Your Alt Text

वाहन चालकांची अल्‍कोहोल सोबतच ड्रग्‍स सेवन तपासणीही होणार ! – परिवहनमंत्री | …फक्‍त तपासणी नव्‍हे तर कठोर कारवाई केल्‍याशिवाय अपघातांची संख्‍या कमी होणार नाही !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
राज्‍यासह देशात वाढते अपघात चिंतेचा विषय ठरत आहे. रस्‍ते अपघात दरवर्षी लाखो निष्‍पाप लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. सर्व नियम कायदे धाब्‍यावर बसवून वाहने चालविण्‍यात येत असल्‍याने अपघातांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत असून असंख्‍य नागरिक रस्‍ते अपघाताचे बळी ठरत आहेत.

अल्‍कोहोल सोबत ड्रग्‍स सेवन तपासणी करणार – परिवहनमंत्री

राज्‍यामध्‍ये होणारे रस्‍ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी आणि अपघाती मृत्‍यू रोखण्‍यासाठी शासन आता अल्‍कोहोल सोबतच ड्रग्‍स तपासणी सुध्‍दा करणार असल्‍याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या मशीन्‍स लवकरच उपलब्‍ध करून देण्‍यात येतील तसेच वेगावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी परिवहन विभागाच्‍या माध्‍यमातून कार्यवाही करण्‍यात येत आहे. याकरीता २६३ इंटरसेप्‍टर वाहनांची खरेदी करण्‍यात आली असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

धाक राहिला नाही !

शासन रस्‍ते अपघात कमी करण्‍यासाठी वेळोवेळी नियम कायदे करत असते, परंतू असंख्‍य वाहनधारक या नियम कायद्याची पायमल्‍ली करून वाहने चालवित असतात, कधी दारू किंवा अल्‍कोहोल पिऊन तर कधी ड्रग्‍स चे सेवन करून भरधाव वेगाने वाहन चालवून निष्‍पाप लोकांचे बळी घेत असतात. नियमांची पायमल्‍ली करून वाहने चालवणाऱ्यांवर कठोर स्‍वरूपाची कारवाई होत नसल्‍याने त्‍यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. एक दिवस सुध्‍दा असे होत नाही की अपघाताची बातमी ऐकायला मिळत नाही. रोज कुठे ना कुठे अपघात होत आहेत.

रस्‍ते चांगले पण..!

ग्रामीण भागात आधीच्‍या तुलनेत राज्‍य महामार्ग किंवा राष्‍ट्रीय महामार्ग किंवा प्रमुख मार्ग चांगले झाले आहेत, चांगल्‍या दर्जाचे रस्‍ते होणे ही काळाची गरज आहे, आरामदायी व वेळेवर पोहोचण्‍याच्‍या दृष्‍टीने चांगले रस्‍ते महत्‍वपूर्ण भूमिका निभावतात, परंतू रस्‍ते चांगले झाले म्‍हणजे मनमर्जीप्रमाणे कसेही वाहन चालवण्‍याचा परवाना मिळत नाही हे संबंधित वाहनधारकांना लक्षात आणून देण्‍याची गरज निर्माण झाली आहे. कधी नव्‍हे ते ग्रामीण भागात सुध्‍दा कुठे ना कुठे अपघात होत असल्‍याचे दिसून येत आहे, अर्थातच ग्रामीण भागात सुध्‍दा अपघातांची संख्‍या वाढली आहे.

कारवाई होणे आवश्‍यक !

जो पर्यंत नियम कायद्याची पायमल्ली करून बेशिस्‍त वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाई होत नाही तो पर्यंत अपघातांची संख्‍या कमी होणार नाही. गाव, शहर काहीही न पाहता वाहनधारक भरधाव वेगाने वाहन चालवत असतील, दारू पिऊन किंवा नशा करून वाहने चालवणार असतील तर वेळीच त्‍यांच्‍यावर कारवाई होणे आवश्‍यक आहे, कारण आज ते एक अपघात करून सुटणार असतील तर भविष्‍यात त्‍यांच्‍या हातून अजून अपघात होणार नाही याची शाश्‍वती कोणालाही देता येणार नाही. त्‍यामुळे शासनाने सर्व प्रमुख महामार्गावर नियमित तपासणी करणे व कारवाई करणे आवश्‍यक झाले आहे. शिवाय ग्रामीण भागातील रस्‍त्‍यांवरही अधून मधून तपासणी करून नियमांची पायमल्‍ली करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे. जो पर्यंत वाहन धारकांमध्‍ये कायद्याचा आणि कारवाईचा धाक निर्माण होत नाही तो पर्यंत अपघातांची संख्‍या कमी होणार नाही यात शंका नाही.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!