एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आणि जालन्याचेच माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यातले भांडण किंवा एकमेकांविषयीची टोकाची भूमिका लोकांना नवीन नाही. परंतू नुकतंच कॉंग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर हा विरोध कमी होण्या ऐवजी वाढलेलाच दिसत आहे.
“चेहरों पे हँसी, दिल में तूफ़ान रखते हैं,
ये सियासत वाले अजब अंदाज़ रखते हैं!”
आमदार अर्जुन खोतकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत तर कैलास गोरंट्याल हे आता भाजप मध्ये सामील झाले आहेत. म्हणजेच दोघेही आजी माजी आमदार महायुतीत सामील असलेल्या पक्षाचे सदस्य आहेत, अर्थातच एकाच परिवारात दोघे आहेत. कैलास गोरंट्याल हे भाजप मध्ये गेल्यानंतर अर्जुन खोतकर यांच्या विषयी असलेली टोकाची भूमिका सोडतील आणि अर्जुन खोतकर सुध्दा कैलास गोरंट्याल यांच्या विषयी असलेला टोकाचा विरोध सोडतील असे अनेकांना वाटले होते. परंतू त्याच्या उलट गोष्टी होतांना दिसत आहेत.
“भले ही मंच बदले हों,
पर दिलों की आग अब भी वही है!”
जालन्याचे राजकारण !
जालना शहर आणि आसपासचा परिसर हा जालना विधानसभा मतदारसंघात येतो. अर्जुन खोतकर असो किंवा कैलास गोरंट्याल असो दोघेही याच मतदारसंघातून आलटून पालटून आमदार राहीलेले आहेत. जालना मतदारसंघातील मतदारांनी दोघांनाही वेळोवेळी संधी दिली आहे. राज्यात असो किंवा देशात असो निवडणुक संपली की संबंधित मतदारसंघातून निवडणूक लढलेले उमेदवार थोडाफार विरोध सोडला तर टोकाची भूमिका घेतांना दिसत नाही. परंतू जालना मतदारसंघ त्याला अपवाद ठरत आहे. कारण निवडणुका संपून बरेच दिवस झाले असले तरी दोघांमधील टोकाचा विरोध काही संपायला तयारच नाही, अशी परिस्थिती आहे.
“राजनीती में दुश्मन नहीं होते,
सिर्फ फायदे और नुकसान होते हैं!”
लाईव्ह चर्चेत हमरीतुमरी !
एका चॅनलवर आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल या दोघांनाही आमंत्रित करून दोघांची मते जाणून घेण्याचा न्यूज अॅंकर यांनी प्रयत्न केला, एकमेकांविषयी असलेला दोघांचा विरोध काहीसा मावळला असेल आणि दोघेही आता जुडवून घेतील असे वाटत असतांना त्याच्या उलट परिस्थिती पहायला मिळाली, अक्षरश: दोघांनी एकमेकांना अरे तुरेच्या भाषेत बोलल्याचे दिसून आले, दोघांनी एकमेकांचे कारनामे सांगण्यास सुरूवात केली, दोघांनी एकमेकांना तिखट भाषेत बोलून एकमेकांचे वाभाडे काढले, परिस्थिती अशी दिसत होती की, दोघेही आता एकमेकांना शिव्या घालतात की काय असे दिसत होते.
अक्षरश: न्यूज अॅंकर यांना दोघांना वारंवार विनंती करावी लागली की, अरे तुरे बोलू नका, वैयक्तिक बोलू नका, शांतता राखा, परंतू दोघेही काही ऐकायला तयार नव्हते. एवढंच नव्हे तर राजकारणात एकमेकांच्या कुटुंबावर काही बोलायचं नाही असा एक अलिखित नियम असतो, तो सुध्दा दोघांनी मोडल्याचे दिसत आहे. अक्षरश: पिढ्यानं पिढ्या असलेली दुश्मनी जशी असते तशीच या दोघांच्या बोलण्यातून दिसत आहे. अर्थातच हे जिल्ह्याच्या हिताचे नाही आणि दोघांच्या व्यक्तीमत्वाला पण शोभणारे नाही. राहीला प्रश्न दोघांच्या आरोपांमधील तथ्याचा तर दोघांनी आपल्याकडील पुरावे संबंधित यंत्रणेला सोपवावेत, खरंच निष्पक्ष चौकशी झाली तर कारवाई होवू शकते.
