Your Alt Text

GST चे नियम कायदे पायदळी तुडवून व्‍यापार ! कुं.पिंपळगावच्‍या सोनेरी दुनियेत काळा बाजार ! 40 लाख नव्‍हे तर कोटींचा व्‍यवहार !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
सर्वसामान्‍य जनता लग्‍नकार्य व इतर कारणांसाठी कष्‍टाचा पैसा खर्च करून सोने, चांदी अथवा दागिने घेत असेल परंतू त्‍याला घेतलेले सोने शासनाच्‍या नियमान्‍वये आहे किंवा नाही ? तसेच सोने किती कॅरेटचे आहे ते सुध्‍दा माहित नाही, एवढंच काय एखाद्याला सहज शंका आली तर सदरील सोने खरे की खोटे हे कळायला मार्ग नाही अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगाव येथील बहुतांश दुकानदार हे सोने विक्री साध्‍या पावतीवर करत आहेत. सदरील पावतीवर GST क्रमांक नाही, अर्थातच बील जीएसटीचे नाही. सदरील साध्‍या पावतीवर सोने किती कॅरेटचे आहे याचाही उल्‍लेख नाही, म्‍हणजे सोने 24 कॅरेटचे आहे, 22 कॅरेटचे आहे किंवा 18 कॅरेटचे आहे याचा कुठेही उल्‍लेख नाही, मग सर्वसामान्‍य ग्राहकांना किती कॅरेटचे सोने विक्री केले जात आहे याचा काहीच थांगपत्‍ता लागत नाही. विशेष म्‍हणजे जेवढे कॅरेट कमी तेवढे सोन्‍याचे दर कमी असतात,

मोठे मार्केटचे गांव (शहर)

कुंभार पिंपळगांव हे घनसावंगी तालुक्‍यातील सर्वात मोठे शहर आहे. या शहराची लोकसंख्‍या 20 ते 25 हजार आहे. शिवाय आसपासच्‍या 30 ते 40 गावांचा केंद्रबिंदू हे शहर आहे. दररोज शहरात कोट्यावधी रूपयांची उलाढाल होते. बुधवारी आठवडी बाजाराच्‍या दिवशी अंदाजे 50 हजार पेक्षा जास्‍त नागरिक बाजारासाठी येत असतात. शहरात सोने चांदीचे अनेक दुकाने असून यावरून उलाढाल किती होत असेल याचा अंदाज सहज घेता येईल.

ग्राहकांची अडचण !

सोने किती कॅरेटचे आहे याची माहिती ग्राहकांना साध्‍या पावतीवर मिळत नाही, शिवाय हॉलमार्क सुध्‍दा नाही. त्‍यामुळे भविष्‍यात दुसऱ्या गावात किंवा शहरात सदरील सोने विक्री करायचे असेल तर साध्‍या पावतीवर संबंधित दुकानदार सोने घेईल का ? घेईल तर मग अपेक्षित रक्‍कम देईल का ? योग्‍य किंमतीत घेणार नसेल तर नुकसान सहन करून सोने विक्री करायचे का ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

GST चे नियम पायदळी !

सोने विक्री करतांना ग्राहकाला GST चे बील देणे बंधनकारक असतांना GST चे नियम कायदे पायदळी तुडवले जात आहे. GST चे बील नाही म्‍हटल्‍यावर अपवाद सोडल्‍यास शासनाकडे पूर्णपणे GST सुध्‍दा भरला जात नाही आणि अर्थातच या माध्‍यमातून कमवलेला काळा पैसा असल्‍याने इनकम टॅक्‍स सुध्‍दा पूर्णपणे भरला जात नाही. फक्‍त नावाला GST चे काही बिले जमा करायची तसेच नावाला टॅक्‍स किंवा रिटर्न भरल्‍याचे भासवून शासनाचा कोट्यावधी रूपयांचा टॅक्‍स बुडवला जात आहे.

E-way बील चा नियमही पायदळी !

