाटगे पाटील यांनी केले हे नाकारून चालणार नाही. आज ऊसाच्या शेतीवर जे शेतकरी कोट्याधीश झाले त्यात इतरांप्रमाणेच सतीश घाटगे पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे हे सुध्दा तितकेच खरे आहे. बाकी त्यांचे योगदान अजून काय हे तपासून पाहील्यावर तुम्हाला लक्षात येईलच. अर्थातच सतीश घाटगे पाटील यांचा स्वभाव थोडा कठोर आहे आणि सर्वसामान्यांशी कनेक्ट होण्यात ते कमी पडतही असतील परंतू या माणसाचे सुध्दा योगदान विसरून चालणार नाही. त्यांनी सुध्दा जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडावे म्हणून पाठपुरावा केला याचे पुरावे सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. सतिश घाटगे पाटील यांच्यावर सुध्दा अनेकवेळा एल्गार न्यूजच्या माध्यमातून टिकात्मक लिखाण करण्यात आले होते, परंतू कधीही त्यांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपादक परवेज पठाण यांना कधीही अपमानास्पद शब्द बोलले नाही किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला नाही. आणि हेच लोकशाहीला अभिप्रेत आहे.
जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडावे म्हणून या तिन्ही आमदारांनीच नव्हे तर परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सुध्दा प्रयत्न केले आहेत आणि त्याचे पुरावे सुध्दा कालच एल्गार न्यूजकडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे डॉ.हिकमत उढाण असो, राजेश टोपे असो, सतीश घाटगे पाटील असो बबनराव लोणीकर असो किंवा मराठवाड्यातील सर्वपक्षीय अनेक आमदार, मंत्री, खासदार आणि नेत्यांनी प्रयत्न केले हे नाकारता येणार नाही. अर्थातच जलसंपदा मंत्री यांनी स्वत:च सर्वपक्षीच नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीची दखल घेण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
“तूफान ज्यादा हो तो कश्तियां डूब जाती हैं,
और घमंड ज्यादा हो तो हस्तियां डूब जाती हैं।”
पत्रकारांनी कोणाला विचारून बातम्या घ्यायच्या का ?
पत्रकारांनी किंवा एल्गार न्यूजचे संपादक परवेज पठाण यांनी कोणत्या बातम्या घ्यायच्या आणि कोणत्या घ्यायच्या नाहीत हे कोणी सांगण्याची आवश्यकता नाही. तो शहाणपणा कोणी करू नये. अजून काही हुकूमशाही सुरू झालेली नाही. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेला संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहु-आंबेडकर यांच्या विचारावर चालणाऱ्या लोकशाहीत आपण आहोत हे कोणी विसरू नये. त्यामुळे पत्रकारांनी काय लिहायचे काय नाही हे पत्रकारच ठरवतील. दिल्लीतील काही न्यूज चॅनलवाल्यांकडे पाहून इतर पत्रकारांनाही त्याच कॅटेगरीत धरण्याची चूक करू नका. महाराष्ट्रातील बहतांश पत्रकार इमाने इतबारे काम करत आहेत आणि त्यामुळेच सर्वसामान्यांच्या बातम्या समोर येत आहेत.
राहीला प्रश्न दोन्ही नेत्यांकडून काही घेण्याचा तर 18 वर्षात एखाद्या कार्यक्रमात अचानक भेटीचा अपवाद सोडल्यास कधीही प्रत्यक्ष त्यांची भेट झालेली नाही, आयुष्यात या दोघांकडून किंवा आमदार डॉ.हिकमत उढाण यांच्याकडून किंवा इतर कोणत्याही पक्ष, संघटनेकडून किंवा इतर कोणाकडूनही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एक पैसाही घेतलेला नाही किंवा कोणाचे मिंधे नाहीत. एवढंच नव्हे तर डॉ.हिकमत उढाण यांची निवडणूक पूर्वी एक जाहीरात वगळता आजपर्यंत एकही जाहीरात सुध्दा नाही. शिवाय राजेश टोपे आणि सतीश घाटगे पाटील यांच्याकडूनही काही देण्याघेण्याचा तर विषयच नाही आणि मागील 18 वर्षात दोघांकडूनही एकही जाहीरात नाही. हे जर खोटे वाटत असेल तर तीघांची भेट घेवून कोणीही खात्री करून घ्यावी. फक्त घ्यायची सवय असती तर 18 वर्षात स्वत:ची 1-2 कोटींची बिल्डींग बांधायला काहीच अडचण नसती. परंतू लेखणीशी आणि स्वाभिमानाशी कधीही तडजोड केलेली नाही. अर्थातच हे शिवसेना (दोन्ही), भाजप, राष्ट्रवादी (दोन्ही), कॉंग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी किंवा इतर सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांना माहित आहे. अर्थातच याच कारणामुळे एल्गार न्यूज मध्ये निष्पक्ष, निर्भीड आणि रोखठोक बातम्या असतात. कोणाविषयी मनात आकस नसल्यानेच दरवर्षी परवेज पठाण यांच्या ईद मिलन कार्यक्रमात सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आनंदाने सहभागी होतात आणि शुभेच्छा देतात. सनासुदीच्या काळात आपण सर्वच क्षेत्रातील नागरिकांना शुभेच्छा देवून जोडण्याचे काम करावे की तोडण्याचे काम करावे याचा विचार सदरील समर्थकाने करावा.
