Your Alt Text

कुं.पिंपळगांव व परिसरातील व्‍यापारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनो, जागे व्‍हा… अभी नही तो कभी नही…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज विशेष :-
कुंभार पिंपळगाव व्‍यापारी मार्केट मध्‍ये एक प्रकारची अस्‍वस्‍थता दिसून येत आहे. खरं तर आपलं काही तरी चुकतंय का ? आपण सगळेच स्‍वार्थी होत चाललो आहोत का ? याचा विचार प्रत्‍येकाने करणे आवश्‍यक झाले आहे. लॉकडाउन पासून सगळीकडेच व्‍यवसायावर परिणाम दिसून येत आहे, परंतू कुंभार पिंपळगांव मार्केट ची अवस्‍था मागील काही वर्षात अधिकच दयनीय झाल्‍याचे दिसत आहे. अनेक छोटे व्‍यापारी भेटल्‍यावर सांगत आहेत की दुकानाचे भाडे सुध्‍दा निघणे अवघड झाले आहे. काहींनी सांगितले की आम्‍ही आमची दुकाने बंद केली आहेत, अनेक जण गाव सोडत आहेत. अनेकजण बेरोजगार होवून फिरत आहेत, अनेक जण अस्‍वस्‍थ आहेत.

अनेक छोटे व्‍यापारी, अल्‍पभूधारक शेतकरी, कामगार अनेकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. कुटुंबाचा प्रपंच, मुलांचे शिक्षण, वारंवार घरात आजारी पडणारी माणसे आणि त्‍यांच्‍यावर होणारा खर्च, इतर आवश्‍यक खर्च, सुख-दु:ख अशा विविध कारणांनी अनेकांमध्‍ये प्रचंड असवस्‍थता दिसून येत आहे, अनेकजण मानसिक तणावाखाली आहेत. परंतू ते कोणाला सांगू शकत नाही आणि अशा विविध कारणांमुळे अनेक सामाजिक प्रश्‍न सुध्‍दा निर्माण होत आहे.

एका प्रसिध्‍द शायर होते, राहत इंदौरी, त्‍यांचा एक शेर आहे की, “लगेगी आग तो आएंगे कई घर जद में, यहां पर सिर्फ हमारा मकान थोडी है.”… म्‍हणजेच घराला आग लागल्‍यास इतर घरांनाही त्‍या आगीचा फटका बसू शकतो. त्‍यामुळे इतरांचे नुकसान होत असेल तर आपल्‍याला दुख वाटायला पाहिजे, आपणही ती आग विझवण्‍याचा प्रयत्‍न केला पाहिजे आणि भविष्‍यात आग लागू नये म्‍हणून प्रयत्‍न केले पाहिजे, कारण आज दुसऱ्यावर संकट आले असेल, तर उद्या आपली बारी असू शकते याचं भान आपल्‍याला ठेवावे लागेल.

…तर परिस्थिती अजून बिकट होणार !

कुंभार पिंपळगांवचे मार्केट (व्‍यवसाय) कमी का होत चालले आहे ? व्‍यवसाय ठप्‍प का होत आहेत ? ज्‍या कुंभार पिंपळगावच्‍या मार्केटची चर्चा जिल्‍हाभरात व्‍हायची तेच व्‍यापारी मार्केट आज सलाईनवर का गेले आहे ? माझं काय बंद पडलंय ही आपली स्‍वार्थी मानसिकता याला कारणीभूत आहे का ? याचा विचार करणे आवश्‍यक आहे. गावातील तर सोडाच शेजारच्‍या दुकानदाराची दुकान फुटली किंवा चोरी झाली तरी आपल्‍याला काहीच वाटत नाही ही आपली मानसिकता झाली आहे.

