Your Alt Text

मोकाट जनावरांचा धुडगूस ! कुंभार पिंपळगावच्‍या आठवडी बाजारात मोकाट जनावरांची अनेकांना धडक !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे बुधवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी भरलेल्या आठवडी बाजारात मोकाट जनावरांनी अचानक घातलेल्या हैदोसामुळे मोठी पळापळ आणि घबराट निर्माण झाली. बाजारात खरेदीसाठी आलेल्या अनेक महिलांसह नागरिकांना मोकाट जनावरांनी जोरदार धडक देऊन जखमी केले. मोकाट जनावराने दिलेल्‍या धडकेत एका नागरिकाला जास्‍त मार लागला असून त्‍याला दवाखान्‍यात घेवून गेल्‍याचे प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले.

गंभीर मुक्का मार

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दि.५ रोजी दुपारच्या सुमारास आठवडी बाजार पूर्ण क्षमतेने भरला होता. परिसरात नागरिकांची मोठी गर्दी असतानाच, मोकाट जनावरे बाजारपेठेत घुसली. सदरील मोकाट जनावंरानी बाजारात आलेल्‍या नागरिकांना अचानक धडक देण्‍यास सुरूवात केल्‍यामुळे काही काळ धावपळ झाली. जनावरांच्या अनपेक्षित धडकेमुळे रक्तस्त्राव झाला नसला तरी अनेक जण जखमी झाले असून त्यांना पाठीवर व पायाला मोठा मुक्का मार लागला आहे. मार लागलेल्‍यांमध्‍ये काही पुरूष तर काही महिलांचा समावेश आहे. यावेळी लहान मुलांच्‍या जिवीतेला सुध्‍दा धोका निर्माण झाला होता.

बंदोबस्त करण्याची मागणी

ग्रामीण भागात मोकाट जनावरांचा विषय ग्रामपंचायतशी संबंधित असून ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर समस्येकडे आतातरी गांभीर्याने पहावे, अशी मागणी केली जात आहे. ग्रामपंचायतीने गावात तातडीने कोंडवाडा सुरू करून या मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी नागरिकांनी केली आहे.

जनावरे सोडणाऱ्या मालकांवर कारवाई करा !

आठवडी बाजारासारख्या गजबजलेल्या सार्वजनिक ठिकाणी आपली जनावरे उघड्यावर मोकाट सोडून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या बेजबाबदार व्‍यक्‍तींवर नियमानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असा सूर आता नागरिकांमधून उमटत आहे. ग्रामपंचायतीने अशा जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्‍मक किंवा गुन्हे दाखल करण्‍याची कारवाई करावी अशी मागणी कुंभार पिंपळगांव सह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

नियमांनुसार दंडाची कडक तरतूद !

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ च्या कलम १६३ मधील कायदेशीर तरतुदींनुसार, ग्रामीण भागातील सार्वजनिक रस्ते किंवा गजबजलेल्या आठवडी बाजारपेठेत जनावरे मोकाट सोडणे हा दंडनीय गुन्हा आहे. राज्य शासनाने घेतलेल्या सुधारित निर्णयांनुसार आता या दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. पहिल्यांदा गुन्हा केल्यास मोकाट जनावरे सोडणाऱ्यास १,५०० रुपयांपर्यंत दंड केला जाऊ शकतो, तर दुसऱ्यांदा किंवा वारंवार तोच गुन्हा केल्यास ५,००० रुपयांपर्यंतच्या कडक दंडाची तरतूद आहे. जर संबंधित जनावराच्या मालकाने हा दंड आणि कोंडवाड्याचा खर्च भरण्यास नकार दिला, तर ग्रामपंचायतीला त्या मोकाट जनावरांचा जाहीर लिलाव करून रक्कम वसूल करण्याचे पूर्ण कायदेशीर अधिकार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ३१ जुलै २०२६ रोजी दिलेल्या एका ऐतिहासिक न्यायनिर्णयामुळे आता मोकाट जनावरांच्या समस्येवरील कायदेशीर कारवाईचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, रस्त्यांवर किंवा बाजारपेठेत मोकाट फिरणारी जनावरे हे काही निसर्गनिर्मित ‘स्पीड ब्रेकर’ नाहीत. जर या मोकाट जनावरांमुळे नागरिक जखमी किंवा मृत झाले, तर स्थानिक प्रशासनाला (ग्रामीण भागात ग्रामपंचायतीला) पीडितांना आर्थिक नुकसानभरपाई देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच, देशातील सर्व पाळीव जनावरांचे ‘अनिवार्य डिजिटल टॅगिंग’ करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आठवडी बाजारात हुसकावून लावणारे किंवा धडक देणारे जनावर नेमके कोणाचे आहे, याचा डिजिटल रेकॉर्डवरून तात्काळ शोध घेऊन थेट संबंधित मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करणे आता प्रशासनाला शक्‍य होणार आहे.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!