एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी मतदारसंघाचे अनेक वर्षे आमदार आणि अनेक वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून राहिलेले माजी आमदार राजेश टोपे यांचा पराभव का झाला हा प्रश्न अनेकांसाठी आजही अनुत्तरीत आहे. तर अनेकजण आपल्याला अंदाज होता असे सांगत आहेत, प्रत्येक जण आपापल्या परीने तर्क वितर्क, अंदाज आणि कारणे शोधत आहे, प्रत्येक जण आपल्या बोलण्यात काही तथ्य असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारणे अनेक आहेतच पण काही बांधवांचे मत थोडे वेगळे आहे.
एल्गार न्यूजने मतदारसंघातील काही बांधवांशी चर्चा केली असता, अनेकांनी वेगवेगळी मते व्यक्त केली असली तरी काहींनी थोडं वेगळं विश्लेषन केलंय, त्यांच्या मते भैय्यासाहेबांचं कसं झालंय, ती ससा आणि कासवाची गोष्ट आहे ना तसं झालंय ! आता ससा आणि कासवाची गोष्ट तर बहुतांश लोकांना माहितच आहे पण तरीही प्रासंगिक म्हणून पुन्हा थोडक्यात सांगायला हरकत नाही.
गोष्ट काय ?
जंगला मध्ये तसे अनेक प्राणी राहतात, पण येथे चर्चा दोन प्राण्यांची होत आहे, त्यामुळे दोघांचा प्रामुख्याने संदर्भच घेण्यात येत आहे….. एका जंगलामध्ये ससा आणि कासव असे दोन प्राणी राहत होते. ससा चालायचा तुरुतुरु आणि कासव चालायचे हळूहळू. कासवाच्या हळूहळू चालण्याच्या स्वभावामुळे ससा नेहमी त्याची खिल्ली उडवून हसत असे. कासवाला मनातून खूप राग यायचा, पण सशाला तो कधी बोलून दाखवायचा नाही.
एके दिवशी, ससा आणि कासव जंगलात भेटले, ससा कासवाला चिडवून म्हणाला, “कासवा तू किती रे हळूहळू चालतोस.”कासव म्हणाले, “लावतोस का माझ्यासोबत धावण्याची शर्यत ?” ससा हसून म्हणाला, “हो हो ! पण शर्यत तर मीच जिंकणार बघ.”कासव म्हणाले, “ठीक आहे. ते दूर डोंगरावर वडाचे झाड आहे ना, तिथपर्यंत धावायचे. जो अगोदर पोहचेल तो शर्यत जिंकेल.” ससा म्हणाला, “कबूल”
शर्यतीचा दिवस निश्चित झाला. शर्यतीच्या दिवशी जंगलातील सगळे प्राणी शर्यत पाहण्यासाठी जमा झाले. शर्यत सुरू झाली. ससा जोरात धावू लागला. कासव मात्र हळूहळू चालत होते. बघता बघता ससा खूप पुढे गेला. पुढे त्याला हिरवगार कोवळं गवत, मुळा-गाजरचा मळा दिसला. धावून धावून त्याला आता भूकही लागली होती. त्याने मागे वळून पाहिले तर कासव खूपच मागे होते.
सशाने मनात म्हटले, “कासव तर खूप मागे आहे. इथं थांबून थोडा वेळ आराम करावा.” असं म्हणून त्याने कोवळ्या हिरव्या गवत, गाजर आणि मुळ्यावर ताव मारला. पोटभर खाल्यावर जवळच्या झाडाच्या थंडगार सावलीत विश्रांती घेत असताना, कधी झोप लागली हे त्याला स्वतःला देखील कळले नाही.
इकडे कासव कुठेही थांबले नाही. ते हळूहळू चालत सशाजवळ आले. ससा झोपलेला पाहून, कासव हसले. पण न थांबता पुढे चालतच राहिले. लवकरच ते वडाच्या झाडाजवळ पोहचले. थोड्या वेळाने सशाला जाग आली. तो धूम पळत सुटला. पण काहीही उपयोग झाला नाही. कासव तर वडाच्या झाडापाशी आधीच पोचले होते. अर्थातच कासवाने शर्यत जिंकली. सर्व प्राण्यांनी कासवाची प्रशंसा केली आणि म्हणाले सश्याच्या गर्विष्ठ स्वभावामुळे तो पराभूत झाला.
