एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
यंदा निवडणूक विभागाचे अधिकारी बूथवर कर्मचारी नियुक्त करतांना शुद्धीवर होते का ? जर बूथवर कर्मचारी नियुक्त करतांना संबंधित अधिकारी शुद्धीवर होते तर बूथच्या आत मध्ये कर्मचारी नियुक्त करतांना संबंधित कर्मचारी प्रशिक्षित हवेत याचं भान त्यांना नव्हतं का ? असे अनेक संतप्त प्रश्न कुंभार पिंपळगांव येथील बुथवर तासनतास उभ्या असलेल्या मतदारांनी उपस्थित केले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.20 रोजी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथे सकाळ पासूनच गर्दी असतांनाही मतदान 5 वाजेच्या नंतरही सुरूच होते, कारण कुंभार पिंपळगांव येथील गावातील जि.प.शाळा येथे असलेल्या मतदान केंद्रामध्ये विशेष करून 289 मध्ये मतदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळे निवडणूक विभागाचा निष्काळजीपणा म्हणावा की फालतूपणा म्हणावा असा प्रश्न मतदारांना पडला आहे.
जे महिला, पुरूष व युवक दुपारी 3 वाजता 289 बूथवर मतदान करण्यासाठी लाईन मध्ये उभे होते त्यांचा नंबर 4.45 ते 5 वाजेच्या दरम्यान आला. विशेष म्हणजे पावने दोन ते 2 तासात 50 मतदानही झाले किंवा नाही असा प्रश्न लाईन मध्ये ताटकळत उभे राहणाऱ्या मतदारांना पडला आहे. कारण या ठिकाणी अप्रशिक्षित कर्मचारी बसवण्यात आले होते, अक्षरश: 3 वाजता जे कर्मचारी बूथवर मतदान केंद्रात होते ते 5 ते 10 मिनिटात अवघ्या 2 मतदारांचे मतदानही खूप मुश्किलने करून घेत असल्याचे मतदारांनी सांगितले.
जेव्हा महिला व पुरूष मतदारांनी ओरड सुरू केली, संताप व्यक्त केला, तेव्हा तेथील उपस्थित पोलीसांनी मतदारांना समजावण्याचा प्रयत्न केला. साधारण 4.15 ते 4.30 च्या आसपास आधीचे कर्मचारी बदलून नवीन कर्मचारी बसवण्यात आल्याचे सांगण्यात आले आणि काही प्रमाणात गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र 3 वाजता जे मतदार मतदानासाठी लाईन मध्ये उभे होते त्यांना जवळपास दिड ते 2 तास मतदानासाठी लागले हे सुध्दा तेवढेच खरे आहे. विशेष म्हणजे 3 वाजता रांगेत उभ्या असणाऱ्या मतदारांसमोर समोर अंदाजे फक्त 30 ते 40 मतदारच असतील असे मतदारांनी सांगितले.
जेव्हा तासभर उभं राहूनही मतदान केंद्रातील मतदारांनी लाईन पुढे सरकतच नव्हती व गर्दी होवून मतदार संताप व्यक्त करत होते, ओरड सुरू झाली होती तेव्हा अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी गर्दीला नियंत्रणात आणण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना या गोंधळाबाबत सहज प्रश्न करण्यात आला असता त्यांनी सांगितले की, ही जबाबदारी निवडणूक विभागाची अथवा महसूल कर्मचाऱ्यांची आहे तुम्ही एवढा उशीर का लागला हे त्यांना विचारू शकता असे त्यांनी सांगितले.
अप्रशिक्षित कर्मचारी होते का ?
यावेळी येथे उपस्थित मतदान केंद्र परिसरात इतर कर्मचाऱ्यांना 5 वाजेच्या दरम्यान विचारले असता आधी बसवण्यात आलेले कर्मचारी अप्रशिक्षित होते, किंवा त्यांना योग्य प्रकारे मतदान प्रक्रिया पार पाडता येत नव्हती त्यामुळे त्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांना बसवण्यात आले आहे, त्यामुळे आता मतदानाची गती वाढली आहे असे त्यांनी सांगितले. जर आधी बूथ क्र.289 मध्ये बसवण्यात आलेले कर्मचारी अप्रशिक्षित होते, तर असे अप्रशिक्षित कर्मचारी बूथमध्ये का बसवण्यात आले ? या कर्मचाऱ्यांनी सकाळ पासून सुध्दा अशाच प्रकारे संथगतीने मतदान प्रक्रिया पार पाडली का ? सकाळपासून या कर्मचाऱ्यांनी मतदारांना तासनतास ताटकळत उभे ठेवले का ? अप्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करतांना संबंधित अधिकारी शुद्धीवर होते का ? गर्दी पाहून अनेक मतदार हे मतदान न करता परत गेले नसतील का ? असा सवाल ज्यांना त्रास झाला आहे त्या मतदारांनी उपस्थित केला आहे.
नियोजन नव्हते का ?
याबाबत जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याशी साधारण 5 वाजता संपर्क साधला असता सदरील बूथवर काही नवीन कर्मचारी पाठवण्यात आले आहेत आता मतदान सुरळीत झाले आहे असे त्यांनी सांगितले. तर तहसीलदार योगीता खटावकर यांना विचारले असता एवढा उशीर लागणे योग्य नाही याबाबत माहिती घेवून सांगते असे त्यांनी सांगितले.
झालेल्या त्रासाचे काय ?
मतदान करण्यासाठी मतदारांना पावने दोन ते 2 तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागले व मनस्ताप सहन करावा लागला त्याचे काय ? एवढ्या गर्दीला नियंत्रीत ठेवणे शक्य नव्हते तर मतदान केंद्र का वाढवण्यात आले नाही ? प्रशिक्षित कर्मचारी का बसवण्यात आले नाहीत ? ज्या वयोवृद्ध महिला व पुरूष मतदारांना जवळपास दिड ते 2 तास नाहक त्रास झाला त्याचे काय ? 5 वाजेनंतरही प्रचंड गर्दी या केंद्रात होती या मतदारांनी अंधार पडल्यावर पुन्हा किती वेळ थांबायचं ? असा सवालही मतदारांनी केला आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासा ?
मतदानासाठी रांगेत 3 वाजता उभे राहणाऱ्या मतदारांचा नंबर केव्हा लागला हे निवडणुक विभागाचे अधिकारी कर्मचारी येथे लागलेल्या सीसीटीव्ही च्या माध्यमातून तपासू शकतात. एवढा उशीर का लागला ? फक्त 289 नंबरच्या बूथवरच ही परिस्थिती होती का इतर केंद्रावर सुध्दा अशीच परिस्थिती होती ? 5 वाजेनंतर उर्वरित मतदारांना किती वाजेपर्यंत नाहक थांबावे लागले ? याचाही तपास करावा अशी माफक अपेक्षाही मतदारांनी व्यक्त केली आहे.