काही वर्षांपूर्वी तिर्थपुरीचे मार्केट कुंभार पिंपळगावच्‍या तुलनेने खूप कमी होते, परंतू आज तेथील परिस्थिती कुंभार पिंपळगाव पेक्षा खूप चांगली आहे, कारण तेथील व्‍यापारी असो, राजकीय पदाधिकारी असो किंवा गांवकरी असो, सर्वांची एकी आहे. सगळे जण गावासाठी झटतात, वेळोवेळी एकत्र येवून चर्चा करतात, विविध प्रश्‍नांसाठी वरिष्‍ठ पातळीपर्यंत पाठपुरावा करतात. त्‍यामुळे आज तेथे व्‍यापार वाढला आहे. नवनवीन उद्योग व्‍यवसाय सुरू होत आहेत. तेथे उपजिल्‍हा रूग्‍णालय आहे, पोलीस ठाणे आहे, नगरपंचायत आहे, खेळाचे मैदान आहे, इतर कार्यालय आहेत, गावात सुधारणा होत आहेत.

घनसावंगी आणि आष्‍टीचे मार्केट सुध्‍दा बऱ्यापैकी वाढत आहे. मग आपणच कुठे कमी पडत आहोत याचा विचार करणे आवश्‍यक आहे. फक्‍त दुकानांची संख्‍या वाढली म्‍हणजे मार्केट वाढले असं होत नाही, तर खरेदी विक्री सुध्‍दा वाढली पाहिजे आणि यासाठी कुठली एक गोष्‍ट कारणीभूत आहे असं म्‍हणता येणार नाही. दिवसेंदिवस बिघडत चाललेल्‍या परिस्थितीचा विचार आज आपण केला नाही तर पुढील काळात परिस्थिती अधिकच गंभीर होणार आहे आणि तेव्‍हा पश्‍चाताप करण्‍यापलीकडे काहीही उरणार नाही.

बैठका आणि मंथन आवश्‍यक !

आपल्‍या गावात आणि परिसरातील गावात सगळ्याच समाजात चांगली आणि जाणकार आणि विविध क्षेत्रातील तज्ञ माणसं सुध्‍दा आहेत पण त्‍यांना विचारतंय कोण ? कारण आपण त्‍यांची किंमत करत नाहीत. आपणच सगळ्या जगात हुशार समजून कोणीच कोणाला विचारायला तयार नाही, चर्चा करायला तयार नाही अशी सध्‍याची परिस्थिती आहे.

आजघडीला सगळीकडेच लग्‍नासाठी मुलांना मुली भेटत नाहीयेत ही वस्‍तुस्थिती आहे, आणि तीच परिस्थिती आपल्‍या परिसरातील असंख्‍य गावांमध्‍ये दिसून येत आहे. ३५ – ४० वर्षे झाली तरी परिसरातील अनेक गावातील मुलांचे लग्‍न होत नाहीयेत. शेतात उत्‍पन्‍न नाही, हाताला काम नाही, व्‍यवसाय नाही, बेरोजगारी वाढली आहे, मुलं व्‍यसनाच्‍या आहारी जात आहेत. मार्केटचा, व्‍यवसायाचा आणि प्रगतीचा लग्‍नाशी काय संबंध ? असा जर कोणाला प्रश्‍न पडला असेल तर बारकाईने विचार केल्‍यास अनेक सामाजिक प्रश्‍न एकमेकांशी जुडलेले असतात हे लक्षात येईल.

कुंभार पिंपळगांव हे शहर उद्योग व्‍यवसायाच्‍या दृष्‍टीने भरभराटी घेण्‍यासाठी गावातील प्रत्‍येक व्‍यापारी, व्‍यावसायिक, शेतकरी, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्‍यवर अशा सर्वांनीच एकत्र येवून बैठका घेवून विचार मंथन करणे आवश्‍यक आहे. दर १५ दिवसाला किंवा महिन्‍याला किमान एक बैठक घेवून गावातील व्‍यापार कसा वाढेल ? छोटे व्‍यापारी मोठे व्‍यापारी कसे होतील ? नवीन उद्योग कसे निर्माण होतील ? तरूणांना उद्योग व्‍यवसायासाठी कर्ज किंवा शासनाच्‍या सबसीडीच्‍या योजनांचा लाभ कसा मिळेल ? भविष्‍यात आसपासच्‍या परिसरात छोट्या कंपन्‍या किंवा उद्योग कसे सुरू होतील ? शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मार्गदर्शन कसे मिळेल ? त्‍यांचे उत्‍पन्‍न कसे वाढेल ? वेळोवेळी विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करता येईल का ? परिसरात आधुनिक उच्‍च शिक्षण, आधुनिक इंजिनिअरींग कॉलेज, फार्मसी कॉलेज, AI तंत्राज्ञानावर आधारीत कोर्सेस असे शैक्षणिक हब विकसित व्‍हावे म्‍हणून पाठपुरावा करता येईल का ? व्‍यवसाय वाढीसाठी ईको सिस्‍टीम तयार करता येईल का ? याचा विचार करणे आवश्‍यक आहे. गावातील तरूणी, महिला यांच्‍यासाठी लघु उद्योग व इतर आत्‍मनिर्भरतेच्‍या दृष्‍टीने काही करता येईल का याचाही विचार करणे आवश्‍यक आहे.

