एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
कदाचित मतदारांना बरंच काही लक्षात आलं असावं, कदाचित उघडपणे विरोध करून कोणाला दुखवण्या ऐवजी किंवा दुश्मनी घेण्याऐवजी शांतपणे मतपेटीच्या माध्यमातून मतदान करून आपला उमेदवार निवडून आणायचा असं ठरवलं असावं, कदाचित वर्षानुवर्षे निवडणुकांमध्ये होत असलेली भांडणे, त्याचे दुष्परिणाम अनेकांना लक्षात आले असावेत त्यामुळे कदाचित अनेकांनी शांत राहणे पसंत केले असावे अशीच काही सध्याची परिस्थिती दिसत आहे.
एका शायरची एक शायरी कदाचित येथे लागू पडत असावी की, खामोशियॉं बेवजह नहीं होती, कुछ दर्द आवाज छीन लिया करते हैं | अर्थातच या शायरीचा असा अर्थ घेता येईल की, विनाकारणच कोणी शांत राहत नाही, शांत राहण्यामागे काही अडचणी किंवा अनुभव असतील ज्यामुळे नेहमी जो आवाज असतो तो काहीसा शांत झाला असावा.
आधीसारखी परिस्थिती नाही !
वर्षानुवर्षे ज्या प्रमाणे विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वसामान्य लोक अथवा समर्थक प्रचारामध्ये सहभागी व्हायचे, स्वत:हून वेळ द्यायचे, चर्चा करायचे, एकमेकांना सांगायचे, वेळप्रसंगी टोकाचा विरोध करायचा, ती परिस्थिती आता नक्कीच राहीलेली नाही. कारण यावेळेस तर परिस्थिती खूपच वेगळी आहे. एकतर बदललेली राजकीय परिस्थिती, राजकीय पक्षांची संख्या, प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची वाढलेली संख्या, उमेदवारांमध्ये सुरू असलेले वाकयुद्ध, जातीय समिकरणे, मतदार आणि उमेदवार यांच्याशी निगडीत प्रश्न अशा अनेक गोष्टी लक्षात घेवून मतदारांनी शांतपणे मतदानाचे कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेतला असेल असेच सध्या दिसत आहे.
राजकारणाचे तिनतेरा !
आज जी राजकीय परिस्थिती दिसत आहेत उद्या ती परिस्थिती राहीलच याची शाश्वती देणे अवघड होवून बसले आहे. कोण, कुठे, कोणासोबत असेल, राजकीय गणित आणि तडजोडी काय असतील याबद्दल सांगणे कठीण आहे. शत्रू असलेले कधी मित्र होतील आणि मित्र असलेले शत्रू कधी होतील यांचा अंदाज बांधणे अवघड आहे. हीच परिस्थिती विविध मतदारसंघातील एकमेकांचे शत्रू समजले जाणारे आणि मित्र समजले जाणारे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याबाबतीतही का होणार नाही ? अर्थातच काहीही होवू शकते. कदाचित यामुळे सुध्दा मतदारांनी अथवा नागरिकांनी शांत राहण्याची गोळी घेतली असावी.
संबंधात दुरावा !
एकतर आधीच वर्षानुवर्षे गावात, शहरात मित्रांमध्ये, पाहुणे तसेच नातेवाईक किंवा भावकी मध्ये राजकारणामुळे संबंध खराब झाले होते. वर्षानुवर्षे लोक राजकारणामुळे एकमेकांशी बोलत नव्हते, राजकारणाच्या हेव्यादाव्यामुळे जवळ येत नव्हते, निवडणुकीच्या काळात झालेल्या हमरीतुमरीमुळे संबंधात दुरावा निर्माण झाला होता या सर्व गोष्टी आता कशाबशा पूर्वपदावर येत आहेत. बऱ्याच अंशी टोकाची भुमिका घेणे लोकांनी सोडले आहे. मग आता या राजकारणामुळे एकमेकांना काही बोलून किंवा एखाद्या उमेदवाराचा उघडपणे विरोध करून पुन्हा संबंधात दुरावा कशाला निर्माण करायचा अशीही भावना मतदारांची झाली असावी असं म्हणता येईल.
