Your Alt Text

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्‍या उपाययोजना आवश्‍यक आहेत ? (Part – 2)

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
मराठवाड्याचा सर्वांगिण विकास हवा असेल, तर तो केवळ घोषणांनी होणार नाही, तर काही ठोस, वेळबद्ध, परिणामकारक उपाययोजनांनीच ते शक्य आहे. त्‍यासाठी मराठवाड्यातील नेत्‍यांसह जनतेनं सुध्‍दा एकता दाखवून आवाज उठवणे, पाठपुरावा करणे आवश्‍यक झाले आहे. खरं तर सरकार, नेते आणि तज्ञांना उपाययोजना नक्‍कीच माहित आहेत परंतू तरीही काही उपाययोजना खालील प्रमाणे आहेत.

सर्वपक्षीय एकता

मराठवाड्याच्या सर्व राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे आणि संयुक्त मागण्या घेऊन सरकारसमोर ठाम भूमिका घ्यावी, शासनाला ग्राउंड लेवलची भयावह वस्‍तुस्थिती लक्षात आणून द्यावी.

तालुकास्तरावर आधुनिक शिक्षण सुविधा

तालुकास्‍तरावर इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी आणि इतर उच्‍च व आधुनिक शिक्षणाची सोय उपलब्‍ध होणे अत्‍यंत गरजेचे आहे. अर्थातच शिक्षण असे असावे ज्‍याला भविष्‍यात महत्‍व आहे.

आरोग्‍य सुविधा बळकट करणे !

जिल्‍हा रूग्‍णालयांना अधिक सक्षम करणे, तालुकास्‍तरावर उपजिल्‍हा रूग्‍णालय, आधुनिक रुग्णालयं, डायग्नोस्टिक सेंटर उभारावीत. आणि मोठ्या व सर्कलच्‍या गावांमध्‍ये आधुनिक ग्रामीण रूग्‍णालय सुरू करणे, गावांमध्‍ये प्राथमिक आरोग्‍य केंद्र सक्षम करून चांगल्‍या सुविधा व उपचार उपलब्‍ध करणे, पुरूष व महिला दोन्‍ही डॉक्‍टर उपलब्‍ध करणे, आवश्‍यक त्‍या सर्व औषधांचा पुरवठा करणे, आवश्‍यक त्‍या तपासण्‍याची सोय उपलब्‍ध करणे आवश्‍यक आहे.

उद्योग धोरण

प्रत्येक तालुक्यात मिनी MIDC, अन्न प्रक्रिया उद्योग, शेतमाल साठवणूक व निर्यात केंद्र उभारण्याची गरज आहे. शिवाय उद्योग व्‍यवसायासाठी तरूणांना योग्‍य ते सहकार्य आणि मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

MSME उद्योगांना प्रोत्‍साहन

गाव पातळीवर पुरूष असो किंवा महिला, छोटे उद्योग सुरू करण्‍यासाठी प्रोत्‍साहन देणे, कर्ज सुविधा उपलब्‍ध करणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, अधिकारी कर्मचाऱ्यांना गाव पातळीपर्यंत संपर्क साधून योजनांचा लाभ मिळवून देण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याबाबत आदेशीत करणे आवश्‍यक आहे.

सिंचनाचे दीर्घकालीन नियोजन

धरणांचं जलव्यवस्थापन, नदीजोड प्रकल्प, बंधाऱ्यांची उभारणी, टँकरमुक्ती योजना तातडीने राबवावी. जिल्‍हानिहाय व तालुकानिहाय पाण्‍याचे नियोजन कसे करता येईल या दृष्‍टीनेही विचार होणे आवश्‍यक आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना तसेच ज्‍या भागात पाण्‍याची कमतरता आहे त्‍या भागात सिंचनाची सुविधा निर्माण करण्‍यासाठी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांना सहकार्य

शेतकऱ्याला थेट बाजाराशी जोडणं, स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सक्षम करणे, MSP साठी प्रयत्‍न करणे, शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मार्गदर्शन व सहकार्य करणे गरजेचे आहे.

वीजेचा प्रश्‍न मार्गी लावणे

मराठवाड्यात आधीच्‍या तुलनेत विजेचा प्रश्‍न काही अंशी कमी झालेला असला तरी पूर्णपणे सुटलेला नाही. वर्षानुवर्षे विजेच्‍या कमकुवत झालेल्‍या तारा केव्‍हाही तुटून पडतात, डीपी (रोहित्र) खराब होते, खांब जेथे तेथे वाकलेले किंवा तुटलेले आहेत, उपकेंद्रांमध्‍ये साहित्‍य नाही, देखभाल दुरूस्‍तीसाठी निधी नाही, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. कर्मचाऱ्यांच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न आणि सुविधेचाही प्रश्‍न आहे. याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

बॅंकिंग सुधारणा

युवकांना कमी कागदपत्रांमध्‍ये उद्योगासाठी सहज कर्ज मिळावं यासाठी बँकांची उत्तरदायित्व निश्चित करावं. PMEGP, CMEGP सारख्या योजनांची सकस अंमलबजावणी व्हावी. कर्ज मिळण्‍यासाठी ठराविक कालावधी निश्चित करणे, अडचणी दूर करणे आवश्‍यक आहे.

