एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
सर्वांसाठी घरे हे शासनाचे धोरण आहे. गोरगरीब, बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वत:चे हक्काचे घर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र शासनाच्या धोरणालाच खिशात ठेवून दलाल मनमर्जीप्रमाणे लाभार्थ्यांकडून पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राज्यात राबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ग्रामीण भागात दलालांमुळे पात्र लाभार्थ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. घनसावंगी तालुक्यात अनेक गावांमध्ये तर हा प्रकार सुरूच आहे, मात्र विशेष करून कुंभार पिंपळगावात अनेक दलाल किंवा एजंट घरकुलसाठी पहिल्या टप्प्यात ५ हजार रूपये घेत असल्याचे समोर आले आहे.
एवढंच नव्हे तर ५ हजार आत्ता द्यायचे आणि नंतर पुढील हप्ते मिळवण्यासाठी सुध्दा दलालांना पैसे द्यावे लागत असल्याचे बोलले जात आहे. कुंभार पिंपळगांवात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांसह मजूर, कामगार मोठा वर्ग आहे. अनेकांना योजनां बद्दल माहिती नसते, याचाच गैरफायदा एजंट किंवा दलाल घेत असून अनेकांकडून पैसे उकळत असल्याचे सांगितले जात आहे.
वर पैसे द्यावे लागतात !
सदरील एजंट किंवा दलाल ज्या व्यक्तीकडून पैसे घेत आहेत त्यांना सांगत आहेत की, काही दिल्याशिवाय काम होत नाही, आम्हाला खालपासून वर पर्यंत पैसे द्यावे लागतात, त्यामुळे तुम्हाला पैसे द्यावेच लागतील, नसता तुम्हाला घरकुलचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अनेकजण या एजंट किंवा दलालांच्या जाळ्यात अडकत आहेत.
खालपासून वर पर्यंत म्हणजे ?
जर एजंट खालपासून वर पर्यंत पैसे द्यावे लागतात असे म्हणत असतील तर नेमकं कोणाला द्यावे लागतात ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सर्वात महत्वाचे काम तर ग्रामपंचायत पासून सुरू होते आणि शासनाचा प्रतिनिधी म्हणून मग ग्रामसेवक (ग्रा.पं.अधिकारी) यांना सर्वात आधी मलाई जाते का ? वर म्हटल्यावर पंचायत समिती असते मग जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा किंवा अजून वर म्हटलं तर बरेच अधिकारी आहेत मग या सर्वांना मलाई जाते का ? असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
ग्रामसेवक कुठं आहेत ?
गावात गरजू व्यक्तींची यादी तयार करण्याचे काम हे ग्रामसेवक (ग्रा.पं.अधिकारी) यांचे असते. मग गावात अशा प्रकारे दलाली सुरू असतांना ग्रामसेवक काय करत आहेत ? अशा बेकायदेशीर वसुली मध्ये त्यांचा काही रोल आहे का ? यादी तयार करतांना घरोघरी जाणारे एजंट किंवा मुले यांना कोणी तोडपाणी करण्यास सांगितलं आहे ? तोडपाणी नुसार सर्वे कोण करत आहे ? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
सर्वेसाठी मुदतवाढ !
घरकुल योजनेत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी आधी ३० एप्रिल पर्यंत मुदत होती, परंतू आता १५ में पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी Awaas + या अॅप द्वारेही नोंदणी करू शकतात, अर्थातच यामध्ये पुन्हा ग्रामसेवकांची भुमिका महत्वाची राहते.
प्रशासनाने लक्ष द्यावे !
कुंभार पिंपळगांवसह घनसावंगी तालुक्यात घरकुलच्या नावाने लाभार्थ्यांना लुटणारी दलालांची टोळी सक्रीय झाल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे गटविकास अधिकारी, CEO, Dy. CEO, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हाधिकारी यांनी सुध्दा लक्ष देणे आणि दोषींवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे. नसता मलाई वरपर्यंत जाते असे दलाल म्हणत असतील तर नेमकी मलाई कुठपर्यंत जाते हा प्रश्न नागरिकांना वारंवार पडत राहील.