एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असून ईश्वर कृपेने राज्याच्या तिजोरीच्या चाव्या राजेश टोपे यांच्या हातात येवू शकतात असे महत्वपूर्ण वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. घनसावंगी येथे शिवस्वराज्य यात्रेनिमित्त दि.18 रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) या पक्षाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे. सदरील शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पक्षाची भुमिका व ध्येयधोरणे इत्यादी बाबत मतदारांना माहिती व्हावी या दृष्टीने ही यात्रा काढण्यात येत आहे. सदरील यात्रेचे घनसावंगी येथे आगमन झाले यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर भाष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर आमदार राजेश टोपे यांना अनेक प्रलोभने देण्यात आली, मात्र त्यांनी शरद पवार यांच्यावरील निष्ठा कमी होवू दिली नाही, आता विधानसभा निवडणुका होणार असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, त्यामुळे परमेश्वर कृपेने त्यांच्या हातात तिजोरीच्या चाव्याही येवू शकतात असे महत्वपूर्ण वक्तव्य करून राजेश टोपे यांच्याकडे अर्थमंत्रीपद देण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे.
यावेळी बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहीली आणि आता विधानसभेतही जनता महाविकास आघाडीला भरभरून मतदान करणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून घनसावंगी मतदारसंघातील राजेश टोपे यांना एक सुवर्णसंधी आलेली आहे त्यामुळे मतदार संघातील जनतेने त्यांना आशिर्वाद देवून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.