एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यासह परिसराचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आमदार डॉ.हिकमत उढाण यांच्यामुळे मार्गी लागला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण घनसावंगी तालुक्यात MIDC मंजूर झाली असून त्या संबंधित अधिसूचनाही जाहीर झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात रोजगाराचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे, तालुक्यात MIDC किंवा उद्योग नसल्याने तरूणांना रोजगारासाठी जिल्हास्तरावर किंवा इतर जिल्ह्यात जाण्याशिवाय पर्याय नाही. शेती व कौटुंबिक जबाबदारीमुळे असंख्य तरूणांना तालुका सोडून बाहेर जाणे शक्य होत नव्हते. अर्थातच तालुक्यात MIDC असावी ही अनेक वर्षांपासूनची तालुक्यातील अथवा मतदारसंघातील नागरिकांची मागणी होती. आमदार डॉ.हिकमत उढाण हे पहिल्यांदाच आमदार झाल्यावर त्यांनी सातत्याने MIDC साठी शासनाकडे पाठपुरावा केला होता, अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून घनसावंगी करीता MIDC मंजूर झाली असून त्या संबंधित अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार २० मे २०२६ रोजी MIDC मंजूर करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाकडून MIDC अॅक्ट १९६१ च्या कलम २०७ अंतर्गत आवश्यक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. सदरील निर्णयामुळे तालुक्यासह परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून बेरोजगार तरूण तरूणींना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
महत्वपूर्ण रस्त्यांनाही मंजूरी !
आमदार डॉ.हिकमत उढाण यांच्या विशेष प्रयत्नाने घनसावंगी तालुक्यातील अनेक रस्त्यांनाही मंजूर मिळाली आहे. यामध्ये बळेगाव – आपेगाव ते कुंभार पिंपळगांव या ८५ कि.मी.च्या महत्वपूर्ण रस्त्यासाठी २६१ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून डीपीआरचे काम सुरू झाल्याने जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. तसेच जागतिक बॅंकेच्या मदतीतून सुखापुरी फाटा ते आंतरवाली टेंभी या २९ कि.मी. रस्त्यालाही मंजूरी मिळाली असून या रस्त्याचे सर्वेक्षण व टेंडर प्रक्रिया सुरू असून या रस्त्याचे काम सुध्दा जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या सुरूवातीस सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय अंतरवाली टेंभी ते मंगरूळ आणि रामसगाव ते बानेगाव – भोगाव या रस्त्यालाही मंजूरी मिळाल्याची माहिती त्यांच्या कडून देण्यात आली आहे. आमदार डॉ.हिकमत उढाण यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या सदरील रस्त्यांमुळे नजीकच्या काळात सदरील मार्गावरील दळणवळण अधिक सोयीस्कर होवून विकासाला चालना मिळणार आहे.
डॉ.उढाण यांचा मास्टर स्ट्रोक !
घनसावंगी मतदारसंघासह परिससरातील तरूण – तरूणींना MIDC मुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे. सदरील निर्णयामुळे परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार असून MIDC चा ऐतिहासिक निर्णय आमदार डॉ.हिकमत उढाण यांचा “मास्टर स्ट्रोक” मानला जात आहे. MIDC करीता राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, वरिष्ठ नेते, संबंधित अधिकारी, यांच्यासह शिवसेना नेते तथा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले जात आहे. MIDC करीता पायाभूत सुविधांसह इतर आवश्यक बाबींची जलदगतीने अंमलबजावणी झाल्यास रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होवून बेरोजगार तरूणांसह स्थानिक उद्योजकांनाही याचा नक्कीच फायदा होईल यात शंका नाही.
MIDC मंजूर – आमदार डॉ.उढाण
घनसावंगी करीता MIDC मंजूर झाली असून मतदारसंघासह परिसरातील जनतेला याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच बळेगाव – आपेगाव ते कुंभार पिंपळगांव, सुखापुरी फाटा ते आंतरवाली टेंभी, अंतरवाली टेंभी ते मंगरूळ आणि रामसगाव ते बानेगाव – भोगाव या रस्त्यांनाही मंजूरी मिळाली असून लवकरच काम सुरू होईल अशी प्रतिक्रिया घनसावंगी मतदारसंघाचे आमदार डॉ.हिकमत उढाण यांनी एल्गार न्यूजचे संपादक परवेज पठाण यांना दिली आहे.
घनसावंगी करीता MIDC मंजूर करून आणल्याबद्दल आमदार डॉ.हिकमत उढाण व त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे तालुक्यातील जनता आणि “एल्गार न्यूज” च्या वतीने हार्दिक अभिनंदन…