एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
बहुतांश नागरिकांनी विहीरीतून पाण्याचा उपसा होत असल्याचे अनेकदा पाहिले असेल परंतू ग्रामपंचायत मधून पैशांचा उपसा झालाय असं ऐकून अनेकांना थोडं वेगळं वाटेल, परंतू होय असाच काही प्रकार घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे झाल्याचे दिसत आहे.
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे कुंभार पिंपळगांव… शहरासारखा चारही बाजूने विस्तार होत चालला असला तरी विकास नसल्याने या शहराला अजूनही गावच म्हणावे लागत आहे, गावाची लोकसंख्या जवळपास २० हजाराच्या आसपास आहे, ग्रामपंचायत मध्ये १७ सदस्य आहेत. गावात १००० पेक्षा जास्त दुकाने आहेत, बॅंका, पतसंस्था, शाळा, महाविद्यालय आहेत, अनेक खरेदी विक्रीचे व्यवहार येथे सुरू असतात.
कोट्यावधी रूपये चाललेत कुठे ?
कुंभार पिंपळगांव शहराला मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी तसेच वेगवेगळ्या योजना व विकास कामांसाठी दरवर्षी कोट्यावधी रूपये येत आहेत, मात्र हे पैसे नेमके खर्च कुठे होत आहेत याचा थांगपत्ता कोणाला लागत नसल्याचे दिसत आहे. शासनाकडून अकाउंट मध्ये पैसे आले की, अकाउंट मधून हे पैसे एवढ्या पटकन खाली होत आहे जणू २ – ३ दिवसांपासून पाण्यासाठी एखादा तहाणलेला व्यक्ती बसलेला असावा आणि त्याने पाणी दिसताच ग्लास सोडून भांडच तोंडाला लावावं, अशीच काही परिस्थिती कुंभार पिंपळगांवात दिसून येत आहे.
बाजार हराशी का नाही ?
दरवर्षी बाजार हराशी करणे क्रमप्राप्त असते, मात्र १ वर्षापेक्षा जास्त कालावधी होवूनही बाजार हराशी झालेली नाही. दर बुधवारी (बाजारात) वसुली मात्र अखंडपणे सुरू आहे. याबाबत काही महिन्यांपूर्वी ग्रामसेवक यांनी सांगितले होते की, बाजार हराशी झालेली नसली तरी ग्रामपंचायत स्वत: वसुली करत आहे, मात्र वसुलीचे पैसे कुठंय असे विचारले असता त्याचा हिशोब लवकरच देवू असे सांगितले होते, परंतू त्या गोष्टीला सुध्दा ८ महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, मात्र अद्याप हिशोब देण्यात आलेला नाही. अर्थातच हिशोब ठेवला असेल तर देतील नसता खिशात तर गृहीत धरलेलंच आहे.
लाखोंचा घोटाळा ?
कुंभार पिंपळगांवचा बुधवारी भरणारा आठवडी बाजार हा तालुक्यातील सर्वात मोठा बाजार असतो. साधरण ५० हजार च्या आसपास नागरिक या बाजारात येत असतात, सर्व प्रकारची दुकाने या बाजारात असतात, अंदाजे साधारण ८०० ते १००० दुकाने या बाजारामध्ये असतात. बाजारातील शेतकरी व व्यापाऱ्यांकडून १० ते २० रूपये घेणे अपेक्षित असताना, प्रत्येकी २० ते ५० रू. (कदाचित अधिक) दर बुधवारी या बाजारातील विक्रेत्यांकडून घेतले जातात, सरासरी ४० रू. जरी गृहीत धरले तरी बाजाराच्या दिवशी म्हणजे दर बुधवारी ४० हजार वसुली होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. म्हणजे महिन्याला १ लाख ६० हजार आणि वर्षाला १९ लाख २० हजार रूपये वसुल झाले असतील तर हे पैसे गेले कुठे ? म्हणजेच जवळपास २० लाखाचा हिशोब ग्रामसेवक (ग्रा.पं.अधिकारी) यांच्याकडे आहे का ? नसेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो घेणे आवश्यक असल्याचे काही सदस्यांसह नागरिक सांगत आहेत.
१५ व्या वित्त आयोगाचे काय ?
शासन १५ व्या वित्त आयोगातून कोट्यावधी रूपये ग्रामपंचायतला देत आहे, मात्र कुंभार पिंपळगांवचे ग्रामसेवक (ग्रा.पं.अधिकारी) हे या पैशाला स्वत:च्या मालकीचे पैसे समजून मनमर्जीप्रमाणे काढून घेत त्याची विल्हेवाट लावत असल्याचे दिसत आहे. कागदोपत्री ज्या कामासाठी खर्च दाखवण्यात येते त्या कामासाठी खर्च न करता दुसरीकडेच हे पैसे जात असल्याचे सदस्य व नागरिक सांगत आहेत.
३ – ४ जणच मालक !
ग्रामसेवक, प्रतिनिधी, स्थानिक गुत्तेदार यांच्यासह ग्रामपंचायतशी संबंधित ३ ते ४ जणच शासनाकडून येणाऱ्या पैशांचे मालक होवून बसले आहेत. गुत्तेदारीही सदरील लोकच करत आहेत. टक्केवारी किंवा घेणं – देणं सुध्दा ठरलेलं आहे, गावातील अजून एखादा छुपा रूस्तुम गृहीत धरल्यास ४ ते ५ जणांनी मिळून मिसळून खायचं असा अलिखित नियम ठरलेला आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून कमाई करणारे काही जण ग्रामसेवकांना बोटावर नाचवत आहेत आणि ग्रामसेवकांना सुध्दा मलाई मिळत असल्यामळे ते सुध्दा हवं तसं वाकडं तिकडं होवून बोटावर नाचत आहेत.
