एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
नजीकच्या काळात म्हणजेच लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, मागील पंचवार्षिक पेक्षा यावेळी राजकीय परिस्थिती बऱ्याच प्रमाणात वेगळी असल्यामुळे राजकीय गणितं सुध्दा बदलली आहेत. विरोधक सहकारी झाले आहेत आणि सहकारी विरोधक झाले आहेत. त्याचाच परिणाम जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघातही पहायला मिळत आहे.
मागील पंचवार्षिक मध्ये दोन प्रमुख उमेदवारांमध्ये सरळ लढत पहायला मिळाली होती. अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे आणि शिवसेनेचे हिकमत उढाण या दोघांमध्ये लढत झाली होती. या दोघांपैकी राजेश टोपे यांचा निसटता विजय झाला होता, म्हणजेच हिकमत उढाण यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला होता. मात्र आता राजकीय परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे अर्थातच राजकीय गणिते सुध्दा बदलली आहेत.
सध्याची परिस्थिती काय ?
मागील काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये झालेल्या राजकीय फुटीमुळे गणिते बदलली आहेत. सध्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तीन प्रमुख पक्ष महायुती मध्ये आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष म्हणजे महाविकास आघाडी मध्ये आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना एकसंघ पक्ष होता, म्हणजे तेव्हा पक्षात फुट नव्हती, त्यावेळी घनसावंगी मतदार संघात शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाली होती, परंतू सध्या हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडी मध्ये आहेत. जर सध्या रनिंग असलेल्या आमदारालाच महाविकास आघाडीने उमेदवारी देण्याचे निश्चित केले तर राजेश टोपे यांना पुन्हा उमेदवारी मिळू शकते आणि ही शक्यता तुर्तास तरी दिसून येते.
जर राजेश टोपेंना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली तर मग त्यांच्या विरूध्द मागील विधानसभेला लढलेले आणि राजेश टोपेंचे कट्टर विरोधक असलेले हिकमत उढाण काय निर्णय घेणार ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता हिकमत उढाण आणि राजेश टोपे हे एका व्यासपीठावर मुळीच येत नाहीत. म्हण्जेच दोघांमध्ये 36 चा आकडा आहे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
हिकमत उढाण काय निर्णय घेणार ?
हिकमत उढाण हे सध्या शिवसेना (उबाठा) सहसंपर्कप्रमुख असून घनसावंगी मतदारसंघात राजेश टोपे यांच्या प्रमाणेच हिकमत उढाण यांचेही कट्टर समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत, मागील काळात हिकमत उढाण यांनी एक कारखाना सुरू केला होता आणि आता ते पुन्हा एक नवीन व मोठा कारखाना सुरू करत आहेत. म्हणजेच पुढील राजकीय प्रवास लक्षात घेवूनच त्यांनी मतदारसंघात साखरपेरणी आधी पासूनच सुरू केलेली आहे.
आमदार राजेश टोपे यांच्याकडे कारखाना, विविध संस्था, शाळा कॉलेज यासह नेटवर्क चांगला आहे. शिवाय दोन दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून ते सलग आमदार आहेत. तर हिकमत उढाण यांनीही मागील दशकभरापासून मतदारसंघात जनसंपर्क सुरूच ठेवल्याने त्यांचाही नेटवर्क चांगला असल्याचे दिसत आहे.
हिकमत उढाण यांनी राजेश टोपें विरूध्द लढण्याच्या दृष्टीने जे जे करणे शक्य आहे ते ते करण्याची तयारी सुरू केल्याचे वारंवार दिसून येत आहे. मात्र बदललेली राजकीय परिस्थिती पाहता समिकरणे बदलली आहेत. तुर्तास तरी संभ्रमावस्था असली तरी जानकार काही शक्यता व्यक्त करत आहेत. ज्यामध्ये…
1) मविआ कडून राजेश टोपेंना जर उमेदवारी मिळाली तर हिकमत दादांना महाविकासआघाडी धर्म पाळावा लागेल म्हणजेच राजेश टोपेंना सपोर्ट करावा लागेल, मात्र हिकमत उढाण राजेश टोपेंना सपोर्ट करतील अशी शक्यता तुर्तास तरी किंचितही दिसून येत नाही. म्हणजेच हिकमत उढाण हे निवडणुक लढवणार हे ठामपणे दिसत आहे.