कुणाशीही शत्रुत्व कशाला ?
पक्षाचे कार्यकर्ते हे निवडणुकांमध्ये एकमेकांचा विरोध करतांना दिसून येतात (त्यांचेही प्रमाण खूप कमी झाले आहे) मात्र सर्वसामान्य नागरिक आता टोकाचा विरोध किंवा एखाद्या उमेदवारा विषयी काही बोलणे टाळत आहेत, कारण ज्या उमेदवाराला शिव्या घातल्या तोच उमेदवार उद्या जर निवडून आला तर मग कसं ? किंवा ज्या उमेदवाराचा विरोध केला तोच जर पडला तर त्याची किंवा त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची विनाकारण दुश्मनी कशाला ? ज्याच्या विषयी वेगळे शब्द वापरले किंवा विरोध केला त्याच्याशी भविष्यात काही काम पडले तर मग अडचण कशाला ? असाही प्रश्न विविध मतदारसंघातील मतदारांना पडला असेल असंही म्हणता येईल.
विविध आंदोलनांची किनार !
मागील काळात विविध समाजाकडून आपापल्या मागण्यासांठी वेगवेगळी आंदोलने, उपोषणे झाली आहेत. समाजा समाजात काही प्रमाणात का असेना काहीसा दुरावा निर्माण झाल्याचे चित्र आहे. वर्षानुवर्षांचे संबंध चांगले रहावे अशी सर्वांचीच भावना आहे. अशातच निवडणुका लागल्या असल्यामुळे एकमेकांच्या समोर येवून आणि विरोध करून वर्षानुवर्षांचे संबंध खराब करण्यापेक्षा शांत राहून मतपेटीतून जे करायचं ते करू या अशी भुमिका सुध्दा मतदारांनी घेतली असेल असंही म्हणता येईल.
प्रशासनाला सहकार्य !
निवडणूक आयागाने नियमांच्या अनुषंगाने प्रशासनाला आणि संबंधित पक्ष व उमेदवारांनाही सक्त सूचना दिलेल्या आहेत. अर्थातच निवडणुक आयोगाच्या सूचनांचे पालन सर्वांना करावे लागते. निवडणूक म्हटले की, निवडणुक विभाग, इतर विभागाचे कर्मचारी, पोलीस प्रशासन इत्यादिंना ताररेवरची कसरत करावी लागते. निवडणूक व्यवस्थित पार पडावी यासाठी पोलीस व प्रशासनाला योग्य ते नियोजन करावे लागते. अधिकारी, कर्मचाऱ्यांना या काळात व्यवस्थित झोप मिळेल का ? वेळेवर जेवण मिळेल का ? किती तास कर्तव्य पार पाडावे लागेल ? याचा काही अंदाज नसतो, त्यामुळे सर्वांनी शांतता ठेवल्यामुळे पोलीस व प्रशासनाला सुध्दा मदत होत आहे.
मग आशीर्वाद कोणाला ?
मतदारांनी यावेळेस घेतलेली भुमिका पाहता शक्यतो कोणालाच दुखवायचे नाही, जे भेटतील त्या प्रत्येकाला प्रेमाने हो आम्ही तुमच्या सोबतच आहोत, आमचा आशिर्वाद तुम्हालाच, अशी मानसिकता मतदारांनी ठेवल्याचे दिसत आहे. बाकी मतदान कुणाला करायचे ते शांतपणे जावून मतपेटीच्या माध्यमातून मतदान करून मोकळे व्हायचे. जे निवडून येतील ते आपलेच अशीही भावना मतदार व्यक्त करत आहेत. बाकी पब्लिक है ये सब जानती है, एवढे मात्र नक्की…