सश्याच्या सततच्या थट्टा करण्याच्या सवयीमुळे कासवाला वाईट वाटायचे. सश्याच्या तुलनेत आपली धावण्याची गती खूप कमी आहे हे माहिती असूनही कासवाने सश्यासोबत धावण्याची शर्यत लावली. यातून कासवाचा आत्मविश्वास दिसून येतो. ‘शर्यत मीच जिंकणार’ आणि मला कोणी हरवू शकत नाही या सश्याच्या अहंकार आणि अतिआत्मविश्वासामुळे तो कासवासोबत शर्यत हरला.
जेव्हा ससा शर्यत संपलेल्या ठिकाणी पोहोचला तेव्हा सर्व प्राणी कासवाने शर्यत जिंकल्या बद्दल आनंद साजरा करत होते. त्या दिवशी, तो एक धडा शिकला की एखाद्या गोष्टीबद्दल बढाई मारल्याने प्रशंसा होत नाही, कोणत्याही कारणामुळे इतरांची कधीही थट्टा करू नये. कोणत्याही कमकुवत प्रतिस्पर्ध्याला कधीही कमी लेखू नये.
लोकांचं मत काय ?
ज्यांनी घनसावंगी मतदारसंघात राजेश टोपे यांच्या बाबतीत ससा आणि कासवाच्या गोष्टीचा संदर्भ दिला त्याबद्दल त्यांना विचारले असता, त्यांनी सांगीतले की, भैय्यासाहेब तर यंदा असंख्य नागरिकांना भेटले सुध्दा नाहीत, त्यांनी अनेकांना पाहून दुर्लक्ष केल्यासारखं केलं, प्रचार करणाऱ्या पैकी काही लोक प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच म्हणत होते की, आम्ही तर आजच जिंकलो आहोत, आम्ही फक्त लीड साठी प्रचार करत आहोत, आम्हाला जास्त प्रचार करण्याची आवश्यकता सुध्दा नाही. यावरून असे दिसते की, भैय्यासाहेब सुध्दा अतिआत्मविश्वासा मध्ये आणि अहंकारा मध्ये तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले नाहीत किंवा त्यांनी यंत्रणा राबवली नाही असेही प्रतिक्रिया देणाऱ्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना प्रतिक्रिया देणाऱ्या काही मतदारांनी असेही सांगितले की, भैय्यासाहेब प्रत्येक गावात आणि सर्कल मध्ये काही मोजक्याच लोकांच्या भरवशावर राहिले, प्रत्येक गावातील काही लोक म्हणजे संपूर्ण गाव होत नाही हे ते विसरले, भैय्यासाहेबांचा कार्यक्रम करण्यामध्ये त्यांच्या जवळचे अनेक लोक सुध्दा कारणीभूत आहेत.
तर इतर काही मतदारांनी सांगितले की, भैय्यासाहेबांचा पराभव फक्त एवढ्याच कारणामुळे झाला नाही, त्यासाठी अनेक कारणे आहेत, त्याला कारणीभूत मागील 25 वर्षांची पार्श्वभूमी आहे. ज्यांना भैय्यासाहेबांच्या कारकिर्दीत विकास झाला नाही असे दिसून आले किंवा जे भैय्यासाहेबांवर नाराज होते आणि कंटाळले होते त्यांनी शांतपणे कार्यक्रम केला असेही काही मतदारांनी सांगितले.
ताकद सारखीच पण !
तर काही बांधवांनी असेही सांगितले की, ससा आणि कासवाची गोष्ट येथे लागू पडत असली तरी, निवडणुकीत दोघेही वाघच एकमेकांसमोर उभे होते, दोघांना सगळे डावपेच माहित होते, दोघांची ताकद सारखीच होती, परंतू एका वाघाने दुसऱ्या वाघाला कमकुवत प्रतिस्पर्धी आणि कासवाप्रमाणे समजण्याची घोडचूक केली तसेच रेस मध्ये आपण एकटेच आहोत आणि आपण सहज जिंकू या भ्रमात ते वाघ राहिले आणि अहंकारामध्ये कार्यक्रम झाला असेही सांगितले.
काहीही असो, पण सदरील निवडणूक अनेकांना आवाक करणारी आणि अनेकांना चर्चेचं गुऱ्हाळ सुरू करून देणारी ठरली असं म्हणायला हरकत नाही. येत्या काळात पुन्हा कोणकोणत्या गोष्टी लोकांकडून ऐकायला मिळतात काहीच सांगता येत नाही. बाकी तुम्ही एखादी गोष्ट मनात आणू नका नाहीतर बस…
इतर बातम्या खाली पहा….
