एल्गार न्यूज :-
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड परिसरातील मुस्लिम समाजातील घरांची व मस्जिदची तोडफोड, जाळपोळ आणि नागरिकांना मारहाण केल्या प्रकरणी कुंभार पिंपळगांव येथील समाज बांधवांच्या वतीने तिव्र शब्दात निषेध करण्यात आला तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी कुंभार पिंपळगांव कडकडीत बंद ठेवण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड परिसरासह रजापूर गावात राहणाऱ्या मुस्लिम समाजातील नागरिकांना समाजकंटकांनी मारहाण केली होती, घरांची व मस्जिदची तोडफोड केली होती शिवाय महिलांसह नागरिकांना मारहाण केली होती. या हल्ल्यांमध्ये असंख्य महिलांसह नागरिक जख्मी झाले असून असंख्य घरे व दुकाने उध्वस्त झाली आहेत तसेच वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याबाबत कुंभार पिंपळगांव येथील नागरिकांच्या वतीने तहसीलदार व पोलीसांना निवेदन देवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, तसेच घटनेच्या निषेधार्थ दि.19 रोजी व्यापारी महासंघाच्या सहकार्याने कुंभार पिंपळगांव मार्केट बंद ठेवण्यात आले.
आवाहन
समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी अशी सर्वांचीच भावना आहे, कायद्यान्वये पोलीस व प्रशासन दोषींवर करणार असल्याने सर्वांनी शांतता राखावी व जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच जातीय सलोखा कायम रहावा यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन गावातील सर्वधर्मीय मान्यवर नागरिकांनी केले आहे.