2) दूसरी शक्यता म्हणजे हिकमत उढाण महायुती मधील तीन पक्षापैकी एका पक्षात प्रवेश करून उमेदवारीसाठी प्रयत्न करू शकतात, परंतू भाजचे सतिष घाटगे पाटील गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत ते माघार घेवून हिकमत उढाण यांना सपोर्ट करतील का ? हा एक प्रश्न आहे.
3) तिसरी शक्यता म्हणजे हिकमत उढाण हे कोणत्याही पक्षात प्रवेश न करता थेट अपक्ष म्हणून निवडणूक लढू शकतात.
तुर्तास तरी या 3 शक्यता दिसून येत आहेत. कारण विधानसभेऐवजी विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी हिकमत उढाण यापूर्वीपासूनच इच्छुक नाहीत. ते विधानसभा लढवण्यावरच ठाम आहेत, त्यामुळे हिकमत उढाण घनसावंगी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणारच हे आजतरी निश्चितच दिसत आहे यात शंका नाही.
इतर इच्छुकांचे काय ?
मागील 5 वर्षात भाजपचे सतिश घाटगे हे सुध्दा सक्रीय झाले आहेत, समृध्दी कारखाना आणि पक्ष कार्याच्या माध्यमातून त्यांनीही घनसावंगी मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ते सुध्दा घनसावंगी मतदारसंघातून विधानसभेची निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत असे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र यदाकदाचित हिकमत उढाण यांनी महायुतीत प्रवेश केला तर महायुती समोर पेच निर्माण होणार आहे.
निवृत्त विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड हे सुध्दा निवृत्त झाल्यामुळे तसेच राजकारणात सक्रीय होण्याची त्यांची इच्छा दिसत असल्यामुळे ते सुध्दा घनसावंगी मतदारसंघातून विधानसभेची निवडणुक लढू शकतात अशी शक्यता दिसत आहे. अर्थातच उमेदवारीबाबत त्यांची चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे.
यासह भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव खरात, शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे हे सुध्दा इच्छुक असू शकतात, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व ज्येष्ठ नेते रविंद्र तौर सुध्दा पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढू शकतात, शिवाय शिवसेना (शिंदे गट) पंडीतराव भुतेकर हे सुध्दा इच्छुक असल्याची चर्चा आहे.
याचाच अर्थ “राजकीय परिस्थिती का उंट कब किस करवट बैठेगा कोई नही जानता” म्हणजेच घनसावंगी मतदार संघाची सध्याची परिस्थिती जरा गोंधळाचीच आहे. मात्र या सर्व राजकीय परिस्थिती मध्ये हिकमत उढाण काय निर्णय घेतात यावर बरंच काही अवलंबून आहे.
कन्फ्यूज कोण ?
हिकमत उढाण यांनी अद्यापपर्यंत त्यांची भुमिका गुलदस्त्यात ठेवल्यामुळे नेमके कन्फ्यूज हिकमत उढाण आहेत की ते राजेश टोपे, सतिष घाटगे किंवा इतर इच्छुकांना कन्फ्यूज करत आहेत हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
व्यक्ती केंद्रीत निवडणूक !
मजबूत पक्षाकडून तिकीट मिळाल्यास उमेदवाराला अधिक फायदा होतो यात शंका नाही. घनसावंगी मतदारसंघाची निवडणूक यापूर्वी जरी दोन पक्ष केंद्रीत होत आलेली असली तरी यावेळी ही निवडणूक व्यक्ती केंद्रीत होण्याची अधिक शक्यता आहे. म्हणजे विधानसभा निवडणुकीत घनसावंगी मतदारसंघातून उमेदवार 2 असोत, 3 असोत किंवा 4 असोत, ज्या उमेदवाराकडे स्वत:चा जनाधार आहे तसेच ज्या व्यक्तीला सामाजिक समिकरणाचा फायदा होणार आहे त्या व्यक्तीलाच निवडणुकीत विजय मिळवणे अधिक शक्य होणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि बदललेली समिकरणे पाहता राजकीय पक्षांना उमेदवारी देतांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे यात शंका नाही…
परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज
इतर बातम्या खाली पहा…
व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी वर किंवा खाली दिसत असलेल्या “जॉईन करा” या चिन्हाला क्लिक करून आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा.