एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
दरवर्षी २६ जानेवारीला आसमंत तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघतो, कर्तव्यपथावर शौर्याचे प्रदर्शन होते आणि देशभक्तीपर गीतांच्या निनादाने वातावरण प्रफुल्लित होते.. पण, ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणजे केवळ सुट्टीचा दिवस, झेंडावंदन आणि परेड आहे का ? नक्कीच नाही. हा दिवस म्हणजे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा ‘महाकाव्य’ असलेला दिवस आहे. ज्या दिवशी भारताने स्वतःचे नशीब स्वतःच्या हाती घेतले, तो ऐतिहासिक क्षण म्हणजे २६ जानेवारी १९५०.
प्रजासत्ताक दिन म्हणजे नक्की काय ?
सोप्या भाषेत सांगायचे तर, ‘प्रजासत्ताक’ म्हणजे जिथे राजवट कोण्या राजाची किंवा वारसाहक्काने आलेल्या व्यक्तीची नसून, ती जनतेची (प्रजेची) असते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला खरा, पण त्याकाळी आपल्याकडे स्वतःची राज्यघटना नव्हती. आपण ब्रिटिशांच्या अॅक्ट नुसार कारभार पाहत होतो. २६ जानेवारी १९५० रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले भारतीय संविधान लागू झाले आणि भारत एक ‘सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक’ राष्ट्र बनले.
२६ जानेवारीच का ?
या तारखेमागे एक क्रांतीकारी इतिहास आहे. २६ जानेवारी १९३० रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर अधिवेशनात भारतीयांनी ‘पूर्ण स्वराज्याची’ शपथ घेतली होती. ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होऊन पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव याच दिवशी मांडला गेला होता. या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व चिरंतर टिकवण्यासाठी संविधान समितीने २६ जानेवारी ही तारीख संविधान अंमलबजावणीसाठी निवडली.
संविधानिक कवचकुंडले
अनेकजण विचारतात की, स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेच हक्क का मिळाले नाहीत? त्याचे उत्तर संविधानात आहे. २६ जानेवारीपासून संविधानाने प्रत्येक नागरिकाला ‘मूलभूत अधिकार’ दिले, जे लोकशाहीचा कणा आहेत.
- समानतेचा अधिकार
जात, धर्म, लिंग किंवा जन्मस्थान यावरून कोणामध्येही भेदभाव केला जाणार नाही. राजा असो वा रंक, कायद्यासमोर सर्व समान आहेत. - अभिव्यक्ती स्वातंत्र्य
प्रत्येक नागरिकाला आपले विचार मांडण्याचे, भाषण करण्याचे आणि शांततापूर्ण मार्गाने एकत्र येण्याचे स्वातंत्र्य मिळाले. - शोषणाविरुद्धचा अधिकार
बालमजुरी आणि मानवी तस्करीला कायद्याने गुन्हा ठरवण्यात आले. - धार्मिक स्वातंत्र्य
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. - न्यायालयीन संरक्षण
जर तुमच्या हक्कांचे उल्लंघन झाले, तर तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालया पर्यंत दाद मागू शकता. ही सर्वात मोठी ताकद संविधानाने दिली.
आपली जबाबदारी
आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या उंबरठ्यावर उभे असताना आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. आपण संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करतो, पण कर्तव्यांचे काय ? लोकशाहीत ‘प्रजा’ हीच ‘सत्ताधारी’ असते. मात्र, जेव्हा आपण मतदानाकडे पाठ फिरवतो, जेव्हा आपण आपल्या हक्कांची पायमल्ली होताना गप्प बसतो किंवा जेव्हा आपण केवळ दुसऱ्यांच्या चुका काढण्यात वेळ घालवतो, तेव्हा आपण प्रजासत्ताकाचा मूळ आत्मा विसरतो.
संविधानाने आपल्याला ‘माणूस’ म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. पण या अधिकारांसोबतच देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे.
प्रजासत्ताक दिन हा केवळ इतिहासाची उजळणी करण्याचा दिवस नाही, तर भविष्यातील भारताची स्वप्ने पाहण्याचा दिवस आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांची जाणीव ठेवतानाच, आपण एक जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्ये पार पाडली, तरच खऱ्या अर्थाने ‘प्रजासत्ताक’ सार्थ ठरेल.
आपले संविधान जगातील सर्वोत्तम आहे, पण संविधानाने दिलेल्या अधिकाराचा आपण कसा वापर करतो आणि देश आणि समाजाप्रति असलेली बांधिलकी आपण जपतो का ? याचा सुध्दा विचार करणे आवश्यक आहे. प्रजासत्तक दिनी ध्वज फडकताना शहीदांची आठवण करणे आणि आपल्या कर्तव्याची जाण ठेवणे नक्कीच क्रमप्राप्त आहे.
आपणास प्रजासत्ताक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा….
जय हिंद ! जय भारत !
- परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज
