एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील एक युवक दि.२६ रोजी जवळच असलेल्या कॅनॉल मध्ये बुडाल्याची घटना घडली. सकाळ ते सायंकाळ पर्यंत शोधमोहिम सुरू होती, परंतू या दरम्यान घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुठे होते ? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील युवक शकील कुरेशी (वय ४०) हे दि.२६ रोजी गावाजवळ असलेल्या जायकवाडीच्या डाव्या कालव्यात बुडाल्याची माहिती नागरिकांना सकाळी मिळाली. असंख्य नागरिकांनी धावपळ करत डाव्या कालव्यात या युवकाला शोधण्याचा प्रयत्न केला, काही वेळाने आपत्ती व्यवस्थापन चे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून शोध मोहीम सुरू केली.
सकाळपासून पासून सायंकाळ पर्यंत ही शोध मोहीम सुरू होती, अनेकांनी सदरील डाव्या कालव्यातील पाण्यात उतरून शोधण्याचा प्रयत्न केला तर डाव्या कालव्यातून आष्टी व लोणी पर्यंत पथकाने बोटीद्वारे सुध्दा तपास केला, परंतू युवकाची बॉडी सापडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रविवार दि.२७ रोजी बॉडी सापडली.
पोलीस निरीक्षक कुठे होते ?
एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि.२६ रोजी घडली असतांना दिवसभर घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड हे कुठे होते ? पोलीस ठाण्याच्या हद्दीत युवक पाण्यात बुडाल्याची घटना घडते, तरीही पोलीस निरीक्षक यांना या घटनेचे गांभीर्य असू नये याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शोध मोहिमेत आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी असेलही परंतू घटना घडलेली असतांना शिवाय या ठिकाणी १५० ते २०० नागरिक उपस्थित असतांना पोलीस निरीक्षकांनी भेट देण्यास काही अडचण होती का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आले होते तर कधी ?
एकतर कुंभार पिंपळगांव पोलीस चौकीचे सहा.पोलीस निरीक्षक अशोक खरात हे सुट्टीवर होते, तर घनसावंगी पोलीस ठाण्याचे प्रमुख असलेले पोलीस निरीक्षक यांना एकाने विचारले की तुम्ही स्पॉटवर आले होते का, तेव्हा त्यांनी मी आलो होतो असे सांगितले, परंतू केव्हा आले होते किंवा वेळ कोणती होती हे त्यांनी सांगितले नाही.
पोलीस निरीक्षक दिसले नाही !
युवक कॅनॉल मध्ये बुडाल्याने शोध मोहीम सुरू असतांना पोलीस निरीक्षक कुठेच दिसले नाही असे उपस्थित नागरिकांनी सांगितले. यामध्ये माजी सरपंच, शासनाचे इतर कर्मचारी, कर्मचाऱ्यांचे मित्र, आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी, ड्रायव्हर, राजकीय कार्यकर्ते व गावातील असंख्य नागरिक जे स्पॉटवर उपस्थित होते, शिवाय शोध मोहिमेत जे लोक होते त्यांनाही पोलीस निरीक्षक कुठे दिसले नाही. अर्थात यापैकी अनेकजण शोध मोहीमेच्या सुरूवाती पासून शेवटपर्यंत म्हणजे सायंकाळपर्यंत स्पॉटवर होते मात्र कुणालाही पोलीस निरीक्षक केतन राठोड हे दिसले नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी पोलीस निरीक्षक घटनास्थळी आलेच नव्हते असे सर्वांच्या बोलण्यावरून दिसत आहे.
सर्कलवर दुर्लक्ष !
एकतर १५ ते २० गावांची जबाबदारी असलेल्या कुंभार पिंपळगांव चौकीला ३ ते ४ कर्मचारीच आहेत. तर सहा.पोलीस पोलीस निरीक्षक अशोक खरात हे दि.२६ रोजी सुट्टीवर असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र अशावेळी या सर्कल मधील घडणाऱ्या घटनांवर नेमकं लक्ष ठेवायचं कोणी ? पोलीस निरीक्षक केतन राठोड हे पोलीस ठाण्याचे प्रमुख असतांना जॉईन झाल्यापासून या सर्कल मध्ये अपवाद सोडल्यास ते दिसलेच नाही असे नागरिक वारंवार सांगत आहेत, आता पाण्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला असतांना शोध मोहिमेच्या दरम्यान जर पोलीस निरीक्षक साधी भेट देणार नसतील तर फक्त उंटावर बसून शेळ्या हाकण्यासाठी त्यांना येथे नियुक्ती देण्यात आलेली आहे का ? कर्तव्यात कसूर करून हे महाशय असंवेदनशीलपणा दाखवत असतील तर नागरिकांनी अपेक्षेने पहायचे कोणाकडे ? काही दिवसांपूर्वी गावात एकाच रात्री गावात ३ ते ४ दुकानांमध्ये चोरी झाली त्याच्या तपासाचे काय झाले ? इतर गुन्हे घडत आहेत त्याचे काय ? २ नंबरचे धंदे कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहेत ? मग बसल्याजागी फक्त मलाई खाण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे का ? असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.
वरिष्ठांनी चौकशी करावी !
दि.२६ रोजी युवकाचा कॅनॉल मध्ये पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दिवसभर शोधमोहीम सुरू असतांना पोलीस निरीक्षक केतन राठोड हे कुठे होते ? त्यांनी नेमकी कुठे भेट दिली ? यदाकदाचित घटनास्थळी त्यांनी भेट दिली असेल तर त्याची वेळ काय होती, त्यांनी घटनास्थळी भेट देवून कोणाकोणाशी चर्चा केली ? त्यांची नावे काय ? कोणाला काय सूचना केल्या ? ते घटनास्थळी किती वेळ होते ? अथवा त्यांनी घटनास्थळी भेट दिल्याचा पुरावा काय ? या सर्व प्रश्नांची उत्तरे उपविभागीय पोलीस अधिकारी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक आणि पोलीस अधिक्षक यांनी संबंधित पोलीस निरीक्षक यांच्याकडून घेणे गरजेचे आहे. एकूणच परिस्थिती पाहता कुंभार पिंपळगांव आणि सर्कल मधील गावांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.