एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे वेळोवेळी उदाहरण पहायला मिळतात, असेच एक उत्तम उदाहरण पुन्हा एकदा पहायला मिळाले आहे. कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे चांद पठाण यांच्या ४ वर्षांच्या हस्नैन या मुलाला कॅन्सर (कर्करोग) झाला आहे, शासनाच्या योजने व्यतिरिक्त लागणाऱ्या औषधोपचारासाठी त्यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी लाखमोलाची मदत करून या कुटुंबाला मोठा आधार दिला आहे.
मुंबई येथे उपचार !
सदरील ४ वर्षाच्या हस्नैन या मुलाला ब्लड कॅन्सर झाला असून त्याचा उपचार मागील ९ महिन्यांपासून मुंबई येथील टाटा हॉस्पिटल येथे सुरू आहे. आतापर्यंत शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या मुलावर लाखो रूपये खर्च झाला आहे. मात्र आता बाहेरील औषधांचा खर्च मुलाच्या वडीलांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. कॅन्सरच्या गोळ्या व औषधांचा खर्च इतर आजारांच्या तुलनेत खूप महाग असल्याने मुलाचे वडील चांद पठाण हे हतबल झाले होते.
मुलाचे वडील चांद पठाण यांची घरची अत्यंत गरीब परिस्थिती असून आतापर्यंत त्यांनी बाहेरील शक्य तो खर्च केला आहे, मात्र त्यांना आता उपचाराचा खर्च करणे आवाक्याबाहेर गेले होते. सदरील दवाखान्यात मुलाचे उपचार सुरू असले तरी बाहेरून लागणारा महागड्या औषधांचा व उपचाराचा खर्च जास्त येत असल्यामुळे त्यांना मदतीची अत्यंत गरज होती.
कुंभार पिंपळगांवात मदत फेरी
सदरील आजारी असलेल्या हस्नैन या मुलाच्या उपचारासाठी दि.१८ जून २०२५ बुधवार रोजी कुंभार पिंपळगांव येथे सर्व समाजाच्या वतीने मदत फेरी काढण्यात आली. यामध्ये कुंभार पिंपळगांव येथील व्यापारी व परिसरातील नागरिकांनी मदत फेरीच्या बॉक्स मध्ये शक्य ती मदत केली. सदरील मदत फेरीच्या माध्यमातून तब्बल ८०,११६ रूपये जमा झाले आहेत.
फोन पे च्या माध्यमातून मदत !
गांव, तालुका, जिल्हा आणि राज्यातून सुध्दा मदत व्हावी म्हणून मुलाच्या वडीलांचा फोन पे क्रमांक देण्यात आला होता, सदरील फोन पे क्रमांकावर दि.१९ जून पर्यंत ३३,१५० रक्कम जमा झाली आहे.
एकूण मदत !
मदत फेरीच्या माध्यमातून ८०,११६ व फोन पे च्या माध्यमातून ३३,१५० असे एकूण १,१३,२६६ रूपये आतापर्यंत जमा झाले आहेत.
सर्वांचे आभार !
कॅन्सरग्रस्त हस्नैन पठाणला मदत करणारे कुंभार पिंपळगांव येथील व्यापारी बांधव, नागरिक तसेच फोन पे च्या माध्यमातून स्थानिक बांधव व राज्यभरातून सहकार्य करणाऱ्या ज्ञात, अज्ञात सर्व मान्यवरांचे हस्नैनच्या कुटुंबियांनी आभार व्यक्त केले आहे, तसेच मदत फेरीत सहभागी होवून आवाहन करणाऱ्या सर्व बांधवांचेही आभार व्यक्त केले आहे.
मदत करू शकता !
कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचे उपचार नियमितपणे घ्यावे लागतात, त्यासाठी बराच कालावधी लागतो आणि पैसेही तेवढेच लागतात. त्यामुळे भविष्यातही खर्च लागणारच आहे, त्यामुळे अजूनही कोणाला मदत करण्याची इच्छा असेल तर ते कॅन्सरग्रस्त हस्नैन चे वडील चांद पठाण यांच्या फोन पे क्रमांक 9970267960 या क्रमांकावर मदत करू शकतात.