प्राप्‍त माहितीनुसार शासनाने 2 लाखाच्‍या पुढे सोने असेल तर एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा गावात घेवून जायचे असेल तर GST विभागा अंतर्गत येणारे E-way बील घेणे बंधनकारक आहे, मात्र येथील एकूण गोंधळ पाहता येथे येणारे सोने, चांदी अथवा दागिने E-way बिलाच्‍या माध्‍यमातून येतात का ? कोट्यावधी रूपयांचे सोने, चांदी अथवा दागिने E-way बिला शिवाय आणले जात असेल तर संबंधित विभागाने दोषींवर आतापर्यंत कार्यवाही का केली नाही ? जर E-way बिलाच्‍या माध्‍यमातून सोने, चांदी अथवा दागिने आणले जात असेल तर मागील वर्षभरातील बीले संबंधित दुकानदाराकडे आहे का ? याचा सखोल तपास होणे आवश्‍यक आहे.

40 लाख तर चिल्‍लर आहे !

कुंभार पिंपळगांवात येणारे अथवा विक्री होणारे सोने, चांदी अथवा दागिने लाखांमध्‍ये नव्‍हे तर कोटींमध्‍ये आहे. उदाहरणार्थ एखादा व्‍यक्‍ती मुलीच्‍या लग्‍नासाठी किमान 2 ते 3 लाखाचे सोने, चांदी अथवा दागिने खरेदी करतात असे गृहीत धरायला हरकत नाही, लग्‍नासाठी एक ग्राहक सरासरी 2 लाखाचे सोने खरेदी करत असेल आणि एक दुकानदार वर्षभरात 100 ग्राहक करत असेल तर हेच 2 कोटी होत आहे. बाकी वर्षभरात लग्‍नाशिवाय इतर ग्राहकांचे तर 2 ते 3 कोटी होत नसतील का ? म्‍हणजेच एक दुकानदार उदाहरण म्‍हणून घेतले तरी 4 ते 5 कोटींचे (काही जण तर त्‍यापेक्षा जास्‍त) व्‍यवहार सहज करत असेल असं म्‍हणायला हरकत नाही.

म्‍हणजेच कुंभार पिंपळगांव येथील कोणताही दुकानदार 40 लाखाच्‍या आत वर्षभरात सोने, चांदी अथवा दागिने विक्री करत असेल अशी शक्‍यता मुळीच दिसत नाही. त्‍यामुळे प्रत्‍येकाला GST चे नियम पाळणे बंधनकारक आहे. नसता कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर लाखोंचा दंड किंवा गुन्‍हे सुध्‍दा दाखल होवू शकतात अशी प्रतिक्रिया या क्षेत्राशी संबंधित जानकारांनी दिली आहे.

सिझन मध्‍ये तर अनलिमिटेड !

सध्‍या पावसाळा सुरू असल्‍यामुळे अशी परिस्थिती आहे, परंतू पावसाळा संपल्‍यानंतर सिझन सुरू होतो, सिझन मध्‍ये तर दररोजची विक्री 5 ते 10 लाख किंवा 10 ते 20 लाखांची विक्री सामान्‍य गोष्‍ट आहे, अनेकांचा व्‍यवहार 20 ते 50 लाखांपर्यंत सुध्‍दा जात असल्‍याचेही सुत्रांनी सांगितले आहे. मग यावरून वर्षभरात किती कोटींचा व्‍यवहार होत असेल याचा अंदाज बांधता येईल.

थेट तपासणी आवश्‍यक !

कुंभार पिंपळगांव शहरातील सर्व सोने चांदीच्‍या दुकानांमधील व्‍यवहाराची चौकशी होणे आवश्‍यक आहे. यासाठी संबंधित विभागांनी महिला अधिकारी किंवा कर्मचारी ग्राहक म्‍हणून पाठवल्‍यास सगळा गोंधळ अथवा काळा बाजार लक्षात येईल. शिवाय त्‍यांच्‍याच दुकानातील HD क्‍वालिटी मध्‍ये असलेल्‍या CCTV चा पुरावा सुध्‍दा कामी येईल. बाकी तपास सुरू केल्‍यावर GST ची बिले किती, टॅक्‍स भरणा किती, वर्षभरातील E-way बिल किती ? काळा पैसा किती ? अशी अनेक प्रकारची माहिती समोर येवू शकते, त्‍यामुळे संबंधित विभागाने गोपनीय माहिती तर गोळा करावीच परंतू कारवाईच्‍या दृष्‍टीने तात्‍काळ पथक पाठवून सखोल चौकशी करावी अशी प्रतिक्रिया विविध क्षेत्रातील मान्‍यवरांनी दिली आहे.



इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!