शासनाच्‍या अनेक योजना आहेत, ३५ ते ५० टक्‍के आणि त्‍यापेक्षा जास्‍त सबसीडीच्‍या योजना आहेत. पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाहीत आणि प्रयत्‍नही करत नाहीत हे आपल्‍याला मान्‍य करावे लागेल. अडचणी येतात, त्रास होतो, परंतू प्रयत्‍ना अंती ईश्‍वर हे सुध्‍दा तितकेच खरे आहे. जग AI Technology आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून कुठल्‍या कुठे जात आहे आणि आपण स्‍वार्थी मानसिकतेतून बाहेर पडायला तयार नाही आणि गावात काय चाललंय याच्‍याशीही आपल्‍याला काहीही देणंघेणं उरलेलं दिसत नाही. जो पर्यंत आपण दुसऱ्याचं भलं व्‍हावं असा विचार करत नाही तो पर्यंत आपलंही भलं होणार नाही, हेही तितकेच खरे आहे.

जात पात बाजूला ठेवा !

मी या जातीचा, मी त्‍या जातीचा, या गोष्‍टी आता बाजूला ठेवाव्‍या लागतील. सर्वांनी आपापल्‍या जाती धर्माचे आवश्‍य पालन करावे, कोणी कोणाला रोखलेले नाही. परंतू जेव्‍हा विकासाचा, प्रगतीचा, सर्वांच्‍या कल्‍याणाचा विषय येईल तेव्‍हा सर्वांनी देशाचे, राज्‍याचे एक सजग नागरिक म्‍हणून एकत्र येणे आवश्‍यक आहे. धर्म जातीपातीच्‍या भांडणाने आधीच आपल्‍या सर्वांचे खूप अतोनात नुकसान झालेले आहे, आता बस्‍स झाले. जेव्‍हा निवडणुका असतील तेव्‍हा कोणाला मतदान करायचे ते करा, पण आपल्‍या गाव परिसराचा, तालुक्‍याचा विकास व्‍हावा म्‍हणून सर्वांनी एकत्रितपणे विचार करणे आवश्‍यक झाले आहे.

भविष्‍याचा विचार करणे आवश्‍यक

आपले नशीब चांगले की आपल्‍या गाव परिसरातून २ हायवे गेले आहेत, जर आतापासून सर्वांनी प्रयत्‍न केले तर भविष्‍यात उद्योग व्‍यवसाय वाढीसाठी, दळणवळणासाठी, , बेरोजगार तरूणांसाठी, आणि शेतकऱ्यांसाठी सुध्‍दा हेच महामार्ग खूप मोठी भूमिका बजावू शकतात.

आपल्‍या गाव परिसरातून अनेकजण इतर जिल्‍ह्यात किंवा इतर राज्‍यात सुध्‍दा वेळोवेळी जात असतात. अनेकजण मुंबई, पुणे, नागपूर, दिल्‍ली, गुजरात, मध्‍यप्रदेश, गोवा, तामिलनाडू, बॅंगलोर अशा अनेक राज्‍यात आणि शहरात जात असतात. तेथील होलसेल मार्केट, उद्योग, शेती अशा अनेक गोष्‍टी पाहत असतात. त्‍यांनी सुध्‍दा गावातील व्‍यापारी, बेरोजगार तरूण व शेतकरी यांना मार्गदर्शन करण्‍याचा प्रयत्‍न करावा, जर गावात बैठका सुरू झाल्‍यास त्‍यात मार्गदर्शन करावे. शक्‍य झाल्‍यास कुठे पाहणी दौरे आयोजित करता येतील का ? दर महिन्‍याला एखाद्या उद्योजक किंवा तज्ञाला बैठकीत मागदर्शनासाठी बोलवता येईल का याचा विचार करावा.

