एल्गार न्यूज विशेष :-
पुण्यातील ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ या वृत्तसंस्थेने आणि त्याचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांनी मराठी पत्रकारितेची पताका थेट शेजारच्या कर्नाटक राज्यात फडकवली आहे. सामाजिक जागरूकता पत्रकारितेमधील त्यांच्या अद्वितीय कामगिरीची दखल घेत ‘कर्नाटक अचीव्हर्स बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या संस्थेने या वृत्तसंस्थेला आंतरराज्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.
विशेष म्हणजे, ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चा हा गौरव काही पहिलाच नाही. यापूर्वी देखील सामाजिक जागरूकतेच्या क्षेत्रात केलेल्या विशेष कामगिरीसाठी या वृत्तसंस्थेने जागतिक विक्रमांची (इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड) दणदणीत ‘हॅट्रिक’ (त्रिशतक) साजरी केलेली आहे. जागतिक स्तरावर मिळवलेल्या या अभूतपूर्व यशानंतर आता शेजारच्या कर्नाटक राज्यानेही त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
आजकालची पत्रकारिता जेव्हा सनसनाटी बातम्यांच्या मागे धावत आहे, अशा काळात २०१९ मध्ये स्थापन झालेल्या ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ने मात्र सामाजिक बांधिलकीचे आपले मूळ कर्तव्य विसरू दिलेले नाही. व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकलेल्या तरुण पिढीला वाचवण्यासाठी या वृत्तसंस्थेने थेट ‘नशाबंदी’ची युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली. ३ जानेवारी २०२६ ते १६ मार्च २०२६ या केवळ ६८ दिवसांच्या अल्प कालखंडात मेहबूब सर्जेखान यांनी आपल्या लेखणीचे अस्त्र उपसून तब्बल १७ प्रबोधनात्मक लेख आणि १ विशेष माहितीपूर्ण चित्रफित इंटरनेट माध्यमांवर प्रसिद्ध केली.
या लेखांमधील शब्द न शब्द समाजात नशाबंदीची जागृती करण्यासाठी आणि व्यसनाच्या गर्तेत गेलेल्यांना बाहेर काढण्यासाठी तळमळीने लिहिलेला होता. त्यांच्या या अत्यंत प्रभावी, शैक्षणिक आणि लेखणीच्या सातत्यपूर्ण तपश्चर्येची दखल अखेर सीमा ओलांडून ‘कर्नाटक अचीव्हर्स बुक ऑफ रेकॉर्ड्स’ला घ्यावीच लागली.
समाजाला सुमार्गावर आणण्यासाठी चालवलेल्या या पवित्र लेखणीच्या यज्ञाला मिळालेली ही केवळ पोचपावती नाही, तर ती एका मराठी संपादकाच्या निष्ठेचा सन्मान आहे. या आंतरराज्य गौरवाबद्दल ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ आणि संपादक मेहबूब सर्जेखान यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा आणि शाबासकीचा वर्षाव होत आहे.