“हवा बनाओ नफ़रत की या मोहब्बत की,
सियासत में मौसम बदलते देर नहीं लगती !”
नवरा मेला तरी चालेल…?
येत्या काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, ज्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणुका होणार आहेत. अर्थातच महायुती मध्ये असलेले तीन पक्ष म्हणजे भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे एकत्रित निवडणूक लढणार असा अंदाज बांधला जात असतांनाच एकला चलो रे ची भाषा आणि दोघांमधील टोकाचा विरोध पाहता महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची चिंता वाढल्याचे चित्र दिसत आहे. दोघांची हमरी तुमरी आणि एकमेकांचे कारनामे बाहेर काढण्याची भाषा पाहता दोघांनाही येणाऱ्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यापेक्षा एकमेकांचा कार्यक्रम कसा लावायचा यावरच जास्त फोकस केल्याचे दिसत आहे. अर्थातच नवरा मेला तरी चालेल, पण सवत रं#डकी झाली पाहिजे अशीच काही परिस्थिती दोघांच्या बोलण्यावरून दिसत आहे.
“दुश्मनी जमकर करो, लेकिन ये गुंजाइश रहे,
जब कभी तुम दोस्त हो जाओ तो शर्मिंदा न हों!”
जिल्ह्यात महायुतीचा दबदबा पण…
जालना जिल्ह्यात ५ विधानसभा मतदारसंघ आहेत, या ५ ही मतदारसंघात महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत, म्हणजेच भाजपचे ३ आणि शिवसेनेचे २ आमदार आहेत. ज्यामध्ये माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात मातब्बर असे माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे सुध्दा जिल्ह्यातीलच आहेत. सदरील दोन्ही आजी आमदार आमदार (खोतकर-गोरंट्याल) यांनी सर्वांना विश्वासात घेवून आणि सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याच्या विकासासाठी आपली एनर्जी खर्च करणे आवश्यक असतांना दोघेही भांडणात वेळ वाया घालवणार असतील तर जिल्ह्यातील जनतेने दोघांकडून काय अपेक्षा ठेवायची ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
“झगड़े तो बहुत किए हैं हमने,
अब कुछ वक़्त काम के लिए भी निकालो!”
लोकांना भांडणं नकोत !
आमदार अर्जुन खोतकर असो किंवा माजी आमदार कैलास गोरंट्याल असो, दोघेही जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आहेत, दोघांचाही राजकीय अनुभव दांडगा आहे, दोघांचा जनसंपर्क वरिष्ठ पातळीवर चांगला आहे, दोघांकडेही कार्यकर्त्यांची फौज आहे. आधी तरी दोघे एकमेकांच्या विरोधात असलेल्या पक्षात होते, परंतू आता दोघेही महायुतीत सामील असतांनाही विरोध सोडायला तयार नाहीत. अर्थातच दोघांच्या विरोधाचा जिल्ह्यातील जनतेला काही फायदा आहे का ? दोघांनी टोकाची भूमिका घेवून आपली एनर्जी खर्च करून जिल्ह्याला काही मिळणार आहे का ? असा सवाल जनतेला पडला आहे.
“दुश्मनी चाहे जितनी गहरी हो,
सियासत में दोस्ती का दरवाज़ा खुला रखना पड़ता है!”
अर्थातच दोघेही आता सत्ताधारी पक्षात असल्याने दोघांनी जास्तीत जास्त निधी जिल्ह्याला कसा आणता येईल आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना कशी मिळेल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. जनतेला शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योगधंदे आणि मुलभूत सुविधा हव्या आहेत. सर्वसामान्य जनतेला भांडणे नको आहेत तर मतदारसंघासह जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हवाय याचं भान दोन्ही अनुभवी नेत्यांनी ठेवणे आवश्यक आहे.
शेवटी एवढंच म्हणता येईल की, जनहित डोळ्यासमोर ठेवून वेळीच दोघांनी स्वत:मध्ये बदल करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा या पार्श्वभूमीवर एक शायरी लागू पडते की…
सुना भी कुछ नही,
कहा भी कुछ नही,
पर ऐसे बिखरे हैं जिंदगी की कश्मकश में…
कि टूटा भी कुछ नही,
और बचा भी कुछ नही…
———————-
परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज
9890515043