Your Alt Text

खासदारांनी 5 वर्षात मतदारसंघातील प्रत्‍येक तालुक्‍यात प्रत्‍येकी 5 विशेष कामे केली तरी मतदार पुढील निवडणुकीत विसरणार नाहीत !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
लोकसभेच्‍या निवडणुकीमध्‍ये मतदान करण्‍यापूर्वी अनेक मतदारांना प्रश्‍न पडतो की, संबंधित उमेदवाराला मतदान कशामुळे करायचे ? निवडून आल्‍यावर या खासदाराचा आपल्‍याला फायदा काय होणार ? खासदाराचा उपयोग काय असतो ? खासदार काय काम करू शकतात ? खासदार म्‍हणून निवडून आल्‍यावर यांची भेट होईल का ? असे अनेक प्रश्‍न त्‍यांना पडत असतात.

निवडून आलेल्‍या खासदाराचा लोकसभा मतदारसंघ क्षेत्रफळाच्‍या मानाने खूप मोठा असतो. उदाहरणार्थ एखाद्या विधानसभा आमदाराचे क्षेत्र हे एक किंवा दोन तालुक्‍यापुरते असते, तर लोकसभा खासदाराचे मतदारसंघ हे एखाद्या जिल्‍ह्याएवढे किंवा 6 ते 8 तालुक्‍याएवढे असते. यात शंका नाही मात्र तरीही असंख्‍य सर्वसामान्‍य मतदारांना प्रश्‍न पडतो की, खासदाराचा आपल्‍याला किंवा आपल्‍या तालुका व जिल्‍ह्याला फायदा काय ? त्‍यामुळे नवनिर्वाचित खासदारांनी जनतेचे प्रश्‍न लक्षात घेणे आवश्‍यक आहे.

तालुकानिहाय हवे नियोजन !

लोकसभा मतदार संघात जिल्‍ह्याचे मुख्‍यालयच केंद्रबिंदू असता कामा नये, मुख्‍यालया सोबतच तालुक्‍यांकडे सुध्‍दा लक्ष देणे आवश्‍यक आहे. प्रत्‍येक तालुक्‍यात विविध समस्‍या असू शकतात, स्‍थानिक प्रश्‍न असू शकतात. त्‍याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अर्थातच अनेक प्रश्‍न आमदाराशी आणि राज्‍य सरकारशी निगडीत असले तरी खासदार म्‍हणून केंद्र सरकारच्‍या विविध योजना आणि विकास कामांच्‍या माध्‍यमातून शक्‍य ते प्रयन करणे आवश्‍यक आहे. काही प्रमुख प्रश्‍न वारंवार जनतेला सतावत असतात आणि त्‍यामुळे मतदारांच्‍या काही अपेक्षा आहेत त्‍या खालील प्रमाणे…

1] शिक्षणाचा प्रश्‍न !

सर्वसामान्‍य नागरिकांना आपल्‍या मुला-मुलींना चांगल्‍या दर्जाचे शिक्षण मिळणे सध्‍या खूप अवघड झाले आहे. स्‍थानिक पातळीवर चांगले शिक्षण मिळत नाही तर दुसरीकडे पाठवावे तर तेवढा पैसा गरीब व सामान्‍य कुटुंबातील व्‍यक्‍ती खर्च करू शकत नाही. अशा परिस्थितीत प्रत्‍येक तालुक्‍यात चांगल्‍या दर्जाचे शिक्षण देणारी (सेमी) किमान एक मोठी “निवासी शाळा” व्‍हावी, सदरील निवासी शाळा एक तर मोफत किंवा कमी खर्चात असावी. यासाठी खासदार महोदयांनी जाणीवपूर्वक प्रयत्‍न करावे अशी मतदारांची अपेक्षा आहे. जेणेकरून पुढील निवडणुकीच्‍या वेळेस खासदार महोदयांचे नाव या निवासी शाळेच्‍या माध्‍यमातून स्‍मरणात राहील.

2] आरोग्‍याचा प्रश्‍न !

आज सर्वसामान्‍य नागरिकांना शिक्षणाप्रमाणेच आरोग्‍यावर सुध्‍दा हजारो रूपये खर्च करावे लागत आहेत. वर्षभरात कुटुंबातील कोणी ना कोणी व्‍यक्‍ती आजारी पडत असतो, म्‍हणजेच बारी बारी प्रत्‍येकाच्‍या उपचारावर खर्च करावा लागतो. असंख्‍य कुटुंबांना वर्षाला 25 ते 50 हजार रूपये छोट्या मोठ्या उपचारावर खर्च करावे लागतात. अनेकांना तर यापलीकडेही खर्च करावे लागतात. केंद्र सरकार कडे शिक्षणाप्रमाणेच आरोग्‍यासाठी सुध्‍दा विशेष निधी असतो. त्‍यामुळे खासदार महोदयांनी केंद्र सरकारच्‍या निधीच्‍या माध्‍यमातून किंवा सेवाभावी संस्‍थांच्‍या माध्‍यमातून एखादा दवाखाना सुरू करण्‍यासाठी प्रयत्‍न केला तर जनतेला खूप मोठा दिलासा मिळेल. जर हे शक्‍य नसेल तर आधीच्‍या आरोग्‍य यंत्रणेत सुधारणा करण्‍यासाठी आणि आधुनिक उपचार मोफत मिळण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत अशी मतदारांची अपेक्षा आहे.

3] रोजगारासाठी प्रयत्‍न !

महाराष्‍ट्रात काही तालुक्‍यांचा अपवाद सोडल्‍यास बहुतांश तालुक्‍यात एमआयडीसी नाही, उद्योग नाहीत, व्‍यावसायिक कारखाने, कंपन्‍या नाहीत, त्‍यामुळे रोजगार मिळणे अवघड झाले आहे. त्‍यामुळे खासदार महोदयांनी जर केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून आपल्‍या मतदारसंघातील प्रत्‍येक तालुक्‍यात छोटे उद्योग, कंपन्‍या सुरू करण्‍यासाठी प्रयत्‍न केल्‍यास, शिवाय युवकांना उद्योग व्‍यवसाय सुरू करण्‍यासाठी (सबसीडी असलेले) कर्ज मिळवून देण्‍यास सहकार्य केल्‍यास असंख्‍य युवक – युवतींना रोजगार उपलब्‍ध होईल, अर्थातच खासदार महोदयांनी रोजगारासाठी प्रयत्‍न करावेत अशी अपेक्षा मतदार व्‍यक्‍त करत आहेत.

4) शेतकऱ्यांसाठी प्रयत्‍न !

असंख्‍य शेतकरी बांधवांना बऱ्याचदा शेतीमध्‍ये लावलेला पैसाही निघत नाही. एकतर मालाला हमी भाव नाही, शिवाय उत्‍पादन पाहिजे तेवढे येत नाही. अर्थातच त्‍यामुळे उत्‍पन्‍न होत नाही. त्‍यासाठी खासदार महोदयांनी हमी भावासाठी लोकसभेत आवाज उठवावाच, परंतू आपल्‍या लोकसभा मतदारसंघातील प्रत्‍येक तालुक्‍यात शेतकऱ्यांना आधुनिक शेती कशी करता येईल, उत्‍पन्‍न कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्‍न करावेत. तालुक्‍यात वेळोवेळी कृषि प्रशिक्षणाचे आयोजन करून शिवाय शेतकऱ्यांचे इतर ठिकाणी दौरे आयोजित करून शेतकऱ्यांच्‍या आर्थिक उन्‍नतीसाठी प्रयत्‍न करावेत अशीही अपेक्षा मतदार व्‍यक्‍त करत आहेत.

5) बँक कर्ज सुविधा !

सुशिक्षित बेरोजगारांची संख्‍या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, प्रत्‍येकाला नोकरी देणे शक्‍य नाही. परंतू तरीही आपल्‍या भागातील युवक युवतींना स्‍पर्धा परिक्षांच्‍या माध्‍यमातून नोकरी मिळावी यासाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करणे. तसेच सर्वात महत्‍वाचे म्‍हणजे शेतकरी असो, सुशिक्षित बेरोजगार युवक – युवती असो किंवा छोटे व्‍यापारी असो यांना सहजासहजी राष्‍ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मिळत नाही, त्‍यामुळे इच्‍छा असतांनाही अनेकांना आपला उद्योग व्‍यवसाय सुरू करता येत नाही किंवा त्‍यास वाढवता येत नाही. गरजूंना विविध योजनांच्‍या माध्‍यमातून बँकेचे कर्ज मिळवून देण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न केल्‍यास अनेकांना उद्योग व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून रोजगार मिळेल आणि असंख्‍य कुटुंबांना गरीबीतून बाहेर पडण्‍यास मदत होईल.

6) योजनांची अंमलबजावणी !

केंद्र शासनाच्‍या अनेक योजना आहेत परंतू त्‍या बहुसंख्‍य नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. केंद्र शासनाच्‍या योजनांचा लाभ मतदारसंघातील नागरिकांना मिळवून देण्‍यासाठी खासदार महोदयांनी प्रत्‍येक तालुक्‍यात एक “संपर्क कार्यालय” सुरू करून तेथून लोकांना कसे सहकार्य करता येईल आणि योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्‍न करावेत, शिवाय फक्‍त फॉर्म भरण्‍यापूरते किंवा अर्ज करण्‍याकरीता सहकार्य करण्‍यापुरते मर्यादित न राहता त्‍या गरजू व्‍यक्‍तीला लाभ मिळवून देण्‍यासाठी वरिष्‍ठ पातळीवर प्रयत्‍न करावेत अशी अपेक्षाही मतदार व्‍यक्‍त करत आहेत.

7) जिल्‍ह्यात प्रोजेक्‍ट यावेत !

केंद्र शासनाचे प्रोजेक्‍ट आपल्‍या जिल्‍ह्यात कसे येतील यादृष्‍टीने खासदार महोदयांनी प्रयत्‍न करावेत. अर्थातच ज्‍या प्रोजेक्‍टच्‍या माध्‍यमातून जिल्‍ह्यातील जनतेची आर्थिक उन्‍नती होण्‍यास हातभार लागेल. यासह राज्‍याच्‍या आणि देशाच्‍या प्रगतीलाही चालना मिळेल असे प्रोजेक्‍ट आपल्‍या जिल्‍ह्यात आणण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत, जिल्‍ह्यासाठी लाभदायक ठरणाऱ्या त्‍या प्रोजेक्‍टसाठी सातत्‍याने प्रयत्‍न व्‍हावेत. अशी अपेक्षाही मतदार व्‍यक्‍त करत आहेत.

8) निर्यात करण्‍यासाठी प्रयत्‍न !

आपल्‍या जिल्‍ह्यातील आणि मतदारसंघातील विविध तालुक्‍यात ज्‍या गोष्‍टीचे उत्‍पादन होते, वस्‍तू तयार होते किंवा शेतीशी संबंधित उत्‍पादने असो किंवा शेतमाल असो. इतर राज्‍यात, देशात ज्‍या वस्‍तूला किंवा उत्‍पादनाला मागणी आहे अशा उत्‍पादन किंवा वस्‍तुची निर्यात कशी करता येईल या दृष्‍टीने खासदार महोदयांनी प्रयत्‍न करावेत, जेणेकरून संबंधित उत्‍पादन, माल किंवा वस्‍तूला जास्‍तीचा दर मिळून शेतकऱ्यांसह उत्‍पादकांना अधिकचा लाभ मिळेल.

…तर दिलासा मिळेल !

मतदारसंघात रस्‍ते, पाणी, दळणवळण यासह सर्वसामान्‍य जनतेचे इतर अनेक प्रश्‍न, मुद्दे, अडचणी असतातच त्‍यांच्‍याकडेही लक्ष देणे गरजेचे आहेच, सोबतच वरील काही प्रमुख मुद्दे आहेत जे प्रामुख्‍याने लक्षात घेवून आपल्‍या मतदारसंघात प्रत्‍येक तालुकानिहाय प्रयत्‍न केल्‍यास युवक-युवतींना, बेरोजगारांना, उद्योजक, व्‍यावसायिक, महिला, शेतकरी व कष्‍टकऱ्यांसह सर्वसामान्‍य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकेल. अर्थातच 5 वर्षात प्रत्‍येक तालुक्‍यात स्‍मरणात राहतील अशी 5 विशेष कामे केली तरी मतदार विसरणार नाहीत आणि अर्थातच पुढील निवडणुकीच्‍या वेळी कोणी विचारले की, तुम्‍ही आमच्‍यासाठी काय केले तर त्‍यावेळेस अडचण होणार नाही…

  • परवेज पठाण,
    संपादक, एल्‍गार न्‍यूज

इतर बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!