Your Alt Text

कुंभार पिंपळगांव व परिसरात कोट्यावधी रूपयांची बेकायदेशीर प्‍लॉटिंग ! ब्‍लॅक मनीचा वापर होतोय का ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
कुंभार पिंपळगांव व परिसरात सगळे नियम कायदे धाब्‍यावर बसवून बेकायदेशीरपणे प्‍लॉटिंग काढून प्‍लॉट विक्री केले जात असल्‍याने सदरील लोकांना कोणाचा धाक राहिला आहे किंवा नाही असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे एन.ए. (NA) न करता व इतर नियमांचे पालन न करता जागोजागी बेकायदेशीर प्‍लॉटिंग काढून विक्री केली जात आहे. सदरील प्‍लॉटिंग ही काही लाखांची नव्‍हे तर शेकडो कोटींची म्‍हटलं तरी वावगं ठरणार नाही.

गावाच्‍या चारही बाजूला प्‍लॉटिंग !

कुंभार पिंपळगांवात सध्‍या शेकडो कोटी रूपयांची बेकायदेशीर प्‍लॉटिंग सुरू आहे. यामध्‍ये अंबड रोड, आष्‍टी रोड, आष्‍टी रोडवरील मुर्ती फाटा व पेट्रोलपंप जवळ, एसबी शाळेजवळ, गावातील झोपडपट्टीच्‍या मागे, नुतन वसाहतच्‍या मागे, राजाटाकळी रोड, भेंडाळा रोड, कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या जवळचा परिसर, तिर्थपुरी रोड, आझाद नगर मधून मागे जाणारा पांदन रस्‍ता, अरगडे गव्‍हाण रोड, बस स्‍थानक परिसर अशा अनेक ठिकाणी नियम कायदे धाब्‍यावर बसवून बेकायदेशीर प्‍लॉटिंग काढण्‍यात आली आहे.

धाक उरला नाही !

एखाद़्या लहान मुलाने चॉकलेटचा हट्ट धरावा आणि कोणीतरी त्‍याला सहज चॉकलेट घेवून द्यावे एवढ्या सहजपणे प्‍लॉटिंगचा गोरखधंदा सुरू आहे. मनात येईल तो एखाद्या शेतकऱ्याकडून काही पैसे अॅडव्‍हान्‍स देवून जमीन ताब्‍यात घेत आहे आणि एन.ए. व इतर नियमांचे पालन न करता मनमर्जीप्रमाणे प्‍लॉटिंग काढून कोट्यावधी रूपयांची उलाढाल करत आहे.

ग्रामसेवकांचा आशिर्वाद !

या भागात शेतीच्‍या जमीनीवर करण्‍यात आलेली बेकायदेशीर प्‍लॉटिंग ग्रामपंचायतला लावून या गोरखधंद्याला वाढविण्‍यात ग्रामसेवक (ग्रा.पं.अधिकारी) सर्वात महत्‍वाची भूमिका निभावत आहेत. ग्रामसेवक सदरील बेकायदेशीर प्‍लॉट ग्रामपंचायतला लावून प्‍लॉट विक्रीचा मार्ग मोकळा करत आहेत. प्‍लॉटिंगवाल्‍यांनी ग्रामसेवक यांच्‍यावर अशी जादू काय केली आहे की ते वाट्टेल तसं इशाऱ्यावर नाचत आहेत. अर्थातच हा काय प्रकार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही.

अजून कोणाचा आशिर्वाद !

कुंभार पिंपळगांव व परिसरात सुरू असलेली बेकायदेशीर प्‍लॉटिंगला स्‍थानिक ग्रामसेवक हे तर जबाबदार आहेतच, याशिवाय तहसील प्रशासन, दुय्यम निबंधक कार्यालय (रजिस्‍ट्री ऑफीस) हे सुध्‍दा बेकायदेशीर प्‍लॉटिंगकडे डोळेझाक करत असल्‍याने त्‍यांचेही मोलाचे योगदान आहे का ? असा सवाल नागरिक करत आहेत.

जमीन प्‍लॉट मध्‍ये ब्‍लॅक मनी !

कुंभार पिंपळगांव व परिसरात मोठ्या प्रमाणात जमीन, प्‍लॉट विक्रीचे व्‍यवहार होत आहेत, हे व्‍यवहार लाखांमध्‍ये नव्‍हे तर शेकडो कोटींमध्‍ये होत असल्‍याचे दिसत आहे. जिकडे तिकडे प्‍लॉट, जमीन विक्री होत असून रस्‍त्‍यालगतचा प्‍लॉट १ ते २ कोटीपर्यंत जात आहे, शिवाय जमिन खरेदी विक्रीचेही कोट्यावधीचे व्‍यवहार होत असल्‍याने या परिसरात मोठ्या प्रमाणात स्‍थानिक किंवा बाहेरील व्‍यक्‍तीच्‍या माध्‍यमातून ब्‍लॅक मनी वापरला जात असल्‍याचे बोलले जात आहे. त्‍यामुळे इनकम टॅक्‍स विभागाचे चरण स्‍पर्ष या भागात होण्‍यास काहीच हरकत नाही.

आमचा संबंध नाही !

कुंभार पिंपळगांव येथील बेकायदेशीर प्‍लॉटिंग बद्दल येथील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्‍याशी संपर्क साधला असता प्‍लॉटिंग काढण्‍यासाठी एन.ए. करणे व इतर नियमांचे पालन करणे आवश्‍यक असते. प्‍लॉटिंग काढायची असल्‍यास प्रशासनाकडून परवानगी घ्‍यावी लागते. बेकायदेशीर प्‍लॉटिंगचा व आमचा काही संबंध नाही असे त्‍यांनी सांगितले.

चौकशी होणे आवश्‍यक !

कुंभार पिंपळगांव व परिसरात मागील काही वर्षात झालेली बेकायदेशीर प्‍लॉटिंग व त्‍याची खरेदी विक्री कोणत्‍या आधारे झाली आहे ? बेकायदेशीर प्‍लॉटिंगला कोणाकोणाचा आशिर्वाद आहे ? ग्रामपंचायतने कोणत्‍या आधारावर प्‍लॉटची नोंद ग्रामपंचायतला केली आहे ? मागील ७ – ८ वर्षात झालेल्‍या सर्व बेकायदेशीर प्‍लॉटिंगला कोण जबाबदार आहेत ? या सर्व प्रश्‍नांचे उत्‍तरे जनतेला मिळणे आवश्‍यक असून संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करणे आवश्‍यक झाले आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!