एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगांव जवळच असलेल्या समृध्दी साखर कारखान्यातून निघाणाऱ्या भुसा आणि राखेमुळे येथील शेतकरी व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
प्रशासनाला सादर केलेल्या तक्रारीनुसार समृध्दी साखर कारखान्यातून मोठ्या प्रमाणात उडाणारा भुसा व राखेमुळे गावासह परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर भुसा व राख नाका तोंडात, डोळ्यात व श्वसनमार्गात जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. तसेच कारखान्यातून उडणारा भुसा व राख शेतीमध्ये जावून उभ्या पिकांवर पडत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सदर नुकसान २०२१ पासून आजपर्यंत सातत्याने होत असून यामुळे शेतकऱ्यांची पिके काळी पडून उत्पादनात घट झाली असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
याबाबत यापूर्वीच तहसीलदार घनसावंगी यांना तक्रार सादर करण्यात आली होती, त्यानुसार मंडळ अधिकारी / तलाठी यांच्या मार्फत दि.२७/०१/२०२४ रोजी प्रत्यक्ष स्थळी पंचनामा देखील करण्यात आला असून सदर पंचनाम्यात तथ्य आढळलेले आहे. सदरील पंचनामा तहसील कार्यालयात सादर देखील करण्यात आलेला आहे, परंतू अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. या व्यतिरिक्त कारखान्याकडे रात्रंदिवस सुरू असलेल्या ट्रॅक्टर व इतर वाहनांवर मोठ्या आवाजात गाणी लावली जात असल्याने तसेच वाहन काट्यावर स्पीकरद्वारे सतत सूचना दिल्या जात असल्याने रात्रभर झोप लागत नाही व नागरिकांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सदरील तक्रार देवी दहेगांव येथील नवनाथ भानुदास शिंदे यांनी केली असून तक्रारीवर स्थानिक नागरिकांच्या सह्या सुध्दा आहेत. याबाबत समृध्दी साखर कारखान्याचे चेअरमन सतिष घाटगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.
चौकशी व कारवाईची मागणी !
सदरील प्रकरणाची तात्काळ चौकशी करून नुकसान भरपाई मिळावी, मोठ्या आवाजातील गाणी, स्पीकरद्वारे देण्यात येणाऱ्या सततच्या सूचना बंद करण्यात याव्यात, सदरील ध्वनी प्रदूषण बंद करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार नवनाथ शिंदे, यांच्यासह दिलीप शिंदे, रोहीदास शिंदे, गोरखनाथ शिंदे, लक्ष्मण टेहळे, रामभाऊ टेहळे, हर्षल वाघमोडे, कृष्णा टेहळे, बाबुराव राठोड, परसराम शिंदे, प्रदिप शिंदे, पांडूरंग शिंदे, विश्वंभर शिंदे, शरद शिंदे, अर्जुन बाबरे, बाळू टेहळे, रामेश्वर शिंदे इत्यादी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे उद्योगमंत्री, तसेच विभागीय आयुक्त, साखर आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रदूषण मंडळ अधिकारी, तहसीलदार व घनसावंगी पोलीस ठाण्यास सादर करण्यात आल्याचे निवेदनावरून दिसत आहे. आता या प्रकरणात संबंधित अधिकारी अथवा यंत्रणा काय पाऊल उचलते हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.