लेखणी स्वातंत्र्य अबाधित !
आम्ही पत्रकार आमदार डॉ.हिकमत उढाण असो, माजी मंत्री राजेश टोपे असो, बबनराव लोणीकर असो, सतीश घाटगे पाटील असो किंवा कोणत्याही पक्षाचे सन्माननीय नेते, पदाधिकारी असो त्यांच्या विषयी सकारात्मक किंवा नकारात्मक किंवा वेळ प्रसंगी अत्यंत तिखट शब्दात टिका करत असलो तरी त्यांच्या विषयी आदरच ठेवत असतो. आमची कोणाशीही वैयक्तिक दुश्मनी नसते आणि नसेलही. अर्थातच भविष्यात आमदार डॉ.हिकमत उढाण यांच्या बाबतीतही पत्रकारांनी कशी बातमी घ्यायची हे सर्वस्वी त्या त्या पत्रकारावरच अवलंबून असेल, त्यात कोणाचेही बंधन असण्याचे कारण नाही.
पत्रकार कोणाचे नोकर नाही !
ज्या पध्दतीने असे समर्थक पत्रकारांबद्दल बोलतात तेव्हा याची कदाचित त्यांना कल्पना नसते की, पत्रकारांना विशेष करून ग्रामीण पत्रकारांना शासनाकडून किंवा इतर कोणाकडूनही पगार नसतो, कोणतीही योजना नसते, कोणतीही सवलत नसते. आयुष्यभर घर जाळून कोळशे करत पत्रकारिता करावी लागते आणि लोकांचे प्रश्न मांडावे लागतात. वेळप्रसंगी चटणी भाकर खावून लोकांसाठी दुश्मनी घ्यायची, आयुष्याची राखरांगोळी करून फुकट मध्ये जनसेवा करायची आणि एवढं सगळं करून सुध्दा पुन्हा जर अशी अपमानित करणारी भाषा कोणी करत असेल तर ते मुळीच खपवून घेतले जाणार नाही. ज्या प्रमाणे सर्वच क्षेत्रात काही चांगले तर काही चुकीचे लोक आहेत त्याच प्रमाणे पत्रकारिता क्षेत्रात सुध्दा काही चुकीचे आणि कोणाच्या दावणीला बांधलेले तथाकथित पत्रकार असतीलही, परंतू सर्वच पत्रकार चुकीचे आणि कोणाच्या दावणीला बांधलेले असतील या भ्रमात कोणी मुळीच राहू नये.
आधी अपमान – नंतर माफी !
डॉ.हिकमत उढाण यांच्या सदरील थयथयाट करणाऱ्या अती उत्साही समर्थकाला शिवसेना पदाधिकारी तसेच इतरांनी संपादक परवेज पठाण यांच्या निष्पक्ष, रोखठोक आणि जनहिताच्या पत्रकारितेचा इतिहास सांगितल्यानंतर त्याने तासाभरात कॉल करून माफी मागितली आणि फोन कट केला, परंतू जवळपास 500 लोकांच्या ग्रुप मध्ये अपमानित करायचे आणि एकांतात माफी मागून मोकळे व्हायचे ही मानसिकता चांगली नाही. जो अपमान झालाय त्याचे काय ?
दादा ! कहीं देर ना हो जाए !
घनसावंगीचे राजकारण मागील 18 वर्षात आम्ही खूप जवळून पाहीलेले आहे, कोण कोणाचे तोंड सुध्दा पाहत नाही हे सुध्दा आम्हाला माहित आहे, ते तुमचं राजकारण कसं करायचं ते तुम्ही ठरवा, परंतू यामध्ये विनाकारण पत्रकारांना ओढून त्यांना अपमानित करण्याचे काम तुमचा एखादा हुकुमशाही मानसिकतेचा अती उत्साही समर्थक करत असेल तर त्याला वेळीच पायबंद घालण्याचे काम आपण करणे गरजेचे आहे. अशा अतिउत्साही आणि विनाकारण थयथयाट करणाऱ्या समर्थकांना वेळीच योग्य ती समज न देता अशा गंभीर गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहील्यास “कहीं देर ना हो जाए”…. असेच म्हणावे लागेल. शेवटी भाजपच्या दिवंगत नेत्या स्व.सुषमा स्वराज यांनी बहुतेक राज्यसभेत बोलतांना एक शायरी म्हटली होती की, “दुश्मनी करो तो ऐसी करो की, फिर कभी मुलाकात हो तो शर्मिंदगी महसूस ना हो….”
- परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज