Your Alt Text

40 गावांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ! आरोग्यमंत्री यांच्या दौऱ्यात कुंभार पिंपळगांवला “ग्रामीण रूग्‍णालय” मंजुरीची अपेक्षा !”

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर हे दि. २७ रोजी घनसावंगी तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते घनसावंगी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण होणार आहे. घनसावंगी येथे लोकार्पण होत असलेले उपजिल्‍हा रूग्‍णालय नक्‍कीच तालुक्‍यासह परिसरातील जनतेच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने महत्‍वाचे ठरणार आहे. या महत्‍वपूर्ण क्षणाच्या निमित्ताने, घनसावंगी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आणि ४० ते ५० गावांचा केंद्रबिंदू असलेल्या कुंभार पिंपळगाव येथे विशेष बाब म्हणून तातडीने ‘ग्रामीण रुग्णालय’ मंजूर करावे, अशी जोरदार आणि भावनिक मागणी परिसरातील शेकडो नागरिकांनी केली आहे. या प्रश्नासाठी स्थानिक आमदार डॉ. हिकमत उढाण हे देखील प्रयत्नशील असून, आरोग्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागणीवर शिक्कामोर्तब व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गोरगरीबांना आर्थिक भुर्दंड !

कुंभार पिंपळगाव शहराची स्वतःची लोकसंख्या २० ते २५ हजार असून परिसरातील ४० ते ५० गावांतील हजारो नागरिकांचा या शहराशी दैनंदिन संपर्क आहे. येथे गेल्या ४० वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत असले, तरी वाढत्या लोकसंख्येपुढे सद्यस्थितीतील आरोग्य यंत्रणा संपूर्णतः कोलमडून पडली आहे. अपुऱ्या सुविधांमुळे उपचाराच्या आशेने आलेल्या शेकडो रुग्णांना निराश होऊन परत जावे लागते.

ग्रामीण रुग्णालय झाल्यास सर्वसामान्य, कष्टकरी आणि गरीब रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार स्थानिक पातळीवरच मिळतील. आजघडीला शहरात सुमारे ४० खाजगी दवाखाने असून यावरूनच रूग्‍णांच्‍या संख्‍येचा अंदाज येतो. ग्रामीण रुग्णालयामुळे गोरगरीबांचे खाजगी दवाखान्यात खर्च होणारे हजारो रुपये वाचतील आणि तालुका किंवा जिल्हास्तरावर जाण्याचा प्रवासाचा त्रास व आर्थिक भुर्दंड कायमचा थांबेल. तसेच कुंभार पिंपळगावात महिलांचे विविध आजार आणि प्रसूतीसाठी आवश्यक व तातडीची सेवा उपलब्ध नसल्याने ऐनवेळी गर्भवती महिलांना पुढे पाठवावे लागते. ग्रामीण रुग्णालयामुळे माता व बालमृत्यूचा धोका टळणार आहे.

‘गोल्डन अवर’ मध्ये जीव वाचतील !

कुंभार पिंपळगाव येथून अंबड-पाथरी हा अत्यंत वर्दळीचा महामार्ग गेला आहे. या रस्त्यावर छत्रपती संभाजीनगर, अंबड, आष्टी, पाथरी, परभणी, माजलगाव आणि नांदेड या तालुका व जिल्ह्यांतून हजारो वाहनांची अहोरात्र वर्दळ असते. तसेच नव्याने होत असलेल्या रांजणी-कुंभार पिंपळगाव-राजाटाकळी-उक्कडगाव या ५० कि.मी. लांबीच्या राज्य महामार्ग क्र. २२२ वरही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे.

या महामार्गांवर वारंवार भीषण अपघात घडतात. मात्र, कुंभार पिंपळगाव ते पाथरी (४२ कि.मी.), घनसावंगी (२० कि.मी.) असे सुमारे ६२ कि.मी. आणि परतूर (३५ कि.मी.) या संपूर्ण पट्ट्यात कोठेही ग्रामीण रुग्णालय नाही. परिसरातील ४० गावांमध्येही अपघातग्रस्तांवर तातडीच्या उपचाराची कोणतीही सोय नसल्याने, केवळ वेळेवर उपचार न मिळाल्याने आजवर अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ग्रामीण रुग्णालयामुळे अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळून त्यांचे प्राण वाचतील.

कुंभार पिंपळगावपासून अवघ्या १० कि.मी. अंतरावर गोदावरी नदी असून नदीलगतच्या उक्कडगाव येथे राज्य महामार्ग क्र. २२२ अंतर्गत पुलाचे बांधकाम सुरू आहे. गोदावरी पलीकडे बीड जिल्ह्याची हद्द असून माजलगाव व गेवराई तालुक्यातील अनेक गावांना त्यांचे तालुका ठिकाण अत्यंत लांब पडते. तसेच, गोदाकाठच्या गावातील रुग्णांना आजघडीला घनसावंगी येथील रुग्णालयात जायचे झाल्यास ३५ ते ४० कि.मी.चा लांबचा पल्ला गाठावा लागतो. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत कुंभार पिंपळगाव येथे ग्रामीण रुग्णालय झाल्यास दोन्ही जिल्ह्यांतील गोदाकाठच्या गावांसाठी ते अत्यंत सोयीस्कर आणि जीवनदायी ठरेल.

मर्यादित आरोग्‍य सेवा !

कुंभार पिंपळगाव परिसरात कुंभार पिंपळगावसह राजाटाकळी, पिंपरखेड बु. आणि जिरडगाव ही ४ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. तसेच म. चिंचोली, राजेगाव, जांबसमर्थ, गुंज बु., मुर्ती, बानेगाव, कंडारी आणि अंतरवाली टेंभी ही ८ उपकेंद्रे या अंतर्गत येतात. या सर्व केंद्रांतील गंभीर रुग्णांसाठी कुंभार पिंपळगाव हेच मध्यवर्ती ठिकाण आहे. याशिवाय, अवघ्या ७ कि.मी. अंतरावर समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असलेले तीर्थक्षेत्र जांबसमर्थ असून परिसरात कोठाळा, उक्कडगाव, गुंज बु., राजाटाकळी, पिंपरखेड बु. आणि देवी दहेगाव ही प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आहेत. येथे दरवर्षी यात्रा व उत्सवासाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात. ग्रामीण रुग्णालयामुळे या भाविकांनाही तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल.

ग्रामीण रूग्‍णालय मंजुरीची अपेक्षा !

गेल्या अनेक वर्षांपासून कुंभार पिंपळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची मागणी प्रलंबित आहे. घनसावंगी मतदारसंघाचे आमदार डॉ. हिकमत उढाण हे देखील ग्रामीण रुग्णालयाच्या मंजुरीसाठी प्रयत्नशील आहेत. आता राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर हे स्वतः घनसावंगी तालुक्यात येत असल्याने, त्यांनी या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कुंभार पिंपळगाव येथे विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयाला तातडीने मंजुरी जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!