Your Alt Text

15 व्‍या वित्‍त आयोगाचा लाखो रूपयांचा निधी कुठे खर्च केलाय ? ग्रामपंचायत सदस्‍यांचा सवाल ! CEO यांच्‍याकडे तक्रार दाखल !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या लाखो रूपयांचा निधी कुठे खर्च केलाय ? असा सवाल उपस्थित करत ग्रामपंचायत सदस्‍यांनी थेट जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍याकडे तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे.

दिलेल्‍या तक्रारीनुसार, कुंभार पिंपळगाव ग्रामपंचायतीचे सचिव (ग्रा.पं.अधिकारी) यांनी पदभार स्वीकारल्यापासून १५ व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा वापर करताना शासकीय मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केले आहे. मंजूर ग्राम विकास आराखड्यानुसार कामे न करता आणि कोणत्याही मासिक ग्रामपंचायत सभेचा आवश्यक ठराव किंवा मंजुरी न घेता परस्पर निधी खर्च किंवा अहित करण्यात आल्याचा संशय सदस्यांनी व्यक्त केला आहे.

तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या प्रमुख मुद्द्यांनुसार, सचिवांनी घेतलेल्या सदरील खर्चाच्या निर्णयामागे नियमांची पायमल्ली झाली आहे. कोणतीही प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, अंदाजपत्रक किंवा निविदा प्रक्रियेचे पालन न करता मनमानी कारभार चालविल्याचा आरोप आहे. कागदोपत्री कामे दाखवून प्रत्यक्षात निधीचा अपहार झाला आहे का, याची छाननी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाच्या सत्यतेसाठी १० प्रमुख मुद्यांवर आधारित चौकशीची मागणी अर्जात करण्यात आली आहे. यात बँक स्टेटमेंट, चेक व ऑनलाईन व्यवहार, व्हाऊचर, बिल, पावत्या, कॅशबुक आणि लेजर यांसारख्या आर्थिक अभिलेखांची तपासणी करणे समाविष्ट आहे. तसेच मासिक सभेचे इतिवृत्त (प्रोसिडिंग बुक) तपासून नंतर बेकायदेशीरपणे ठराव नोंदवले गेले आहेत का, हे तपासले जावे, अशी मागणी आहे. कामे प्रत्यक्षात झाली आहेत की केवळ कागदावरच दाखवली आहेत, याची स्थळ पाहणी व पंचनामा करून खातरजमा करावी, तसेच कंत्राटदार आणि पुरवठादारांना दिलेल्या देयकांची सखोल चौकशी व्हावी, अशीही मागणी करण्‍यात आली आहे.

जर चौकशीदरम्यान अनियमितता किंवा शासनाच्या निधीचा गैरवापर अथवा अपहार झाल्याचे सिद्ध झाले, तर संबंधित जबाबदार व्यक्तीविरुद्ध तात्काळ कारवाई करावी. तसेच अपहार झालेली रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात यावी, अशी ठाम मागणी सदस्यांनी केली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी समिती नेमण्यात यावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायतीचे संबंधित अभिलेख सुरक्षित ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

निवेदनावर ग्रामपंचायत सदस्‍य आबासाहेब राऊत, कांताबाई चव्‍हाण, गंगुबाई पांचाळ, विजय कंटुले, रफीक कुरेशी, महेमदाबी कुरेशी, शमीनाबी पठाण, भगवान शिंदे, विठ्ठल राऊत, प्रकाश बिलोरे, विजयमाला कंटुले इत्‍यादींची नावे आहेत. सदरील तक्रारीवर जिल्हा प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!