Your Alt Text

गुजरात मध्‍ये नर्मदा परिक्रमावासीयांची मुस्लिम समाजाकडूनही केली जाते आपुलकीने सेवा – विष्‍णूदास आर्दड

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
गुजरात मध्‍ये नर्मदा परिक्रमेसाठी फक्‍त देशातूनच नव्‍हे तर विदेशातून सुध्‍दा भाविक येत असतात. देशभरातून येणाऱ्या परिक्रमावासीयांची सेवा हिंदू बांधवांकडून तर होतेच मात्र मुस्लिम समाजाकडूनही तेवढ्याच आदराने आणि आपुलकीने सेवा केली जाते अशी प्रतिक्रिया राजाटाकळी (ता.घनसावंगी) येथील ज्‍येष्‍ठ पत्रकार विष्‍णूदास आर्दड यांनी दिली आहे.

विष्‍णूदास आर्दड हे मागील 6 महिन्‍यांपासून गुजरात मध्‍ये नर्मदा जिल्‍ह्यात परिक्रमावासीयांची सेवा करण्‍यासाठी गेले होते. अत्‍यंत दुर्गम भाग असलेल्‍या या भागात त्‍यांनी परिश्रम घेवून परिक्रमावासीयांची सेवा केली आहे. नुकतेच ते परत आले असून विष्‍णूदास आर्दड यांचा एल्‍गार न्‍यूजच्‍या वतीने संपादक परवेज पठाण यांनी सत्‍कार केला, यावेळी त्‍यांनी आपले अनुभव व्‍यक्‍त केले.

पुढे बोलतांना विष्‍णूदास आर्दड म्‍हणाले की, नर्मदा परिक्रमेची सुरूवात ओंकारेश्‍वर मध्‍यप्रदेश मधून होते, समुद्रापर्यंत यावे लागते, उत्‍तर तटावरून अंमर कंटक पर्यंत व तेथून परत ओंकारेश्‍वर अशी नर्मदा परिक्रमा असते. एकूण प्रवास 3500 किलोमिटरचा असतो.

मी जेथे थांबलो होतो, तो परिसर म्‍हणजे गुजरात राज्‍यातील नर्मता जिल्‍ह्यातील नलगाव मध्‍ये चैतन्‍यवाडी आश्रम आहे. या परिसरात अंदाजे 6 मुस्लिमबहुल गावे आहेत. या गावांमध्‍ये बहुसंख्‍य मुस्लिमच आहेत. या भागातून जेव्‍हा परिक्रमावासी जात असतात त्‍यांची होईल ती सेवा आश्रमकडून तर केली जातेच परंतू या भागातील मुस्लिम समाजाकडूनही शक्‍य ती मदत व सेवा आपुलकीने केली जाते. येथे हिंदू – मुस्लिम असा भेदभाव किंचितही दिसून आला नाही. उलट एकमेकांमध्‍ये खूप प्रेम, आदर आणि आपुलकी दिसून आली.

येथील मुस्लिम समाजाने सांगितले की, परिक्रमावासीयांची सेवा करणे हे आम्‍ही आमचे भाग्‍य समजतो. ही सेवा आम्‍ही वर्षानुवर्षे करत आहोत आणि आम्‍ही कुठलीही अपेक्षा न करता ही सेवा करत असतो असे सांगितले. मी (विष्‍णूदास आर्दड) ज्‍या आश्रमात सेवा करायला गेलो होतो तो परिसर दुर्गम भाग तर होताच, शिवाय या भागात वन्‍यप्राणी जसे की, वाघ व इतर प्राणी तसेच 15 फुटी मगर असे जीव सुध्‍दा होते, मात्र जेव्‍हा जेव्‍हा या भागातील मुस्लिम बांधवांना भेटत होतो तेव्‍हा ते नेहमी आपुलकीने सांगायचे की, कुठलीही मदत लागली तर आवश्‍य सांगा.

सदरील मुस्लिम बांधवांचा आदर, वागणूक, सहकार्य आणि आपुलकी पाहून खूप बरं वाटलं. अर्थातच देशात शतकानुशतके हिंदू-मुस्लिम बांधवांमध्‍ये असलेले आपुलकीचे संबंध आजही कायम आहेत यात शंका नाही असेही विष्‍णूदास आर्दड यांनी सांगितले.

Satkar Copy edited

एल्‍गार न्‍यूजच्‍या वतीने सत्‍कार !

वरिष्‍ठ सहकारी व कुंभार पिंपळगांव येथील ज्‍येष्‍ठ पत्रकार विष्‍णूदास आर्दड यांनी एल्‍गार न्‍यूज कार्यालयास सदिच्‍छा भेट दिली असता त्‍यांचा एल्‍गार न्‍यूजचे संपादक परवेज इब्राहीम पठाण यांनी सत्‍कार केला.


इतरही महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!