Your Alt Text

रस्‍ता आपल्‍या सासऱ्याचाच आहे ! बहुतेक असं समजून लोकं रस्‍त्‍यावर वाट्टेल तेथे वाहन उभे करून फिरत असावेत !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
कसंय कधी कोणाला काय वाटेल हे सांगता येत नाही. लोकं मनमर्जीप्रमाणे रस्‍त्‍यावर वाट्टेल तेथे वाहने उभी करत असल्‍याने नेमका त्‍यांना काय गैरसमज झालाय हेच कळायला मार्ग नाही. सध्‍या कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील मार्केट कमिटी ते राजाटाकळी रोडचे काम चालू आहे म्‍हणजेच गावातून महामार्ग गेल्‍याने रस्‍त्‍याचे काम चालू आहे. आधीपेक्षा रस्‍त्‍याची रूंदी बरीच वाढली आहे, परंतू तरीही बेशिस्‍त वाहनांमुळे वारंवार रस्‍त्‍यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होवू लागली आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे सध्‍या कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती पासून ते राजाटाकळी या महामार्गाचे काम सुरू आहे. रस्‍त्‍याचे काम सध्‍या प्रगतीपथावर आहे. दिवसा वाहतुकीला अडथळा निर्माण होवू नये म्‍हणून शक्‍यतो रात्रभर रस्‍त्‍याचे काम केले जात आहे. आधीच्‍या तुलनेत रस्‍त्‍याची रूंदी बरीच वाढली आहे. परंतू ज्‍या लोकांना नियम कायद्याचा विसर पडलाय ते मनमर्जीप्रमाणे वाहने रस्‍त्‍यावर कुठेही उभी करत आहेत. त्‍यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे.

जिकडे तिकडे वाहनेच !

महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून अतिक्रमण हटवून रस्‍त्‍याचे रूंदीकरण झाल्‍यामुळे आधीच्‍या तुलनेत रस्‍ता बराच वाढला आहे. रस्‍त्‍याच्‍या साईडला एका बाजुला एक अशी वाहने शिस्‍तीत लावली तर काहीच अडचण येणार नाही. पण कसंय ती एक म्‍हण आहे “कधी न आलं पाहण्‍यात अन ते आलं खाण्‍यात” अशी काही गत झाली आहे. रस्‍ता मोकळा दिसत असल्‍यामुळे जो तो मनमर्जीप्रमाणे कुठेही वाहन लावून आपलं काम करायला कुठेही निघुन जात आहे. अनेक जण असंच करत असल्‍यामुळे अक्षरश: रस्‍त्‍यावर वाहनांचा बाजार भरल्‍याचे चित्र दिसत आहे.

नियम कायद्याचा विसर !

रस्‍ता जनतेसाठी म्‍हणजेच आपल्‍यासाठी असतो हे जरी खरे असले तरी तो रस्‍ता फक्‍त आपल्‍या एकट्यासाठीच नसतो याचा विसर अनेकांना पडलेला दिसत आहे. कदाचित अनेकांना हा रस्‍ता आपल्‍या सासऱ्याचाच आहे त्‍यामुळे आपण कुठेही आपले दुचाकी, तिनचाकी, चारचाकी वाहन लावल्‍यास काहीच अडचण नाही असे अनेकांना वाटत असावे असेच एकूण परिस्थितीवरून दिसत आहे. मात्र नियम कायद्याचा विसर पडलेल्‍या लोकांमुळे कुंभार पिंपळगांवात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून इतर वाहनांसह एस.टी.बस सुध्‍दा गावात येणे अवघड होवून बसले आहे. त्‍यामुळे नागरिकांमध्‍ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.

पोलीसांनी गैरसमज दूर करावा !

जर काही लोकांना रस्‍ता आपल्‍या मालकीचाच किंवा सासऱ्याचाच आहे आणि आपण कुठेही वाहन उभे करून फिरायला गेलो तरी आपलं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही असा कोणाचा गैरसमज झाला असेल तर मग स्‍थानिक पोलीसांनी हा गैरसमज त्‍यांच्‍या पद्धतीने दूर करणे अत्‍यंत गरजेचे झाले आहे. कारण आज रस्‍त्‍यावर कुठेही वाहने उभी केली जात आहेत आणि पोलीसांनी अॅक्‍शन घेतली नाही तर पोलीस चौकी जवळच आहे आणि चौकी समोर बरीच जागा खाली आहे ती जागा सुध्‍दा आपल्‍या सासऱ्याचीच समजून लोकं वाहने उभी करायला कमी करणार नाहीत.


इतर बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!