एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
निवडणुकीच्या पूर्वी ज्या लाडक्या बहिणी अत्यंत प्रिय वाटत होत्या त्या निवडणुकीच्या नंतर लगेचच सावत्र वाटू लागल्या आहेत का ? निवडणुकीपूर्वी सरसकट लाडक्या बहिणींच्या बॅंक खात्यात १५०० रूपये टाकले अन आता निवडणूक जिंकल्यानंतर दाजीकडे चार चाकी गाडी असल्याचे सांगून लाडक्या बहिणींचे १५०० रूपये बंद करत आहेत, हे योग्य आहे का ? असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणींनी उपस्थित केला आहे.
सरकारने लाडक्या बहिणींच्या घरात किंवा दाजी कडे चार चाकी वाहन असेल तर पुढील काळात योजनेचा लाभ मिळणार नाही असे सांगितले आहे. स्पष्टीकरण देतांना ही अट आधीपासूनच होती असे सांगण्यात आले आहे. याबाबत काही भगीनींची प्रतिक्रिया घेतली असता बहुतांश प्रतिक्रियांमधून नाराजीचा सूर दिसून येत आहे.
योजनेचे निकष काय ?
अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, अर्जदार महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे, शासनाच्या इतर आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी, २१ ते ६५ वयोगट असावे आणि अर्जदार महिलेच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी वाहन नसावे इत्यादी निकष असल्याचे सांगितले जात आहे.
वंचित ठेवण्याचे नियोजन ?
ज्यांना सरकारची सदरील भुमिका योग्य वाटत नाही त्या भगीनींनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार निवडणुकीच्या आधी सरकारने मोठा गाजावाजा करून राज्यातील लाखो महिलांना लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून १५०० रूपये थेट खात्यात देवून एक प्रकारे मोठी भेट दिली. जेव्हा आमच्या बॅंक खात्यात पैसे आले तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सलग हप्ते येत राहिल्याने राज्यातील लाडक्या बहिणींनी परतफेड म्हणून निवडणुकीत भरघोस मतदान करून प्रचंड बहुमताने पुन्हा सरकार स्थापन करण्यात सिंहाचा वाटा उचलला. परंतू निवडणुका संपल्यावर आता नियमांचे कारण देवून अनेक लाडक्या बहिणींना वंचित ठेवण्याचे नियोजन होत असल्याचे मत अनेक महिलांनी व्यक्त केले आहे.
२१०० देण्याचे आश्वासन !
निवडणुकीच्या पूर्वी सरकार तर्फे लाडक्या बहिणींना १५०० देण्यात आले व पुन्हा सरकार आल्यास २१०० देवू अशी घोषणाही करण्यात आली. परंतू निवडणुका संपल्यावर नवनवे नियम ऐकून २१०० तर जावू द्या आता १५०० सुध्दा मिळतील की नाही अशी शंका येवू लागल्याचे अनेक महिलांनी सांगितले आहे.
टॅक्स हवाय पण !
श्रीमंतांना १५०० रूपयांची आवश्यकता नाही हे मान्य आहे. श्रीमंतांना १५०० द्यावेच असा कोणाचाच आग्रह नाही, परंतू एखाद्या लाडक्या बहिणीचे पती म्हणजे लाडके दाजी यांनी हप्त्यावर ५ लाखाची नवीन कार घेतली किंवा छोटे लोडींग वाहन जरी घेतले तरी त्याच्याकडून सरकार जवळपास २ ते अडीच लाख रूपये कर (टॅक्स) घेत असल्याचे आम्ही ऐकले आहे. म्हणजे दाजी कडून लाखाने कर पाहिजे पण लाडक्या बहिणीला १५०० रूपये द्यायचे नाही, अशीही प्रतिक्रिया काही महिलांनी दिली आहे.
भंगार गाडी असली तरी !
