एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी जिल्हा परिषद गटाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे, कारण या भागात विविध पक्षाचे अनेक मातब्बर पदाधिकारी असल्याने या गटावर वर्चस्व स्थापित करण्यासाठी विविध पक्ष प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक तारीख लवकरच जाहीर होणार यात शंका नाही. त्यादृष्टीने विविध पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने अद्याप युती किंवा आघाडी बाबत स्पष्ट असे संकेत मिळालेले नसल्याने सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी ठेवल्याचे दिसत आहे. सध्या राजाटाकळी जिल्हा परिषद गटातून इच्छुक असलेल्या उमेदवारांची माहिती खालील प्रमाणे आहे.
सौ.सुमनबाई शंकरराव आर्दड
एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे घनसावंगी तालुकाप्रमुख प्रमुख असलेले बापुसाहेब आर्दड हे त्यांच्या मातोश्री सौ.सुमनबाई शंकरराव आर्दड यांना राजाटाकळी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. राजाटाकळी येथील ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांपासून बापुसाहेब आर्दड यांचे वर्चस्व आहे. आमदार डॉ.हिकमत उढाण यांचे समर्थक असलेले बापुसाहेब आर्दड हे सामाजिक कार्यात सहभागी असतात. यामध्ये शेतकऱ्यांना विहीरी, गोठे व इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, शेत रस्ते करणे, सिमेंट रस्ते करणे, पेव्हर ब्लॉक बसवणे, शासकीय कार्यालयात नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांचे काम मार्गी लावणे, मुख्यमंत्री सहायता निधीतून रूग्णांना लाभ मिळवून देणे, शेतकरी व तरूणांना कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे ते करत असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. बापुसाहेब आर्दड यांचा जिल्हा परिषद गटासह तालुक्यात चांगला जनसंपर्क असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे पक्षाने संधी दिल्यास बापूसाहेब आर्दड हे त्यांच्या मातोश्री सौ.सुमनबाई शंकरराव आर्दड यांना राजाटाकळी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवू शकतात.
सौ.सुवर्णा अशोक राजेजाधव
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले अशोक राजेजाधव हे त्यांच्या पत्नी सौ.सुवर्णा अशोक राजेजाधव यांना राजाटाकळी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. अशोक राजेजाधव यांचा सामाजिक कार्यात नेहमी सहभाग असतो. शेतकरी आंदोलनांमध्ये सुध्दा ते सहभागी होवून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतात. ऊस बागायतदारांच्या प्रश्नांवर ते अनेक वर्षांपासून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करत आहेत. शिवाय शेतकऱ्यांना पिक विमा व अनुदानासाठी सुध्दा त्यांचे प्रयत्न सुरू असतात. तहसील, पंचायत समिती, पोलीस ठाणे व इतर शासकीय कार्यालयात नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो असे कार्यकर्ते सांगतात. परखडपणे आपले मत मांडण्यासाठी अशोकराजे जाधव हे सर्वपरिचित आहेत. अशोक राजेजाधव यांचा राजटाकळी जिल्हा परिषद गटासह घनसावंगी तालुक्यात चांगला जनसंपर्क असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. पक्षाने संधी दिल्यास अशोक राजे जाधव हे त्यांच्या पत्नी सौ.सुवर्णा अशोक राजेजाधव यांना राजाटाकळी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवू शकतात.
सौ.शालीनी रविंद्र आर्दड
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) या पक्षाचे कार्यकर्ते तथा घनसावंगी तालुका रोजगार हमी योजना समितीचे माजी तालुकाध्यक्ष असलेले रविंद्र आर्दड हे त्यांच्या पत्नी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.शालीनी रविंद्र आर्दड यांना राजाटाकळी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. सौ.शालीनी रविंद्र आर्दड यांनी मागील काळात जिल्हा परिषद सदस्य असतांना जि.प.फंडातून घाटाचे बांधकाम, खासदार फंडातून विविध ठिकाणी सभामंडप, सिमेंट रस्ते व इतर विकासकामे केली आहेत. रविंद्र आर्दड यांनी विविध प्रशासकीय कामात नागरिकांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे कार्यकर्ते सांगतात. संजय गांधी निराधार योजने अंतर्गत निराधार महिलांना मानधन सुरू करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केल्याचे नागरिक सांगतात. रविंद्र आर्दड यांचा जि.प.गटासह तालुक्यात जनसंपर्क असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. पक्षाने संधी दिल्यास रविंद्र आर्दड हे त्यांच्या पत्नी सौ.शालीनी रविंद्र आर्दड यांना राजाटाकळी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवू शकतात.