खरं तर कुंभार पिंपळगावच्‍या जिवावर अनेक जण श्रीमंत झालेत, अनेकांनी लाखो किंबहुना कोट्यावधी रूपये कुभार पिंपळगावच्‍या जिवावर कमवले, त्‍यांच्‍या ओळखीपाळखी पण चांगल्‍या झाल्‍या आहेत. अशा बांधवांनी सुध्‍दा सिंहाचा शक्‍य नसेल पण खारीचा वाटा उचलण्‍याचा आणि गावासाठी काय करता येईल याचा विचार करावा. आपला अनुभव, आपले इतर ठिकाणी असलेले संबंध आणि संपर्काचा गावाला काही फायदा होईल का ? याचाही विचार करावा.

गावातील प्रत्‍येक व्‍यापारी, उद्योजक, प्रगतीशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींनी एकत्र येवून बैठकांचे आवश्‍य आयोजन करावे. व्‍यापारी महासंघाने आणि सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते, प्रगतीशील शेतकरी, डॉक्‍टर, इंजिनिअर किंवा वेळोवेळी ज्‍यांना शक्‍य आहे अशा बांधवांनी एकत्र येवून बैठकीत मंथन करावे. शक्‍य तेव्‍हा सरपंच प्रतिनिधी, आजी माजी लोकप्रतिनिधी यांनीही सहभागी व्‍हावे. अधून मधून आजी माजी आमदार, खासदार यांनाही आमंत्रित करण्‍याचा प्रयत्‍न करावा.

एकाच बैठकीत सगळं काही चित्र बदलेल असे नाही. पण वारंवार बैठका घेतल्‍या, वारंवार चर्चा केली, मार्गदर्शन केले तर नक्‍कीच चित्र बदलेल यात शंका नाही. कारण झाड लावल्‍याबरोबर फळं मिळत नसतात, परंतू सातत्‍याने प्रयत्‍न केल्‍यास एक दिवस नक्‍कीच फळं मिळतील आणि आपल्‍यासह पुढच्‍या पिढ्यांना सुध्‍दा याचा लाभ होत राहील यात सुध्‍दा शंका नाही.

बैठक घ्‍या पण….

गाव परिसरातील विविध क्षेत्रातील बांधवांची बैठक आयोजित करावी, परंतू या बैठकीत कोणालाच कमी लेखू नये, सर्वांनाच थोडक्‍यात का असेना बोलण्‍याची संधी द्यावी. कारण कोणाचे मत आपल्‍या गाव परिसराच्‍या भल्‍यासाठी दिशादर्शक ठरेल सांगता येत नाही. बैठकीत सर्व हेवेदावे, गट तट बाजूला ठेवावे लागतील, वैयक्तिक टीका टिप्‍पणी टाळावी लागेल आणि सामुहिक पध्‍दतीने विचारमंथन करावे लागेल.

आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्‍न केल्‍यास नक्‍कीच त्‍याचा फायदा आपल्‍या सर्वांना होईल याची खात्री आहे. त्‍यामुळे जागे व्‍हा, कारण आज आपण हा विषय गांभीर्याने घेतला नाही तर पुढची पिढी आणि काळ आपल्‍याला माफ करणार नाही.

सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही
सारी कोशीश है की ये सूरत बदलनी चाहिए
मेरे सीने में नही तो तेरे सीने में सही
हो कहीं भी आग लेकीन आग जलनी चाहिए..

  • परवेज पठाण,
    संपादक, एल्‍गार न्‍यूज
    9890515043

टीप :- काही दिवसांपूर्वी हे आर्टीकल प्रकाशित करण्‍यात आले होते, परंतू नंतर काही तांत्रिक कारणाने या आर्टीकलची लिंक ओपन होत नसल्‍याने हे आर्टीकल आता जशास तसे पुन्‍हा प्रकाशित करण्‍यात येत आहे.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!