एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
स्वप्न पाहणे सोपे असते, पण ते जगणे – संसाराची जबाबदारी सांभाळत, प्राचार्यपदाची धुरा वाहत आणि लेखिका म्हणून समाजाशी नाते जोडत, हे खरे धाडस असते. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षण शास्त्र विभागातून प्रतिष्ठित ‘पीएचडी’ पदवी प्राप्त करणाऱ्या प्राचार्य सौ. श्वेता सचिन चौगुले यांनी हे धाडस प्रत्यक्षात जगून दाखवले आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा जो दिवा पेटवला, त्या ज्योतीची प्रखर साक्ष देत आजच्या स्त्रिया ज्ञानाच्या नव्या शिखरांवर आपले नाव कोरत आहेत. प्राचार्य श्वेता यांनी शिक्षण शास्त्र या विषयातच घेतलेली सर्वोच्च पदवी म्हणजे सावित्रीच्या विचारांना दिलेली एक सार्थ आणि कृतीशील वंदना आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्यपद म्हणजे केवळ एक पदवी नव्हे, ती एक अखंड जबाबदारी असते. विद्यार्थ्यांचे भविष्य, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि दैनंदिन प्रशासन यांचा भार सांभाळत असताना स्वतःच्या संशोधनासाठी वेळ काढणे म्हणजे इच्छाशक्तीची खरी कसोटी असते. पीएचडीसाठी लागणारे सखोल वाचन, अथक संशोधन आणि सुव्यवस्थित थिसिस लेखन, हे सारे करत असताना त्यांनी कधीही आपले ध्येय सोडले नाही. जिद्द आणि चिकाटी या दोन गोष्टींनी त्यांना या संपूर्ण प्रवासात तारले.
श्वेता चौगुले या केवळ प्राचार्य नाहीत, तर एक संवेदनशील आणि प्रगल्भ लेखिकाही आहेत. शब्दांवर असणारे त्यांचे प्रभुत्व आणि समाजाचे सूक्ष्म निरीक्षण यांनी त्यांच्या संशोधनाला एक वेगळीच उंची आणि जिवंतपणा प्राप्त करून दिला आहे. लेखणी आणि संशोधन यांचा हा अद्भुत संगम शैक्षणिक व साहित्य क्षेत्राला समृद्ध करणारा आहे.
या यशाच्या पाठीमागे एका खंबीर कुटुंबाची साथ आहे, आणि ती नमूद केल्याशिवाय हा प्रवास अपूर्ण आहे. त्यांचे पती डॉ. सचिन चौगुले आणि समस्त चौगुले परिवाराने या संपूर्ण वाटचालीत श्वेता यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत त्यांच्या स्वप्नांना पंख दिले. स्वतः उच्चविद्याविभूषित असलेल्या पतीने पत्नीच्या संशोधन प्रवासातील कष्टांची जाण ठेवत जे सहकार्य केले, ते एका आदर्श आणि सुसंस्कृत कुटुंबाचे खरे उदाहरण आहे. आता चौगुले कुटुंबात एकाच वेळी दोन ‘डॉक्टर’ असणे ही केवळ अभिमानाची नव्हे, तर इतरांसाठी प्रेरणेची गोष्ट आहे.
डॉ. प्राचार्य सौ. श्वेता सचिन चौगुले, यांचा हा प्रवास असंख्य स्त्रियांसाठी एक उजळलेली वाट आहे. त्यांच्या ज्ञानाची, जिद्दीची आणि समृद्ध लेखणीची शैक्षणिक व साहित्य क्षेत्राला अशीच साथ लाभत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा !