Your Alt Text

कोट्यावधी रूपये कमावणाऱ्या घनसावंगी कृ.उ.बाजार समितीला शेतकऱ्यांसाठी साधे शौचालय सुध्‍दा का बांधता आले नाही ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
शेतकऱ्यांच्‍या आणि छोट्या व्‍यापाऱ्यांच्‍या जीवावर कोट्यावधी रूपये कमवायचे किंबहुना गिळून टाकायचे पण सुविधा देण्‍याची वेळ आली तर हात वर करून जबाबदारीतून पळ काढायचा असा काही प्रकार सध्‍या कुंभार पिंपळगांव येथील कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती मध्‍ये पहायला मिळत आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे घनसावंगी कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीची मुख्‍य बाजारपेठ आहे. बाजार समितीला अनेक एकर जमीन सुध्‍दा आहे. बाजार समितीची जागा अंबड – पाथरी हायवेला लागून असल्‍यामुळे मागील काळात जवळपास 48 व्‍यापारी गाळे काढण्‍यात आले होते.

प्राप्‍त माहितीनुसार सुरूवातीला सदरील गाळे 5 ते 10 लाख आणि नंतर 10 ते 20 लाख दरम्‍यान काही अटी व शर्तींसह गाळे विक्री करण्‍यात आले, अर्थातच यातून कोट्यावधी रूपये कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीला मिळाले, गाळ्यांचे बांधकाम व इतर कारणासाठी काही अंशी खर्च झाला असेल परंतू बाकी रक्‍कमेचे काय झाले याचे उत्‍तर सर्वसामान्‍य शेतकरी व नागरिकांना मिळालेले नाही.

बाजाराच्‍या दिवशी कमाई !

कुंभार पिंपळगांव येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरत असतो, कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या आवारात भुसार माल, कापूस व इतर मालाची कोट्यावधी रूपयांची खरेदी विक्री होते, शिवाय परिसरातील सर्वात मोठा बैलांचा बाजार सुध्‍दा येथे भरतो, या माध्‍यमातून सुध्‍दा मार्केट कमिटीला मोठी कमाई होत असते.

सदरील कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या आवारात हजारो शेतकरी व व्‍यापारी येत असतात, मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचे व्‍यवहार होत असतात आणि यातूनच कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीला मोठा फायदा होत असतो. परंतू ज्‍या शेतकरी आणि व्‍यापाऱ्यांच्‍या जीवावर कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती सुरू आहे त्‍या शेतकरी आणि व्‍यापाऱ्यांसाठी सुविधांच्‍या नावाने बोंबाबोंब आहे. अर्थात कोणत्‍याही सुविधा नसल्‍याचे शेतकरी सांगत आहेत.

घाण व दुर्गंधी !

कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या आवारात मोठ्या प्रमाणावर कचरा व घाण पसरलेली आहे, याच आवारात लोक उघड्यावर शौचास बसतात, लघवी करतात. कोणतीच सुविधा नसल्‍यामुळे घाण व दुर्गंधी मध्‍येच येणाऱ्या शेतकऱ्यांना थांबावे लागते किंवा बसावे लागते. जिकडे जिकडे घाण व दुर्गंधी पसरलेली असून येणाऱ्या शेतकरी व नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे.

महिलांचीही कुचंबना !

कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या परिसरात शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी व शेतमजूर महिलांचीही येथे शौचालय नसल्‍यामुळे मोठी कुचंबना होत आहे. वारंवार शौचालयाची मागणी करण्‍यात आली मात्र कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीला काहीही फरक पडलेला नाही.

स्‍वच्‍छता व शौचालयाकडे दुर्लक्ष !

शेतकऱ्यांच्‍या जीवावर कोट्यावधी रूपये कमवणाऱ्या कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीला आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी साधे शौचालय सुध्‍दा का बांधता आले नाही असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. शिवाय स्‍वच्‍छतेकडेही पूर्णपणे दुर्लक्ष करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे खिसे भरण्‍यासाठीच कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती उरलेली आहे का ? असा सवाल शेतकरी करत आहेत.

पे अॅण्‍ड यूज सुविधा तरी द्या !

कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीला शेतकऱ्यांसाठी मोफत शौचालय अथवा स्‍वच्‍छतागृहाची सुविधा देणे शक्‍य नसेल तर त्‍यांनी Pay & Use या प्रकारे स्‍वच्‍छतागृह (शौचालय) बांधून एखाद्या व्‍यक्‍तीला वार्षिक करारानुसार हे स्‍वच्‍छतागृह चालवायला द्यावे आणि संबंधित व्‍यक्‍तीने या सुविधेसाठी लोकांकडून नाममात्र शुल्‍क घ्‍यावे, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

बोलाचा भात अन…!

विविध समस्‍यांबाबत शेतकऱ्यांच्‍या प्रतिक्रिया घेतल्‍या असता, मागील 8 महिन्‍यांपूर्वी निवड झालेल्‍या नवीन सभापतींनी मोठमोठ्या गप्‍पा हाणल्‍या, मागचं जावू द्या पण यापुढे मार्केट कमिटीचा असा कायापालट करू आणि एवढ्या सुविधा शेतकऱ्यांना देवू की सर्वांना कायम लक्षात राहील असे सांगितले होते, मात्र अपवाद सोडल्‍यास बोलाचा भात आणि बोलाचीच कढी या म्‍हणी प्रमाणे विशेष काही झालेले दिसत नाही अशी प्रतिक्रिया अनेक शेतकरी व व्‍यापाऱ्यांनी दिली आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

महत्‍वपूर्ण बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.


आम्‍हाला कळवा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!