Your Alt Text

होय, पत्रकारिता क्षेत्रात शकुनीमामा आहेत ! राज्‍यातील अनेक पत्रकार बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्‍यवरांचे मत !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
पत्रकारिता क्षेत्रातील शकुनीमामा बद्दल एल्‍गार न्‍यूजने रोखठोक शब्‍दात सविस्‍तर आर्टीकल प्रकाशित केल्‍यानंतर राज्‍यातील विविध जिल्‍ह्यातील असंख्‍य पत्रकार बांधवांनी एल्‍गार न्‍यूजला कॉल करून तसेच व्‍हॉटसअॅपवर मॅसेज करून सदरील मुद्दा अत्‍यंत योग्‍य आणि सत्‍य असल्‍याचे नमूद केले व मनातील गोष्‍ट मांडली त्‍याबद्दल एल्‍गार न्‍यूजचे आभारही व्‍यक्‍त केले.

मान्‍यवरांच्‍या मोठ्या संख्‍येने प्रतिक्रिया आल्‍या असून त्‍या सर्व प्रकाशित करणे शक्‍य नसल्‍याने प्रतिक्रियांचा सारांश येथे देण्‍यात येत आहे.

याबाबत सविस्‍तर असे की, काही पत्रकारांचा अपवाद सोडल्‍यास बहुतांश पत्रकार बांधव हे सामाजिक बांधिलकी समजून आणि एक प्रकारे समाज कार्य समजून कुठलीही अपेक्षा न करता पत्रकारिता करत असतात. समाजातील सर्वच घटकांना अर्थात सर्वसामान्‍य नागरिकांना न्‍याय मिळवून देण्‍यासाठी व त्‍यांचे प्रश्‍न मार्गी लागावेत यासाठी कायम प्रयत्‍नशील असतात. सदरील पत्रकारिता करतांना पत्रकारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा जीव धोक्‍यात घालून पत्रकारिता करावी लागते.

पत्रकारांना शासनाकडून कुठला पगार नसतो किंवा कुठलाही विशेष लाभ मिळत नाही. बहुतांश पत्रकार हे समाज आणि देशहित डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता करत असतात. पत्रकारिते मध्‍ये कुठलेही भविष्‍य नाही उलट स्‍वत:च्‍या स्‍वप्‍नांची राखरांगोळी करून समाजासाठी लढावं लागतं हे माहित असतांनाही पत्रकार या क्षेत्रात कार्यरत असतात. खरं तर पत्रकारितेच्‍या माध्‍यमातून समाजसेवेचा किडा त्‍यांना शांत बसू देत नाही किंवा या क्षेत्रातून बाहेर पडू देत नाही असंही म्‍हटलं तर वावगं ठरणार नाही.

पत्रकारिता क्षेत्रातील शकुनीमामा !

स्‍वत:च्‍या स्‍वप्‍नांची राख रांगोळी करून समाजासाठी लढत असतांना, मुला-बाळांचे शिक्षण, आरोग्‍य, कुटुंबाचा प्रपंच, सुख – दु:ख या सर्वांसाठी तारेवरची कसरत कमी असते की काय आता पत्रकारिता क्षेत्रातीलच लावालावी करणारे, खच्‍चीकरणाचा प्रयत्‍न करणारे, कटकारस्‍थान रचणारे शकुनीमामा उघडे पडू लागले आहेत. अर्थातच हे शकुनीमामा राज्‍यात, जिल्‍ह्यात, तालुक्‍यात, शहरात किंवा गावात कुठेही असू शकतात. त्‍यांचे एकच काम असते नावाला पत्रकारिता करायची, बाकी सगळा वेळ इतर चांगल्‍या पत्रकारांबद्दल लावालावी करायची, त्‍यांचे खच्‍चीकरण करण्‍याचा प्रयत्‍न करायचा, कटकारस्‍थान करायचे किंवा इतर कोणी कटकारस्‍थान रचत असेल तर त्‍यात सहभागी व्‍हायचे आणि आपल्‍याच चांगल्‍या पत्रकाराचा कार्यक्रम कसा लावता येईल यासाठी प्रयत्‍न करायचे आणि हे सर्व करत असतांना स्‍वत:चा खिसा गरम करण्याचे नियोजन करायचे असा या शकुनीमामाचा प्रयत्‍न असतो.

कारण काय तर, या शकुनीमामाला वाटत असते की, तालुक्‍यात, गाव-शहरात आणि संपूर्ण जिल्‍ह्यात हा स्‍वत: एकटाच हुशार आहे बाकीचे सर्व पत्रकार हे बिनकामाचे आणि निव्‍वळ गोट्या खेळण्‍यासाठी या क्षेत्रात आलेले आहेत. इतर कोणालाच काही कळत नाही फक्‍त यालाच सगळं कळतं. विशेष करून रोखठोक बातम्‍या लिहीणाऱ्यांविषयी या शकुनीमामाला जास्‍त तिरस्‍कार असतो. कोणी निर्भीडपणे रोखठोक बातमी लिहीली आणि त्‍याची थोडीफार जरी चर्चा झाली तर या शकुनीमामाचा लावालावी, खच्‍चीकरण आणि कटकारस्‍थानाचा मुळव्‍याध लगेच उठत असतो. अर्थातच हा मुळव्‍याध त्‍याला एका जागी शांत बसू देत नाही आणि मग हा शकुनीमामा आपल्‍याच पत्रकारांना कसे अडचणीत आणायचे यासाठी डावपेच आखण्‍याचा प्रयत्‍न करत असतो.