पाणी पुरवठा योजना कोणी खाल्ली ?
२०११ साली गावाला १ कोटी २५ लाखाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती, परंतू काम अर्धवट अवस्थेत सोडून आणि जवळपास ७० लाख रूपये उचलून गुत्तेदार फरार झाला होता. सदरील काम झाल्याची शासन दरबारी नोंद आहे, काम झालेले नसतांना याच ग्रामसेवकांनी काम झाल्याबाबत लिहून दिल्याचे नागरिक सांगत असल्याने तोडपाणी झाल्याशिवाय हे शक्य आहे का ? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
जलजीवन मिशनचे भिजतघोंगडे !
२ वर्षांपूर्वी कुंभार पिंपळगांवला जलजीवन मिशन अंतर्गत जवळपास २ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे, कामाचा कालावधी ५४५ दिवस म्हणजेच दिड वर्षाचा होता, मात्र २ वर्ष उलटूनही एक साधा पाईप सुध्दा गावात टाकलेला नाही, मग ग्रामसेवकांनी या गुत्तेदाराकडून सुध्दा मलाई खावून तोंडावर पट्टी बांधली आहे का ? ही योजना सुध्दा खाऊन टाकणार आहात का ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
अनेकजण करोडपती !
कुंभार पिंपळगांव शहरात मागील अवघ्या काही कालावधीत अनेकजण करोडपती झाले आहेत. आश्चर्य म्हणजे अनेक योजना थंडबस्त्यात आहेत, विकासकामे तर दिसत नाहीत मग शासनाकडून येणारे पैसे हे कागदोपत्री योजना आणि कामे दाखवून खिशात घातले जात आहेत का ? शासनाकडून येणाऱ्या जनतेच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारला जात असेल आणि कोणी गैरमार्गाने माया जमवत असेल तर या प्रकाराची सुध्दा चौकशी होणे आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.
बोगस कामे !
कुंभार पिंपळगांव शहरात अनेक कामे बोगस झाल्याचे दिसून येत आहे, कुठे सिमेंट रस्त्याचे काम बोगस किंवा निकृष्ट दर्जाचे झाले आहे, कुठे रस्त्याला तडे जावून मध्यभागी उभी फूट पडली आहे, लाखो रूपयांची अनेक कामे अशी आहेत जी झाल्याचे सांगितले जात आहे परंतू ती गावात शोधली तर सापडत नाहीत. त्यामुळे शासनाकडून आलेला निधी आणि झालेला खर्च याची चौकशी होणे आवश्यक आहे.
ग्रामसेवकाला भुताची भिती ?
कुंभार पिंपळगांवच्या ग्रामसेवकांना ग्रामपंचायत कार्यालयात कदाचित पुन्हा भुतं असल्याचा भास होत असावा, खुर्चीवर बसले की खुर्ची उचलून फेकत असावी, घाम फुटत असावा, मळमळ होत असावी त्यामुळेच की काय ग्रामपंचायत कार्यालयात ते ८ ते १५ दिवस येत नाहीत. गावाच्या बाहेर झाडाखाली, हॉटेल मध्ये, धाब्यावर, एखाद्या खोलीत किंवा घनसावंगीला बोलावून ते विशेष लोकांची कामे करत असतात. तोडपाणी तर ठरलेलीच आहे. त्यामुळेच की काय आजकाल कुंभार पिंपळगांव शहरातील अनेकांचे घनसावंगी, अंबड, जालना दौरे खूपच वाढल्याचे दिसत आहे. अर्थातच मास्टरमाईंड कोण आहे हे संपूर्ण गावाला माहित आहे.
वरिष्ठांचा आशीर्वाद !
कुंभार पिंपळगांवच्या ग्रामसेवक (ग्रा.पं.अधिकारी) यांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मधील काही अधिकाऱ्यांचा मोठा आशिर्वाद असल्याचे वारंवार ऐकायला मिळत आहे, मात्र पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मधील आशिर्वाद देणारे ते नेमके अधिकारी कोण ? याचा तपास होणे आवश्यक आहे. जर खरंच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मधील कोणी अधिकारी ग्रामपंचायत मधील भ्रष्ट कारभाराला पाठीशी घालत असतील तर त्या अधिकाऱ्यांची नावे सुध्दा उघड होणे आवश्यक आहे.
सदस्य तक्रार करणार ?
ग्रामपंचायत मध्ये चाललेल्या अनागोंदी कारभाराबाबत काही सदस्य व नागरिक हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे कळते, मात्र ते खरंच तक्रार करणार की एखादे काम घेवून शांत बसणार हे पहावे लागेल. मात्र तुर्तास तरी काही सदस्यांनी आणि नागरिकांनी ग्रामपंचायतच्या संपूर्ण कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्यामळे बीडीओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी इत्यादी वरिष्ठ अधिकारी या प्रकरणी लक्ष घालतात का हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पुढील पंचनामा लवकरच…