महागड्या किंवा रोख स्वरूपात घेतलेल्या नवीन कारच्या बाबतीत सदरील नियम असल्यास एकदाचा लक्षात येवू शकतो. परंतू जुन्या कारचं काय ? आजघडीला दुचाकीच्या किंमतीत सेकंडहॅण्ड किंवा जुनी चार चाकी कार मिळत आहे. एकीकडे दुचाकीची किंमत एक लाख किंवा त्यापेक्षाही जास्त आहे आणि त्याच्यापेक्षा कमी किंमतीत सुध्दा जुनी कार मार्केट मध्ये सहज मिळते. मग एखाद्या दाजीने जुनी कार घेतली तर त्याला किंवा लाडक्या बहिणीला श्रीमंत समजायचे का ? असा सवाल सुध्दा काही महिलांनी केला आहे.
उपजिविकेचं साधन !
राज्यातील अनेक लाडक्या बहिणींचे किंवा दाजीचे उत्पन्नाचे प्रमुख साधन हे माल वाहतुकीचे चार चाकी लोडींग वाहन आहे. जर दाजीने हे लोडींग वाहन चालविले नाही तर लाडक्या बहिणींवर उपासमारीची वेळ येईल. अनेकांनी तर हप्त्यांवर चारचाकी गाडी घेवून फिरते व्यवसाय सुरू केले आहे त्यांचे काय ? अनेकजण हप्त्यावर ट्रॅक्टर घेवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत, मग हे सर्व अपात्र ठरवणार का ? असा सवालही लाडक्या बहिणींनी केला आहे.
अनेकजण श्रीमंत पण कार नाही !
राज्यात असे अनेक कुटुंब आहेत जे कोट्याधीश आहेत परंतू त्यांच्याकडे चार चाकी गाडी नाही, मग अशा कुटुंबांना सुध्दा तुम्ही योजनेचा लाभ देणार आहात का ? असा सवालही काही महिलांनी केला आहे.
लाडक्या बहिणीचा काय दोष ?
शासनाच्या इतर नियमांसह वार्षिक अडीच लाखाच्या उत्पन्नाची अट सुध्दा मान्य असल्याचे महिला सांगत आहेत, परंतू आता स्वस्तात जुन्या कार मिळत असल्याने अनेकांच्या कुटुंबात जुनी (सेकंड हॅण्ड) कार आहे. पती किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याकडे जर अशी कार असेल तर त्यात लाभार्थी महिलेचा काय दोष ? कुटुंबात कोणी हप्त्यावर कार किंवा लोडींग वाहन किंवा ट्रॅक्टर किंवा टॅक्सी घेतली असेल तर लाडक्या बहिणींना अपात्र ठरवणे योग्य आहे का ? असेही मत काही महिलांनी व्यक्त केले आहे.
अर्ज करतांना दाजी हैराण !
जेव्हा सदरील योजना सुरू झाली तेव्हा सतराशे साठ कागदपत्र जमा करण्यात मिस्टर बेजार होते, आधार अपडेट, काना मात्रा, प्रिंट मिस्टेक, बॅंकेतील दुरूस्ती, पळापळ यामध्ये दाजींचा तीन चार दिवसांचा रोजगार तर बुडालाच पण खिशातले २ – ३ हजारही खर्च झाले. दुसऱ्याचे पैसे आले अन आपले नाही आले म्हणून त्या काळात अनेक लाडक्या बहिणींनी दाजींना दोन सुखाचे घास शांतपणे खाऊ दिले नाहीत. कशी बशी योजना सुरू झाली, पैसे खात्यावर आले, आता थोडं बरं वाटत असतांनाच आता शासनाला नवंनवं सुचत असल्याचे महिला सांगत आहेत.
लाडक्या बहिणी नाराज !
लक्झरी गाडी किंवा कॅश मध्ये घेतलेल्या गाडीचं जावू द्या, पण लाडक्या बहिणीकडे हप्त्यावर घेतलेली किंवा जुनी गाडी सुध्दा दिसू नये अशी सरकारची मानसिकता आहे का ? जेवणाचा भरलेला ताट समोर करायचा आणि दोन घास खालले की ताट ओढून घेत बस झालं म्हणायचं असंच काही सध्या चालल्याचं काही महिलांनी सांगितलं आहे. शासनाने राज्यातील लाडक्या बहिणींच्या नाराजीचा विचार करूनच निर्णय घ्यावा अशी अपेक्षा असंख्य महिलांनी व्यक्त केली आहे.