एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
लहान मुलांचे बालपण निष्पाप आणि सुसंस्कृत असावे, यासाठी पालक अहोरात्र कष्ट घेत असतात. मुले आनंदाने खेळावीत म्हणून त्यांना खेळणी, फुगे आणून दिले जातात. परंतु, याच फुग्यांच्या माध्यमातून लहान मुलांच्या कोवळ्या मनावर जुगाराचे संस्कार रुजवले जात असल्याचा एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. बाजारामध्ये मिळणाऱ्या ‘Boss Party Balloons’ नावाच्या फुग्यांच्या पाकिटात चक्क जुगारी पत्त्यांचा (ताशचा) कॅट ‘फ्री’ दिला जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, एल्गार न्यूजच्या संपादकांनी स्वतः कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी) येथील एका दुकानात जाऊन ७० रुपये देऊन हे फुग्याचे पाकीट खरेदी केले असता, हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. सदरील दुकानदाराकडे याबाबत विचारणा केली असता, “आमच्याकडे येणाऱ्या सर्वच फुग्यांच्या पाकिटात हे ताशचे पत्ते येत आहेत,” असे सांगितले. खेळण्याच्या नावाखाली लहान मुलांच्या हातात थेट जुगाराचे साहित्य देणे हा अत्यंत गंभीर प्रकार असून, यामुळे भावी पिढी उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला जात आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

या गंभीर प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी सदरील दुकानदाराने जेथून माल घेतला होता त्या परतूर (जि.जालना) येथील होलसेलर यांना संपर्क साधण्यात आला तेव्हा आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. “हा सर्व ‘चायना माल’ असून खूप कमी मुले अख्खे पाकीट घेऊन जातात. प्रामुख्याने छोटे दुकानदार हे पाकीट फोडून चिल्लर फुगे विकतात आणि आतील पत्त्यांचे पाकीट स्वतःकडे ठेवून ते इतरांना विकतात,” अशी कबुली या होलसेलरने दिली. होलसेलरचा हा युक्तिवाद अत्यंत अयोग्य आणि कायद्याला बगल देणारा आहे.
किरकोळ दुकानदार जरी आठवड्याला किमान एक पाकीट विकत असतील, तरी आठवड्याला एक ताशचे पाकीट त्या गावात किंवा शहरातील भागात पोहोचत आहे. जरी एखादे लहान मूल पूर्ण पाकीट घेऊन गेले, तरी ते तितकेच धोक्याचे आहे. एवढंच नव्हे तर सदरील किरकोळ दुकानदार हे पाकीट तरूणांना सुध्दा विकत असेल तर हे सुध्दा चुकीचेच आहे. यावरून एक मोठा प्रश्न उपस्थित होतो की, संपूर्ण महाराष्ट्रात दर आठवड्याला अशी हजारो जुगारी पत्त्यांची पाकिटे अत्यंत नियोजनबद्ध रीतीने गावागावांत आणि शहरात पोहोचवली जात आहेत का? हा महाराष्ट्रातील तरुण पिढीला जुगाराच्या गर्तेत ढकलण्याचा एखादा पद्धतशीर कट तर नाही ना ? असा सवाल उपस्थित होत आहे.
खेळण्यांच्या पाकिटात अशा प्रकारे पत्त्यांचा सेट मिळणे हे बालमनावर विपरीत परिणाम करणारे आहे. फुगे हे प्रामुख्याने आठ वर्षांखालील किंवा अगदी लहान मुले खेळतात. ज्या वयात मुलांच्या हातात पाटी, पेन्सिल किंवा सुसंस्कृत खेळणी असायला हवीत, त्या वयात त्यांच्या हातात अनधिकृत जुगाराचे पत्ते पडत आहेत. मुले घरात किंवा मित्रांसोबत खेळताना या पत्त्यांचा वापर करतील, ज्यामुळे त्यांच्या मनात जुगाराबद्दलचे कुतूहल निर्माण होईल. नकळतपणे त्यांना पत्त्यांच्या खेळाची सवय लागेल, जी पुढे जाऊन जुगाराच्या व्यसनात रूपांतरित होऊ शकते. आज फ्री मिळणारे हे पत्ते उद्या देशाचे भविष्य असणाऱ्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. नफेखोरीसाठी लहान मुलांच्या मानसिकतेशी खेळणाऱ्या अशा कंपन्यांवर आणि वितरकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
कंपनीची माहितीच नाही !
या संपूर्ण प्रकारात सर्वात मोठी आणि संशयास्पद बाब म्हणजे, या फुग्यांच्या पाकिटावर कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. पाकिटावर केवळ मोठ्या अक्षरात ‘Boss Party Balloons’ एवढेच लिहिले आहे. याव्यतिरिक्त हे पाकीट कुठे तयार झाले, आयातदाराचे नाव (Importer Details), कंपनीचे नाव, कस्टमर केअर नंबर, किंवा इतर कोणतीही संपर्क माहिती पाकिटावर नाही. कायदेशीर नियमांनुसार उत्पादनावर मॅन्युफॅक्चरिंग किंवा इम्पोर्ट लायसन्स नंबर (License Number), कंपनीचा नोंदणीकृत पत्ता (Registered Address), बॅच नंबर (Batch Number), उत्पादन किंवा आयातीचा महिना आणि वर्ष आणि वस्तूची कमाल किरकोळ किंमत (MRP) असणे अत्यंत अनिवार्य आहे. परंतु, ‘Boss Party Balloons’ च्या पाकिटावर यातील एकही माहिती उपलब्ध नाही. पाकिटावर पत्ता नसल्यामुळे, हा घातक तथाकथित चिनी माल भारतात कोणत्या मार्गाने आला, किंवा येथेच कोणी तयार करून त्यास चायना माल सांगून कटकारस्थान रचत आहे का ? याचाही शोध घेणे आवश्यक आहे.
या गंभीर प्रकरणाची पोलीस व संबंधित प्रशासनाने, तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. बाजारामध्ये अशा प्रकारे विना पत्त्याची, विना लायसन्सची आणि जुगाराला खतपाणी घालणारी अनधिकृत उत्पादने उघडपणे कशी विकली जात आहेत ? प्रशासनाचे या गुप्त साखळीवर नियंत्रण का नाही? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. हे पाकीट ज्या होलसेलरने विकले, तिथून धागेदोरे शोधून या बेकायदेशीर मालाच्या मुख्य गोदामांवर तात्काळ छापे टाकण्यात यावेत. तसेच, अशा बेकायदेशीर पाकिटांची विक्री करणाऱ्यांवरही कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाने आता कुंभकर्णी झोपेतून जागे व्हावे आणि या रॅकेटचा तात्काळ पर्दाफाश करावा, अन्यथा पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.