Your Alt Text

ग्रामीण भागात इलेक्ट्रिक बसेस आवश्‍य सुरू करा पण त्‍या गावांपर्यंत जाण्‍यासाठी चांगले रस्‍ते पण करा !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
एसटी महामंडळ ग्रामीण भागात सुध्‍दा मोठ्या संख्‍येने इलेक्ट्रिक बसेस सुरू करणार असून त्‍यासाठी आवश्‍यक असलेले चार्जिंग स्‍टेशन सुध्‍दा उभारणार असल्‍याची माहिती नव्‍याने पदभार स्विकारलेले परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. नुकतंच एका कार्यक्रमात त्‍यांनी ही माहिती दिली.

पुढे बोलतांना प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक बसेस मुळे इंधन खर्चात व देखभाल दुरूस्‍ती मध्‍ये बचत होईल शिवाय प्रदूषणही टळेल. एसटी कर्मचाऱ्यांसाठी सुध्‍दा काही उपाययोजना करणार असल्‍याचे सांगितले यामध्‍ये रात्रपाळी करणाऱ्या एसटी चालक आणि वाहक आदींसाठी झोपण्‍याची आणि अंघोळीसाठी गरम पाण्‍याची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍याचा प्रयत्‍न असल्‍याचे सांगितले. अर्थातच त्‍यांची भुमिका स्‍वागतार्ह आहे.

एसटीकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष !

वर्षानुवर्षे एसटी महामंडळाकडे आणि बस आगारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्‍यात आल्‍याचे दिसून येते, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न असो किंवा त्‍यांच्‍या अडचणी असो किंवा एसटी महामंडळात आवश्‍यक असलेल्‍या सुधारणा असो याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्‍यात आल्‍यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसह प्रवाशांमध्‍ये नाराजीची भावना आहे. महिला असो किंवा इतर प्रवाशी असो त्‍यांच्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या सुविधांचा अभाव वारंवार दिसून येतो. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांसह प्रवाशांच्‍या अडचणी लक्षात घेवून तातडीने पाऊले उचलणे आवश्‍यक आहे. अर्थातच त्‍यांच्‍याकडून प्रवाशांच्‍या अपेक्षा आहेत.

प्रवाशांना मिळेल दिलासा !

परिवहन मंत्री यांनी ग्रामीण भागात इलेक्ट्रिक बसेस सुरू करणार असल्‍याचे सांगितले, अर्थातच ग्रामीण भागात किंवा गावांमध्‍ये राहणाऱ्या नागरिकांसाठी ही अत्‍यंत दिलासादायक बाब ठरेल, खरोखर इलेक्ट्रिक बसेस ग्रामीण भागात सुरू झाल्‍यास ग्रामीण भागातील प्रवाशांची खूप मोठी अडचण दूर होईल, कारण आजघडीला प्रवासी कमी असल्‍याचे कारण देवून संबंधित आगारातून बसेस सोडल्‍या जात नाहीत, परंतू इलेक्ट्रिक बसेस असल्‍यास त्‍यांना डिझेलचा व देखभाल दुरूस्‍तीचा खर्च लागणार नाही. परिणामी इलेक्ट्रिक बसेस छोट्या गावांपर्यंत सुध्‍दा पोहोचू शकतील.

पण रस्‍त्‍यांचे काय ?

राज्‍याच्‍या परिवहन मंत्र्यांनी ग्रामीण भागात इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्‍याचे सुतोवाच केले असले तरी ग्रामीण भागात अजूनही असंख्‍य गावांना जोडणाऱ्या रस्‍त्‍यांची अत्‍यंत दयनीय अवस्‍था आहे, या रस्‍त्‍यांवरून मोटारसायकल चालू शकत नाही तर मग एसटी बस किंवा मोठे वाहन कसे चालणार ? आधीच्‍या तुलनेत काही प्रमाणात रस्‍ते झाले असले तरी अजूनही असंख्‍य गावे चांगल्‍या रस्‍त्‍यांपासून वंचित आहेत. त्‍यामुळे जर चांगले रस्‍तेच नसतील तर इलेक्ट्रिक बसेसला या गावांपर्यंत पोहोचण्‍यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार नाही का ? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रयत्‍नाअंती ईश्‍वर !

ग्रामीण भागातील रस्‍त्‍यांची अवस्‍था अत्‍यंत दयनीय आहे, अनेक दशकांपासून दुर्दैवाने या रस्‍त्‍यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्‍यात आले, मात्र किमान आता तरी ग्रामविकास विभाग, बांधकाम विभाग आणि पर्यायाने सरकारने लक्ष देवून ग्रामीण भागातील रस्‍ते चांगले करावेत. जेणेकरून योग्‍य प्रकारे दळणवळण सुरू होईल, प्रवाशांची अडचण दूर होईल, ग्रामीण भागाच्‍या विकासाला चालना मिळेल आणि शासनाला ग्रामीण भागात इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्‍यासही अडचण येणार नाही.

आजघडीला ग्रामीण भागात ज्‍या गावांपर्यंत चांगले रस्‍ते आहेत तेथे इलेक्ट्रिक बसेस नक्‍कीच सुरू कराव्‍यात, कारण ती काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील रस्‍त्‍यांचा प्रश्‍न मोठा आहे यात शंका नाही, परंतू सातत्‍य ठेवून नियोजनपूर्वक ग्रामीण रस्‍त्‍यांची चांगल्‍या दर्जाची कामे होत राहिल्‍यास येत्‍या काळात या प्रश्‍नांवर सुध्‍दा मात करता येईल. असं म्‍हणतात प्रयत्‍नाअंती ईश्‍वर त्‍यानुसार जर संयुक्‍त प्रयत्‍न झाल्‍यास रस्‍त्‍यांसह दळणवळणाचा प्रश्‍न नक्‍कीच मार्गी लागू शकतो यात शंका नाही.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!