एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
माजी मंत्री तथा घनसावंगी मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे यांना इमाने इतबारे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विसर पडलाय की काय ? असा प्रश्न अनेक समर्थकांना पडू लागला आहे. पक्षवाढीसाठी आणि राजेश टोपेंना निवडून आणण्यात खारीचा का असेना वाटा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना गृहीत धरून बाजूला सारण्यात येत असल्याने अनेक समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे कार्यकर्ते तथा माजी मंत्री व आमदार राजेश टोपे यांचे कट्टर समर्थक असलेले धनंजय कंटुले यांनी हिकमत उढाण यांच्या उपस्थितीत शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला आहे.
धनंजय कंटुले हे गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सक्रीय होते, मतदारसंघात पक्षवाढीसाठी आणि पक्षाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अर्थातच त्यांचे योगदान असल्याचे धनंजय कंटुले यांचे मित्र सांगत आहेत. युवा वक्ते म्हणून सुध्दा धनंजय कंटुले जिल्हाभरात प्रसिध्द आहेत. शिवाय त्यांनी कुंभार पिंपळगांव येथे शाळा व पतसंस्थाही सुरू केलेली आहे.
पक्ष का सोडला ?
धनंजय कंटुले यांना याबाबत विचारले असता, मी अनेक वर्षांपासून राजेश टोपे यांचा समर्थक राहीलो असून निवडणुकीच्या काळात भैय्यासाहेबांच्या प्रचारामध्ये माझा सुध्दा खारीचा का असेना वाटा राहीलेला आहे. पक्ष वाढीसाठी मी कायम प्रयत्नशील राहीलो, पण मला वारंवार गृहीत धरण्यात आले, मला कुठलीही अपेक्षा नव्हती परंतू जाणीवपूर्वक डावलण्याचा आणि बाजूला सारण्याचा प्रयत्न झाला असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना धनंजय कंटुले म्हणाले की, मला एकदा नव्हे तर अनेक वेळा अनुभव आला की, मला गृहीत धरल्या जात आहे, एक प्रकारे दुर्लक्ष करण्यात आले. भैय्यासाहेबांकडे सर्वसामान्य जनतेचे कुठलेही काम घेवून जायचे असेल तर त्यांच्या पी.ए. शिवाय पर्याय नाही, अनेक निर्णय त्यांचे पी.ए.च घेतात, थेट पणे बोलता येत नाही. कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे आणि कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे नाही हे पीएच (स्वीय सहायक) ठरवतात. अनेक गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत पण मला अधिक बोलायचं नाही. मला घुसमठ होत होती म्हणून मी बाहेर पडलो.
हिकमत दादाच का ?
धनंजय कंटुले यांना हिकमत दादाच का ? असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, हिकमत दादा यांच्याकडे मतदारसंघा बाबत एक व्हिजन आहे, ते उच्चशिक्षित आहेत, मतदारसंघाचा विकास करण्याची त्यांच्यात क्षमता आहे. भविष्यात मतदारसंघातील जनतेसाठी खूप काही त्यांना करायचे आहे हे त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवले असून त्याची सुरूवातही झालेली आहे. अर्थातच भविष्यात त्यांच्या माध्यमातून तालुक्यासह मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न सुटू शकतात, त्यामुळेच मी हिकमत दादांवर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
इतर बातम्या खाली पहा…
व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी वर किंवा खाली दिसत असलेल्या “जॉईन करा” या चिन्हाला क्लिक करून आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा.