एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
शासन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने विविध योजना सुरू करत असते, मात्र त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसाठी सर्वसामान्य नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतो याचा कदाचित विचार शासन करत नसेल किंवा तसा अंदाजच शासन प्रशासनाला अजूनही आला नाही असंच म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच की काय जालना जिल्ह्यात नागरिकांचे आधारकेंद्रावर प्रचंड हाल होत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे, एवढंच नव्हे तर बँकींग व्यवहारासाठी, शाळा महाविद्यालयात अॅडमिशन व शिष्यवृत्तीसाठी, शासकीय कार्यालयातून कागदपत्र काढण्यासाठी तसेच इतर अनेक कारणांसाठी सुध्दा आधारकार्ड आवश्यक आहे. इथपर्यंत तर ठीक आहे.
मात्र आधारकार्डवर छोटीशी चूक असली तरी ते आधार अपडेट किंवा दुरूस्त करावे लागते, आधार दुरूस्ती किंवा अपडेटसाठीही नागरिक तयार सुध्दा आहेत परंतू त्यासाठी लोकसंख्येच्या तुलनेने आवश्यक असलेले आधारकेंद्र आपल्याकडे उपलब्ध आहे का ? 30-30 गावांसाठी एक आधारकेंद्र असल्यावर येणाऱ्या नागरिकांचे काम होणे शक्य आहे का ? याचा विचार शासन किंवा प्रशासनाने केलेला दिसत नाही.
नागरिकांचे प्रचंड हाल !
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड हा सर्वात महत्वाचा पुरावा आहे. मात्र त्यात छोटीशी चूक असली किंवा त्रुटी असली तरी आधार केंद्रावर जावून दुरूस्ती किंवा अपडेट करणे आवश्यक करण्यात आलेले आहे. त्यामुळे सध्या महिला, लहान मुले, वयोवृध्दांसह नागरिक मोठ्या प्रमाणावर आधार केंद्रावर वारंवार चकरा मारत आहेत.
केंद्रावर गर्दी कशाची ?
सदरील आधार केंद्रावर आधारला मोबाईल लिंक करणे, जन्म तारखेत दुरूस्ती, नावाच्या स्पेलिंग मध्ये दुरूस्ती, पत्यात बदल, नवविवाहित महिलांना लग्नापूर्वीचे नाव दुरूस्त करून पतीकडचे नाव टाकणे, आधारकार्ड अपडेट करणे, बोटांचे ठसे, फोटो अपडेट करणे अशी विविध प्रकारची माहिती दुरूस्ती व अपडेट करण्यासाठी जिल्हाभरात आधार केंद्रावर महिला, लहान मुले, वयोवृध्दांसह नागरिकांच्या मागील अनेक दिवसांपासून रांगा दिसून येत आहेत.
घनसावंगी तालुक्यात अडचणी !
घनसावंगी तालुक्यात मोजकेच आधार केंद्र असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, एका एका आधारकेंद्रावर 20 ते 30 गावांचा भार असल्याचे दिसून येत आहे. घनसावंगी तालुक्यात जवळपास 117 गावे आहेत मात्र आधार केंद्रांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव हे मोठे मार्केटचे शहर आहे, शहराची लोकसंख्या अंदाजे 20 ते 25 हजार आहे. शिवाय आसपासच्या 30 ते 40 गावांचा केंद्राबिंदू हे शहर आहे. मागील काळात शहरात 4 आधारकेंद्र होते, मात्र आजघडीला फक्त 1 आधार केंद्रावरच कुंभार पिंपळगावसह परिसरातील गावांचा भार असल्याचे दिसून येत आहे.
भीक नको पण…!
येणाऱ्या नागरिकांची संख्या पाहून आधार केंद्रावाले आमची जेवढी कॅपेसिटी आहे तेवढे आम्ही करत आहोत असे सांगत आहेत. आधार केंद्राची संख्या मर्यादित असल्यामुळे आधार केंद्रावर येणाऱ्या महिला, लहान मुले, वयोवृध्दांसह नागरिकांना दिवसभर उपाशी ताटकळत बसावे लागत आहे, अनेकजण चार चार दिवस आधार केंद्रावर चकरा मारत आहेत परंतू त्यांचा नंबर लागत नाही. अर्थातच नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने भीक नको पण कुत्रा आवर म्हणण्याची वेळ आली असल्याचे नागरिक सांगत आहेत.
आधार केंद्राची संख्या अपुरी !
कुंभार पिंपळगांव व घनसावंगी तालुक्यासह जालना जिल्ह्यात किती आधार केंद्र आहेत ? जेथे आधार केंद्र आहे त्यावर किती गावांचा भार आहे ? त्या गावांची एकूण लोकसंख्या किती आहे ? सध्या शासनाच्या योजना किती आहेत ? एका दिवसात एका आधार केंद्रावर किती नागरिकांचे आधार अपडेट व दुरूस्ती होवू शकते ? या सर्व प्रश्नांचे उत्तर जिल्हा प्रशासनाने शोधल्यास त्यांना सत्य परिस्थिती दिसून येईल. त्यामुळे कुंभार पिंपळगांवसह घनसावंगी तालुक्यात व जालना जिल्ह्यात तात्काळ आधार केंद्रांची संख्या वाढवून शासन प्रशासनाने नागरिकांना होणारा त्रास दूर करावा एवढीच माफक अपेक्षा व्यक्त होत आहे.