Your Alt Text

रस्‍ता स्‍वत:च्‍या बापाचा किंवा सासऱ्याचा आहे असा गैरसमज काही वाहनधारकांचा झाला असेल तर पोलीसांनी तो दूर करावा !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
शासनाने सर्वसामान्‍य नागरिकांचा किंवा प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्‍हावा म्‍हणून अनेक ठिकाणी चांगले रस्‍ते केले आहेत आणि अजूनही मोठ्या प्रमाणात रस्‍ते करण्‍याचा शासनाचा प्रयत्‍न आहे. परंतू काही वाहनधारकांना रस्‍ते चांगले झाले म्‍हणजे सगळे नियम कायदे पायदळी तुडवण्‍याचा परवाना मिळाल्‍याचा गैरसमज झाल्‍याचे दिसत आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांवातून २ महामार्ग गेले आहेत, एक गावाच्‍या बाहेरून तर दुसरा गावातून राजाटाकळी रोड हा महामार्ग गेला आहे. सदरील महामार्गाचे गावातील (मार्केट कमिटी ते अरगडे गव्‍हाण चौक) सिमेंट रस्‍त्‍याचे काम झाले असून डिव्‍हाईडर व गतिरोधकचे काम बाकी आहे. गावातील या रस्‍त्‍यावर नेहमी मोठी वर्दळ असते. या रस्‍त्‍यावरून हजारो शाळकरी मुले तसेच हजारो नागरिक आणि वाहने या रस्‍त्‍यावरून ये-जा करत असतात.

गावात हायवे प्रमाणे सिमेंट रस्‍ता झाल्‍याने काही वाहनधारक (२ व्‍हीलर, ४ व्‍हीलर) भरधाव वेगाने वाहन चालवित असल्‍याने या रस्‍त्‍यावरून ये-जा करणाऱ्या गाव व परिसरातील शाळकरी मुलांसह नागरिकांचे जीव धोक्‍यात आले आहे. जवळपास ८० ते १०० च्‍या स्‍पीडने वाहने चालविण्‍यात येत असल्‍याने मोठा अपघात होण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

छोटे मोठे अपघात !

गावातून जाणारा रस्‍ता हा २५ ते ३० गावांसाठी सुध्‍दा प्रमुख रस्‍ता असून या रस्‍त्‍यावर कायमच वर्दळ असते, भरधाव वेगाने वाहन चालविण्‍यात येत असल्‍याने दररोज या रस्‍त्‍यावर छोटे मोठे अपघात घडत आहेत. एकमेकांना धडकून मोटारसायकलस्‍वार खाली पडल्‍याच्‍या घटना नेहमीच्‍याच झाल्‍या आहेत. धूम स्‍टाईलने मोटारसायकल चालवणारे कमी होते की काय आता मोठे वाहनधारक सुध्‍दा या रस्‍त्‍याने अति वेगाने वाहन चालवित असल्‍याचे दिसून येत आहे. त्‍यामुळे मोठा अपघात झाल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही.

खड्डेमय रस्‍ते आणि चांगले रस्‍ते !

काही वर्षांपूर्वी या भागात खड्डेमय रस्‍ते होते. त्‍यावेळी आपोआपच वाहनांची गती कमी होत होती. परंतू “कधी न आलं पाहण्‍यात अन ते आलं खाण्‍यात” अशीच काही अवस्‍था काही वाहनधारकांची झाल्‍याचे दिसत आहे. चांगले रस्‍ते झाले तर त्‍याचा योग्‍य पध्‍दतीने वापर करणे आवश्‍यक आहे, परंतू काही वाहनधारकांना हे लक्षात येत नसल्‍याने शाळकरी मुलांसह नागरिकांचे जीव धोक्‍यात येत आहे.

रस्‍ता बापाचा आहे का ?

धूम स्‍टाईलने वाहन चालवून सर्वसामान्‍य नागरिकांचे जीव धोक्‍यात घालणाऱ्या काही वाहनधारकांना रस्‍ता स्‍वत:च्‍या बापाचा किंवा सासऱ्याचा असल्‍याचा गैरसमज झाला असावा, त्‍यामुळे पोलिसांनी त्‍यांच्‍या स्‍टाईलने या वाहनधारकांचा गैरसमज दूर करावा अशी भावना कुंभार पिंपळगांव व परिसरातील नागरिकांनी व्‍यक्‍त केली आहे.

नशेत अनेक वाहनधारक !

मोटारसायकल असो किंवा चारचाकी वाहन असो, यापैकी अनेक असे वाहनधारक आहेत जे दारू पिऊन भरधाव वेगाने चालवित आहेत. कदाचित दारू पिल्‍याने त्‍या वाहनधारकाला रस्‍ता स्‍वत:च्‍या बापाचा किंवा सासऱ्याचा असल्‍याचा वारंवार भास होत असेल. परंतू स्‍थानिक पोलिसांनी वाहनधारकांची नशा लवकर उतरवणे आवश्‍यक झाले आहे.

अल्‍पवयीन मुलांच्‍या हाती वाहन !

भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यांमध्‍ये अनेक वेळा अल्‍पवयीन मुले सुध्‍दा दिसून येत आहेत. फक्‍त दुचाकीच नव्‍हे तर ट्रॅक्‍टर सारखे वाहन सुध्‍दा चालवतांना अल्‍पवयीन मुले दिसून येत असल्‍याने येत्‍या काळात अपघातांची संख्‍या अजून वाढण्‍याची शक्‍यता आहे.

पोलिसांनी कारवाई करावी !

कुंभार पिंपळगावातून जाणाऱ्या सदरील महामार्गावर धूम स्‍टाईलने वाहन चालवून नियमांची पायमल्‍ली करणाऱ्या संबंधित वाहनधारकां विरूध्‍द पोलीसांनी कडक कावाई करणे आवश्‍यक आहे. या गंभीर विषयाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्‍यास भविष्‍यात अनेक अपघात होवू शकतात आणि त्‍यास घनसावंगी पोलीस ठाणे आणि कुंभार पिंपळगांव पोलीस चौकीच जबाबदार असेल अशी प्रतिक्रिया स्‍थानिक नागरिकांनी दिली आहे.

गतिरोधक व्‍हावे !

कुंभार पिंपळगावातून जाणारा सदरील रस्‍ता हा सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येतो, मागील काळात त्‍यांनी सदरील रस्‍त्‍यावर कमी उंचीचे गतिरोधक टाकता येतील असे सांगितले होते, परंतू अद्याप या रस्‍त्‍यावर गतिरोधक टाकण्‍यात आलेले नाहीत. वारंवार होणारे छोटे मोठे अपघात लक्षात घेवून बांधकाम विभागाने तातडीने कमी उंचीचे गतिरोधक या रस्‍त्‍यावर बसवावेत, शिवाय डिव्‍हायडरचे कामही लवकर पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…


बातमी शेअर करा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!