राज्‍यभरातून प्रतिक्रिया !

शकुनीमामाच्‍या विविध कारनाम्‍या बद्दल एल्‍गार न्‍यूजने दि.३१ रोजी सडेतोड शब्‍दात आर्टीकल प्रकाशित केल्‍यानंतर राज्‍यभरातून अर्थातच विविध जिल्‍ह्यातून सन्‍माननीय पत्रकार बांधवांचे अनेक कॉल व व्‍हाट्सअॅपवर असंख्‍य प्रतिक्रिया आल्‍या. यामध्‍ये सर्वांनी प्रत्‍येक जिल्‍ह्यात, तालुक्‍यात असे शकुनीमामा नक्‍कीच असल्‍याचे सांगितले. तसेच सदरील शकुनीमामां बद्दल संतापही व्‍यक्‍त केला. शिवाय असल्‍या शकुनीमामा उर्फ गद्दारामुळे मुळे पत्रकारिता क्षेत्राचे आणि पयार्याने लोकशाहीच्‍या चौथ्‍या स्‍तंभाचे सुध्‍दा खूप नुकसान होत असल्‍याचेही सांगितले.

सदरील शकुनीमामा अहंकारामध्‍ये हे सुध्‍दा विसरून जातो की, इतर चांगल्‍या पत्रकारांचे वाईट करण्‍याच्‍या नादात तो एकटा होत जातो आणि एकीचे बळ विसरून स्‍वत:च्‍या पायावर दगड मारून घेत असतो असेही मत मान्‍यवर पत्रकारांनी व्‍यक्‍त केले. खेकडा वृत्‍तीमुळे दुसऱ्या चांगल्‍या पत्रकारांचे पाय ओढण्‍याच्‍या नादात शकुनीमामा कायम खालीच राहतो. तसेच ज्‍या त्‍या ठिकाणी अनेक पत्रकारांमध्‍ये हा शकुनीमामा एकच असतो परंतू हा अनेकांसाठी अडथळे निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करत असतो. अशीही प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

इतरांचं सोडा गरीब कुटुंबातील सुध्‍दा एखाद्या पत्रकाराचे चुकूनही कोठे नाव निघाले किंवा त्‍याची कोणी स्‍तुती केली तरी या शकुनीमामाला चालत नाही कारण याला फक्‍त स्‍वत:ची उदोउदो हवी असते, इतरांचे नाव मोठे झाल्‍यास स्‍वत:चे महत्‍व कमी होईल आणि आपले काळे कारणामे बंद होतील अशी त्‍याला भिती असते असेही मत काही पत्रकार बांधवांनी व्‍यक्‍त केले.

इमाने इतबारे समाजहितासाठी पत्रकारिता करणाऱ्या निर्भीड पत्रकारांना या शकुनीमामामुळे खूप काही फरक पडतो अशातला भाग नाही, परंतू सर्वसामान्‍य जनतेच्‍या समस्‍या दूर होण्‍यास आणि जनतेचे प्रश्‍न मार्गी लागण्‍यात विनाकारण अडथळा निर्माण होतो. अर्थातच काही प्रमाणात का असेना चांगल्‍या पत्रकारांना या शकुनीमामाचा नक्‍कीच त्रास होतो अशीही प्रतिक्रिया काही पत्रकारांनी दिली आहे.

खरं तर पत्रकारिता क्षेत्रातल्‍या असल्‍या शकुनीमामांना लाजा वाटल्‍या पाहिजे, वर्षानुवर्षे पत्रकारांचे प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबित आहेत, असंख्‍य पत्रकारांना समाजहितासाठी पत्रकारिता करत असतांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो, कुटुंबाचे पालन पोषण करतांना तारेवरची कसरत करावी लागते. वेळ आणि पैसाही खर्च होतो तरीही ते तक्रार करत नाहीत. त्‍याच पत्रकार बांधवांचे खच्‍चीकरण, लावालावी आणि कटकारस्‍थान रचून शकुनीमामाला सुख समाधानाची झोप तरी येत असेल का ? अशी तिव्र भावना काही पत्रकारांनी व्‍यक्‍त केली आहे.

समस्‍त पत्रकारांनी आपल्‍या शहरात, तालुक्‍यात या क्षेत्राचा मुखवटा घातलेल्‍या किंवा पडद्यामागे लपलेल्‍या शकुनीमामाचा वेळीच शोध घेवून त्‍याच्‍या पासून सावध होणे आणि पाणी डोक्‍यावरून जात असेल त्‍याच्‍या विषयी कायद्याच्‍या चौकटीत योग्‍य ते पाऊल उचलणे आवश्‍यक असल्‍याचेही मत अनेक पत्रकारांनी व्‍यक्‍त केले आहे.

इतर क्षेत्रातील प्रतिक्रिया !

एवढंच नव्‍हे तर सन्‍माननीय राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्‍यवरांनी सुध्‍दा पत्रकारिता क्षेत्रात शकुनीमामा सक्रीय असल्‍याचे मान्‍य करून एल्‍गार न्‍यूजने उपस्थित केलेले मुद्दे योग्‍य असल्‍याचे नमूद केले आहे. तसेच लोकशाहीच्‍या चौथ्‍या स्‍तंभासाठी असले शकुनीमामा धोकादायक असल्‍याचेही सदरील प्रतिक्रियेद्वारे कळविले आहे.

परवेज पठाण,
संपादक, एल्‍गार न्‍यूज (जालना)
9890515043


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!