एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव शहर व परिसरात हॉटेल्स व धाब्यांवर सर्रासपणे घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करण्यात येत असून पुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासनाकडून घरगुती वापरासाठी व व्यवसायाठी स्वतंत्रपणे गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. संबंधित एजन्सीच्या माध्यमातून नागरिकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. घरगुती गॅस सिलिंडरचे दर हे व्यावसायिक सिलिंडरच्या तुलनेत कमी असतात. तर व्यावसायिक सिलिंडर थोडे महाग असतात. हीच बाब लक्षात घेवून काही हॉटेल चालक, चहा कॉफी सेंटर, धाबा, रेस्टॉरेंट, मिठाई सेंटर अशा विविध ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर करत आहेत. मात्र व्यवसाया करीता घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे.
कुंभार पिंपळगांव (ता.घनसांवगी) शहरात मोठ्या प्रमाणावर चहाची हॉटेल्स आहेत, कॉफी शॉप, नाष्टा सेंटर, धाबा, रेस्टॉरेंट देखील बरेच आहे. बहुतांश ठिकाणी व्यवसायिक सिलिंडरच्या ऐवजी घरगुती सिलेंडरचा वापर करण्यात येत असून सदरील सिलिंडरचा वापर सुध्दा योग्य प्रकारे करण्यात येत नसल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हॉटेल्स मध्ये सर्रास वापर !
कुंभार पिंपळगांव येथील अंबड रोड, कृषि उत्पन्न बाजार समिती चौक, तसेच या चौका पासून बस स्थानक रोड, अरगडे गव्हाण चौफुली पर्यंत अनेक चहाची व इतर हॉटेल्स आहेत. यातील बहुतांश हॉटेल्स मध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करण्यात येत आहे. शिवाय अंबड – आष्टी रोड वर असलेल्या धाब्यांवर सुध्दा घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करण्यात येत आहे.
सुरक्षिततेची काळजी नाही !
कुंभार पिंपळगांव शहरातील चहाच्या हॉटेलसह इतर हॉटेल व धाब्यावर घरगुती गॅस सिलिंडरचा वापर तर होत आहेच मात्र या सिलिंडरचा वापर करतांना योग्य ती काळजी सुध्दा घेण्यात येत नाही. संबंधित व्यावसायिकाला सुरक्षितते बद्दल गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. शिवाय काही होत नाही अशी त्यांची मानसिकता दिसत असल्याने भविष्यात काही दुर्घटना किंवा स्फोट झाल्यास व त्यात कोणाच्या जिवीतेला नुकसान झाल्यास याची जबाबदारी कोणाची ? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
तपासणी होणार का ?
घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यवसायिक कारणांसाठी करता येत नाही, तसे करणे गुन्हा आहे, तपासणी केल्यावर तसे आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येते. पुरवठा विभाग कुंभार पिंपळगांव शहरात होत असलेला हा गैरप्रकार रोखणार का असा प्रश्न सुध्दा विचारला जात आहे.
पुरवठा विभाग तपासणी करणार !
कुंभार पिंपळगाव शहर व परिसरात जर घरगुती गॅस सिलिंडरचा वापर हॉटेल व इतर व्यावसायिक कारणांसाठी होत असेल तर त्याची तपासणी करण्यात येईल व तसे आढळून आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे घनसावंगी तहसिल मधील पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी लक्ष्मण यादव यांनी सांगितले.