प्रशिक्षण व रोजगार

प्रत्‍येक तालुक्‍यात व शहरात विविध प्रशिक्षण आयोजित करणे, ज्‍या त्‍या तालुक्‍यात संबंधित तरूणांना रोजगार मिळवून देण्‍यासाठी यंत्रणा उभी करणे किंवा सक्षम करणे, मार्गदर्शन शिबीने आयोजित करणे.

स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांचे बळकटीकरण !

स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांचे (मनपा, नगरपालिका, नगरपंचायत, जि.प., पंचायत समिती, ग्रामपंचायत इ.) लोकप्रतिनिधी यांच्‍यासाठी वेळोवेळी मागदर्शन आयोजित करणे, योजना व विकासकामांची माहिती देणे, अंमलबजावणीसाठी सहकार्य करणे.

प्रशासकीय जबाबदारी निश्चित करणे

चांगल्‍या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्‍साहन देणे, पाठबळ देणे आणि योजना राबवण्यात कोताई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली गेली पाहिजे.

IT आणि डिजिटल हब निर्माण करणे

IT क्षेत्राचा वाढता प्रभाव लक्षात घेवून तरुणाईसाठी डिजिटल स्किलिंग, BPO, कस्टमर सपोर्ट, स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर उभारावेत. AI व मशिन लर्निंग, यासारखे शॉर्ट टर्म अभ्‍यासक्रम सुरू करावेत.

परिवहन आणि दळणवळण व्यवस्था

सर्व तालुक्यांना राज्‍य किंवा राष्ट्रीय महामार्गाने जोडणे, शक्‍य तेथे रेल्वेसाठी प्रयत्‍न करणे, प्रत्‍येक गावापर्यंत दर्जेदार रस्त्यांचं जाळं तयार करणे, सार्वजनिक वाहतूक सेवा मजबूत करणे आवश्‍यक आहे.

भ्रष्‍टाचारावर नियंत्रण

असा एक दिवस जात नाही की कोठून भ्रष्‍टाचार किंवा गैरव्‍यवहाराची बातमी येत नाही. अर्थातच जनतेच्‍या पैशांवर डल्‍ला मारण्‍याचे प्रकार सुरू असल्‍याने योजना आणि विकास कामांवर परिणाम होत आहे. त्‍यामुळे प्रत्‍येक योजना आणि विकास कामाची (इस्‍टीमेटसह) माहिती सविस्‍तरपणे ऑनलाईन उपलब्‍ध असणे आवश्‍यक आहे. जेणेकरून जनता त्‍याकडे लक्ष ठेवू शकेल.

धर्म-जातीचा द्वेष नको

जाती, धर्माच्‍या नावाने भांडणे लावून किंवा माथी भडकवून आधीच मराठवाड्यासह राज्‍याचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. मराठवाड्याचा विकास करायचा असेल तर सर्व जाती धर्माच्‍या नागरिकांनी एक होवून विकासाकडे लक्ष द्यावे. धर्म जातीचे कार्य करायला कोणी रोखलेले नाही, परंतू धर्म-जातीच्‍या नावाने द्वे्ष करून आणि चक्रव्‍युहात अडकून आपले आणि आपल्‍या मुला-बाळांचे भविष्‍य अंधारात घालायचे की, एकता दाखवून स्‍वत:सह मुलाबाळांचे आणि कुटुंबाचे भविष्‍य उज्‍जवल करायचे याचा विचार मराठवाड्यातील जनतेने आणि नेत्‍यांनी सुध्‍दा करणे क्रमप्राप्‍त झाले आहे.

कायदा सुव्‍यवस्‍था

कोणत्‍याही भागाचा विकास साधतांना कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित राहणे महत्‍वाचे आहे, त्‍यासाठी पोलीस ठाणे आणि पोलीस चौकींची संख्‍या वाढवणे, तसेच पोलीसांची संख्‍या वाढवणे त्‍यांना योग्‍य त्‍या मुलभूत सुविधा उपलब्‍ध करणे, चांगल्‍या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्‍साहन देणे व चांगले व भयमुक्‍त वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.

जनतेचा सहभाग

सामान्‍य जनतेने मुर्दाड मानसिकता ठेवून चालणार नाही, जनतेलाही आपले प्रश्‍न नेते, लोकप्रतिनिधी आणि शासनाकडे मांडावे लागतील, पाठपुरावा करावा लागेल, वेळप्रसंगी जाब विचारावा लागेल, आंदोलने, उपोषणे करावे लागतील. पाठपुरावा करणाऱ्यांना सहकार्य करावे लागेल, मदत करावी लागेल, माध्‍यमांमध्‍ये आवाज उठवावा लागेल. कारण विकासाची गंगा आपल्‍या दारातून जावी आणि हाताच्‍या ओंजळीने आपल्‍याला घेता यावे ही फक्‍त आपल्‍यापुरती स्‍वार्थी मानसिकता सोडून सामुहिक विचार करावा लागेल तेव्‍हाच परिस्थिती मध्‍ये बदल होवू शकेल यात शंका नाही.

परवेज पठाण,
संपादक, एल्‍गार न्‍यूज


विषय गंभीर आणि महत्‍वाचा आहे,  मित्रांना आवश्‍य शेअर करा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!