डॉ.सौ.सुचिता विजयसिंह खरात
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) या पक्षाचे कार्यकर्ते असलेले तथा २० वर्षे मंगरूळच्या ग्रामपंचायतवर वर्चस्व स्थापित करणारे विजयसिंह खरात पाटील हे त्यांच्या पत्नी डॉ.सौ.सुचिता विजयसिंह खरात यांना राजाटाकळी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. विजयसिंह खरात यांनी कोरोना महामारीत परिसरातील अनेक रूग्णांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, परिसरातील पुरग्रस्तांना मदत केली, सिमेंट रस्ते तयार केले. शिवाय विजयसिंह खरात हे उद्योजक असल्याने त्यांनी अनेक तरूणांना रोजगार उपलब्ध करून दिला असून तरूणांना उद्योग व्यवसायासाठी ते प्रोत्साहन देत असतात असे कार्यकर्ते सांगतात. तसेच इच्छुक उमेदवार डॉ.सौ.सुचिता विजयसिंह खरात ह्या स्वत: डॉक्टर असून अनेक वर्षाच्या वैद्यकीय सेवेच्या कार्यकाळात त्यांनी असंख्य रूग्णांना चांगली आरोग्य सेवा दिल्याचेही नागरिक सांगतात. विजयसिंह खरात यांचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध असून पक्षाने संधी दिल्यास विजयसिंह खरात हे त्यांच्या पत्नी डॉ.सौ.सुचिता विजयसिंह खरात यांना राजाटाकळी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवू शकतात.
कल्याणी गजानन तौर
एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेत कार्यरत असलेल्या कल्याणी गजानन तौर ह्या राजाटाकळी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पतीच्या निधनानंतरही त्यांनी सामाजिक कार्य करणे सुरूच ठेवले. त्यांनी मागील काळात ३६४ जणांचे रक्तदान शिबीर घेतले, १८ गावातील भजनी मंडळींना साहित्य वाटप केले. याशिवाय अनाथाश्रमात स्वेटर वाटप करणे, अपंग विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करणे, गोशाळेला चारा वाटप करणे, वेळोवेळी रूग्णांना दवाखान्यात काही सहकार्य लागल्यास सहकार्य करणे असे अनेक सामाजिक कार्य आणि उपक्रम त्या राबवत असतात. गजानन तौर यांचा तालुक्यात चांगला जनसंपर्क होता, त्यादृष्टीने पक्ष कल्याणी गजानन तौर यांच्या उमेदवारीचा विचार करू शकतो असे त्यांचे समर्थक सांगतात. अर्थातच पक्षाने संधी दिल्यास कल्याणी गजानन तौर ह्या राजाटाकळी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवू शकतात.
मातब्बर मंडळी रिंगणात !
राजाटाकळी जिल्हा परिषद गटात अनेक मातब्बर मंडळी रिंगणात उतरणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याने विविध इच्छुक उमेदवारांनी पक्ष नेतृत्वाकडे उमेदवारीसाठी फिल्डींग लावल्याचे दिसत आहे. एकूणच परिस्थिती पाहता राजाटाकळी जिल्हा परिषद गटात चांगलीच चुरस पहायला मिळू शकते असे म्हणायला हरकत नाही.
अनेक मान्यवर इच्छुक !
राजाटाकळी गटात अनेक मान्यवर इच्छुक असण्याची शक्यता आहे, परंतू एल्गार न्यूजला प्राप्त माहितीच्या आधारे वरील माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. याचा अर्थ एवढेच उमेदवार रिंगणात असतील असे नाही. इच्छुक उमेदवार यापेक्षा अधिक असण्याची शक्यता असून अनेक मान्यवर रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात ज्या मान्यवरांची माहिती प्राप्त होईल त्यानुसार पुनश्च बातमी प्रकाशित करून उमेदवारांची माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल.