एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या समोर शेतकरी आणि नागरिक विविध प्रश्न उपस्थित करत असतील तर अधिकाऱ्यांनी प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी हे प्रश्न विचारू नका, ते प्रश्न विचारू नका, आजचा तो विषय नाही असे म्हणून टाळाटाळ करणे योग्य आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार रमेश पागोटे, गटविकास अधिकारी श्री.कदम यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी व इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने लवकरच एक कॅम्प घेण्यात येणार आहे त्या संदर्भात ते माहिती देत होते. यावेळी गावातील शेतकरी व नागरिकांनी उपस्थित राहून विविध प्रश्न विचारले. ज्यामध्ये पाणी पुरवठा योजने संदर्भात प्रश्न विचारण्यात आला की, २०११ मध्ये १ कोटी २५ लाखांची योजना अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आली होती, त्यानंतर २०२२ मध्ये जवळपास २ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती, ज्याचा पूर्ण करण्याचा कालावधी दिड वर्षे होता, मात्र कालावधी संपून अनेक दिवस उलटले तरी योजनेचे एक पाईप सुध्दा टाकण्यात आलेले नाही.
याबाबत तहसीलदार आणि बीडीओ यांनी हा आजचा विषय नाही, यावर सध्या बोलता येणार नाही असे सांगितले. तसेच एका शेतकऱ्याने जन्म-मृत्यू प्रमाणपत्रा बाबत विचारले तर हा प्रश्न विचारू नका असे सांगितले, एका नागरिकाने विचारले राशन कार्डची अडचण येत आहे तो प्रश्न विचारू नका, एकाने सांगितले पांदन रस्त्याचा प्रश्न तर तो आजचा विषय नाही, असे अनेक प्रश्न शेतकरी व नागरिकांनी विचारले मात्र तहसीलदार आणि बीडीओ यांनी सदरील विषय आजचे नाहीत ते विचारू नका. शिवाय जो कॅम्प प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणार आहे त्याच्या मध्ये सुध्दा सदरील प्रश्न विचारू नका असे सांगितले. त्यामुळे उपस्थित शेतकरी व नागरिकांना प्रश्न पडलाय की महत्वाचे प्रश्नच विचारायचे नसतील तर मग प्रश्न विचारायचे कोणते ?
तहसीलदार हे तालुका दंडाधिकारी असतात अर्थात तालुक्याचे प्रमुख असतात, त्यांना महत्वाचे अधिकार आहेत. शिवाय पंचायत समितीचे प्रमुख हे गटविकास अधिकारी असतात त्यांनाही पंचायत विभागाशी संबंधित महत्वपूर्ण अधिकार आहेत. जर असे महत्वपूर्ण अधिकारीच उडवाउडवीची उत्तरे देत असतील, टाळाटाळ करत असतील तर नागरिकांनी काय अर्थ घ्यायचा ? शेतकरी व नागरिकांना किमान एवढं जरी सांगितलं की, तुमचा प्रश्न मी लिहून घेतलाय लवकरच हा प्रश्न सोडवू, तरीही लोकांचे समाधान होत असते. परंतू जर असे महत्वपूर्ण अधिकारीच हे विचारू नका, ते विचारू नका असे सांगत असतील तर मग हे अधिकारी नुसतं टाईमपास म्हणून गावात आले होते का ? असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
कॅम्प मध्ये सुध्दा इतर प्रश्न नको !
ग्रामपंचायत मध्ये झालेल्या बैठकीत तहसीलदार आणि बीडीओ यांनी इतर प्रश्न विचारू नका असे तर सांगितलेच, परंतू कुंभार पिंपळगांव येथे लवकरच होणाऱ्या कॅम्प मध्ये सुध्दा इतर प्रश्न विचारू नका असे सांगितले. विशेष म्हणजे सदरील कॅम्प हा कुंभार पिंपळगांवसह सर्कल मधील गावांचा सुध्दा आहे, म्हणजेच विविध गावातील शेतकरी व नागरिक येथे येणार आहेत. त्यांनी इतर प्रश्न विचारू नये असे अधिकाऱ्यांचे म्हण्णे आहे. मग शेतकरी व नागरिकांनी तोंडाला पट्टी बांधून कॅम्प मध्ये सहभागी व्हावे असे त्यांना म्हणायचे आहे का ? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
ग्रामसेवकही अनुत्तरीत !
जलजीवन मिशन योजने अंतर्गत २ कोटीची पाणी पुरवठा योजना बंद अवस्थेत असून अद्याप गावात एक पाईप सुध्दा टाकण्यात आलेले नाही, जेव्हा हा प्रश्न ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) यांना सुध्दा विचारण्यात आला तेव्हा त्यांनी पाणी पुरवठा विभागाकडे बोट दाखवले. पुन्हा त्यांना नागरिकांनी विचारले की, योजनेचे काम बंद असल्याबाबत किंवा गुत्तेदाराची तक्रार तुम्ही जिल्हा परिषदेकडे केली आहे का ? तेव्हा या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हते.
जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी – दिलीप राऊत
जन्म- मृत्यू प्रमाणपत्र काढणे अवघड झाले आहे, वयस्कर व्यक्तींनी जन्माचे पुरावे कुठून आणायचे ? नोंदी आणि विविध कागदपत्रे सांगण्यात येत असल्याने नागरिक हैराण होत आहेत. २ कोटीची पाणी पुरवठा योजना सुध्दा बंद पडलेली आहे. गुत्तेदाराने किती बील उचलले या बाबत ग्रामपंचायतने नागरिकांना माहिती देणे आवश्यक होते, शिवाय योजने संदर्भात ग्रामपंचायतने पाठपुरावा करणे आवश्यक होते, परंतू ग्रामपंचायतने योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. सदरील मुद्दे तहसीलदार आणि बीडीओ यांच्या समोर मांडण्यात आल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करणे योग्य नाही.
दिलीप राऊत,
जिल्हा उपाध्यक्ष, जालना
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस (श.प.)
योजना पूर्ण व्हावी – संदीप कंटुले
कुंभार पिंपळगावातील पाणी पुरवठा योजनेचे एक पाईप सुध्दा गावात टाकण्यात आलेले नाही. २ कोटीची योजना बंद पडलेली आहे. सदरील गुत्तेदाराला गावात अजून कोणीच पाहीलेलं नाही. पाणी पुरवठा विभागासह संबंधित अधिकाऱ्यांनी योजना बंद पडल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. संबंधित गुत्तेदाराला कोण पाठीशी घालत आहे हे सुध्दा पाहणे महत्वाचे असून योजना तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे.
संदिप कंटुले,
तालुका प्रमुख, घनसावंगी
शिवसेना (उबाठा)
पाणी पुरवठा योजना बंद अवस्थेत – कुरेशी
कुंभार पिंपळगांवला यापूर्वी १ कोटी १७ लाखांची योजना होती ती झाली नाही, त्यानंतर २ कोटीची योजना मंजूर झाली होती, त्याचेही काम बंद आहे. सदरील योजनेचे काम तात्काळ पूर्ण होणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांच्या बैठकीत गावातील विविध प्रश्नांवर नागरिक संबंधित अधिकारी यांना प्रश्न करत असतील तर अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर देणे आवश्यक आहे. नागरिक त्यांच्याकडे अपेक्षेने प्रश्न मांडत असतात.
रफिक कुरेशी,
ग्रामपंचायत सदस्य,
कुंभार पिंपळगांव
प्रश्न मांडायचे कुठं ? – विजय कंटुले
तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासारखे महत्वाचे अधिकारी गावात आले असतांना त्यांच्या समोर नागरिक प्रश्न मांडत असतील आणि सदरील अधिकारी इतर प्रश्न विचारू नका म्हणत असतील तर नागरिकांनी प्रश्न मांडायचे कुठं ? पाणी पुरवठा योजना बंद आहे, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, गावात ग्रामसभा होत नाही, शिवाय होणाऱ्या कॅम्प मध्ये सुध्दा इतर प्रश्न विचारू नका असे जर सदरील अधिकारी म्हणत असतील तर मग नागरिकांनी प्रश्न मांडायचे कुणाकडे? सदरील अधिकारी फॉरमॅलीटी म्हणून गावात आले होते का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
विजय कंटुले,
ग्रामपंचायत सदस्य,
कुंभार पिंपळगांव